लेख
$$ "वंशाची पणती" $$
जरा वेगळेच वाटतेय ना " वंशाची पणती !".....वाटेलच! कारण आपण ऐकलाय तो वंशाचा दिवा....आपला वंश पुढे चालावा म्हणून या दिव्यासाठी समाजात गर्भपात, कन्याभ्रुण हत्या व पिशाच्चविद्येचा सहारा घेऊन असंख्य मुलींची हत्या करण्यात आली आहे आणि आज ही सर्रास होत आहे. स्वतःला सुशिक्षित म्हणवून घेणारे किती तरी महाभाग आपल्याला समाजात बघायला मिळतील. गर्भनिदान करायला तेच पूढे असतील,जे सुशिक्षित आहेत. मग ते कसले आले सुशिक्षित? त्यांना तर अगदी रसातळाचा दर्जा दिला तरी हरकत नाही. आज पेपर मध्ये बातम्या बघायला मिळतात आणि पूर्वी ही मिळायच्या... सोनोग्राफी सेंटरला ठोकले कुलुप, गर्भनिदान करणारा डॉक्टर गजाआड, मुलगी जन्मली म्हणुन विवाहीतेचा छळ, विवाहितेला जीवे मारले अशा किती तरी बातम्या वाचायला, बघायला मिळतात. याला जबाबदार कोण ? असा प्रश्न पडतो. याला जबाबदार म्हटले तर आपणच आहोत. आता तुम्ही म्हणाल का ? त्याही प्रश्नाचं उत्तर आहे. अहो, काही दिवसापूर्वी बागेत बसलेल्या दोघा भाऊ-बहीणीला जवळपासच्या लोकांनी प्रेमी युगल म्हणून चांगलेच चोपले कारण ते एकांतात गप्पा मारत होते. काही ठिकाणी प्रेमी युगलांसोबत ही असा प्रकार झाला.त्याचे व्हीडीओ बनवून व्हायरल करण्यात आले. पण खरे पाहीले तर एक ही व्हिडीओ असा दिसला नाही कि कुणी त्यांना समजावून सांगतेय....आणि समजावले असले तरी असे व्हीडीओ दिसणार नाहीत.कारण त्यांना टीआरपी नको असते, म्हणून ते असले प्रकार सहसा करत नाहीत. त्यांना सुधारणा हवी असते पण प्रेमी युगलांचे व्हीडीओ व्हायरल करणारांना हवी असते टीआरपी. मग टीआरपी चे अजून अनेक मार्ग आहेत....आणि प्रश्न ही अनेक आहेत.ते का नाही तुमच्या स्टाईलने सोडवत तुम्ही?कुणी डॉक्टर गर्भनिदान करताना आढळला, कुणी शेजारी मुलगी झाली म्हणुन विवाहितेला छळताना आढळला, कुणी सासू सुनेला टोमणे देताना आढळली...तिथे करा ना दादागिरी!त्यांना शिकवा ना धडा, बनवा व्हीडीओ...करा व्हायरल...वाचवा मुलगी!पण नाही ....ते नाही जमत.कारण याच प्रोसिजरमध्ये आपण ही कुठे तरी दोषी असतो.आपले मन मानत नाही आणि समजा स्वत:त बदल करुन इतरांना बदलायचा प्रयत्न केला तर तू काय केले होते?हा समोरच्याचा टोमणा ठरलेला असतो. तेव्हा तुझी अक्कल काय शेण खायला गेली होती का?तुला आता अक्कल आली का? असे किती तरी प्रश्न.पण मला सांगा अक्कल यायची काही वेळ असते का?अहो,पूर्वी झाल्या असतील चूका पण आपण त्याच चूका परत परत करत रहायच्या का ? अशाने परिवर्तन घडेल का? नाही ना! नाही तर चालू द्या, माझ्या बापजाद्यापासुन हे चालत आले आहे. मी कसे सोडू?नको बाबा, देव कोपेल...असे कुठपर्यंत चालणार? हे करुनच टाकतो असे म्हणत किती तरी भाकडकथांना निरंतर चालू ठेवलेय, त्याने तसे केले.मग आपण ही तसेच करायचे अशीच मानसिकता जास्त दिसते.ती बदलायला हवी. मी असे केले तर लोकांनी माझे अनुकरण करावे ही मानसिकता असायला हवी. कन्याभ्रुण हत्या, कन्या जन्माला आली म्हणुन छळ करणे, मुलगी वागवणे जीवावर आले म्हणून तिला मारुन टाकण्याच्या मानसिकतेतून बाहेर यायला हवे आणि जर ही मानसिकता बदलली नाही तर पुढे ही असेच होत राहिल.मुलींच्या हत्या होतच राहतील.हो,हत्याच...! मी तर याला हत्याच म्हणेन कारण आपला वंश पुढे चालावा म्हणून मुलगाच हवा ही समाजाची धारणा होऊन बसलीय. आणि त्यासाठी ज्या नराधमांनी मुलींच्या हत्या केल्या असतील त्या कोणत्या का रुपाने असो हा लेख वाचतांना त्यांच्या नाकाला मिरच्या नक्कीच झोंबतील यात शंकाच नाही. आणि ज्यांना झोंबल्या त्यांनी निदान एकदा केलेल्या चुकांसाठी किमान दोन भ्रुण हत्या रोखुन चूक सुधारण्याचा प्रयत्न करायला हवा.पण ज्यांच्याकडुन चूक झालीय त्यांनी हं, नाही तर स्वतः एक चुक करा आणि दुसऱ्याच्या दोन थांबवा यात काहीही तथ्य नाही.आणि जनता ही म्हणेलच की "लोका सांगे ब्रह्म ज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण"! ज्यांनी असे नाही केले,मुलीलाही मुलासारखेच मानले त्यांचे कौतूक करावे तितके थोडेच आहे. अशा व्यक्तींचे वेळोवेळी कौतूक व्हायलाही हवे. त्यांचे दाखले इतरांना द्यायला हवेत कारण चुकणाराला शिक्षा तर चांगले कार्य करणाराचा गौरव व्हायला हवाच ना?
समाजात जरी मुलगा वंश चालवतो ही धारणा असली तरी माझ्या मते वंश पुढे ढकलण्याचे काम करते ती मुलगी.जी तुमच्यासाठी तुमची कधीच नसते पण तुमचा वंश चालवण्यासाठी दूर कुठे तरी ती वाढत असते. अगदी तुमच्या नकळतपणे!पण तरीही तो कुंभार ती पणती घडवत असतो-अगदी नि:स्वार्थपणे, कुठली ही अपेक्षा न ठेवता! त्याला माहीत असते, ही लग्न होऊन सासरी जाणार.... माझे आयुष्य परत माझ्या पत्नीत गुंतणार... या वृक्षाची छाया दुसऱ्याच्या अंगणात पडणार.... तरी ही तो त्याला खत पाणी घालतोच.समजा, जसे आपण केले तसे त्याने केले तर मग कुठून येईल तुमचा वंश चालवायला मुलगा? पत्नीच नाही तर सगळे व्यर्थ! तो त्याचे काम नि:स्वार्थपणे करतो पण आपण स्वार्थी माणसे त्याच मुलीने जर एखाद्या मुलीला जन्म दिला तर तिच्यावर ताशेरे ओढतो.काही महाभागतर जीवे मारतात कारण त्यांना दुसरी सून आणून किंवा पत्नी आणून मुलगा जन्माला घालायचा असतो.पण मुलगा अथवा मुलगी होणे हे सर्वस्वी पुरुषावर अवलंबुन असते हे विज्ञानाने सिद्ध केले आहे पण मुलगा होत नाही म्हणून पोटच्या मुलाला मारणारे आईबाप आपण पाहीले का? किंवा आपल्या मुलीला मुलगा होत नाही म्हणून कुणी जावई मारलाय हे आपल्याला बघायला मिळाले का?नसेल, मग हा ठेका काय विधात्याने फक्त मुलाच्या आईबापाला दिलाय की काय अशी ही शंका वाटते. अरे दुसऱ्याच्या घरातून आलेल्या मुलीने तुमचा वंश पुढे चालावा म्हणून मुलगाच जन्माला घालावा, असा तुमचा हेका असतो पण तुमच्यासाठी ज्यांनी मुलगी तुमच्या घरात पाठवली, त्यांच्या उपकाराची फेड म्हणून का होईना मुलीला जन्माला येऊ द्या.पण तशी मानसिकता असावी लागते तसा सद्विचार अंगी असावा लागतो. पण आमच्या अंगी तसे मोठेपण यायला किती काळ लागेल सांगता येत नाही. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण याऐवजी जया अंगी मोठेपण त्याची किर्ती महान हे वाक्य याबाबतीत तरी घोषवाक्य व्हावे.
स्त्री मुलाला जन्म देत नाही म्हणुन तिला जीवे मारणारे नराधम आज ही पहायला मिळतात. कुण्या बापाने लाडाने वाढवलेल्या कन्येला मारताना लाज कशी वाटत नसेल त्या नालायकांना? त्यात काही स्त्रियाही असतात, त्यांनी तरी याला विरोध करायला हवा.पण नाही, काहीवर जबरदस्ती केली जाते तर काही स्वतःहून
ते पाप करायला पुढे सरसावतात. स्वतःचा वंश पुढे चालावा म्हणुन दुसऱ्याचा वंश चालवण्यासाठी आकार घेत असलेल्या फुलाला गर्भातच कुस्करायला एक स्त्री तयार कशी होते या गोष्टीचे नवल वाटते.फेसबुक वर प्रेयसीसाठीची कविता वाचून लाईक ठोकताना प्रेयसीसाठी जसा प्रेमाचा झरा वाहू लागतो. तसा गर्भपात करताना,मुलींना जीवे मारताना तोच प्रेमाचा जरा एकदम कसा आटतो? तेव्हा प्रेम कुठे जाते? एखाद्या मुलीने सुंदरसा फोटो अपलोड केला कि कमेंट सांगायची गरज नसते त्या वेळेस जणू ते लेखक होतात आणि एका पेक्षा एक सरस कमेंट टाकतात. लहान मुलींसाठी क्युट बेबी म्हणणारे आपण वास्तविक जीवनात मुलींसाठी काय करतोय? लहान असताना मला राखी बांधायला बहीन का नाही म्हणून रडणारे मोठे झाल्यावर मला मुलगीच हवी असा हट्ट धरताना फारच थोडे बघायला मिळतात. लिंग गुणोत्तरातला फरक दिवसेंदिवस इतका वाढत चाललाय कि भविष्यात पून्हा पुराणकालीन स्वयंवर करावे लागतील हे नक्की. टीव्हीवर शो म्हणून स्वयंवर पाहायला मिळतोय पण असेच चालू राहीले तर दैनंदिन जीवनात ही असे स्वयंवर घडले तर त्यात नवल ते काय?यासाठी उपाय योजना प्रत्येक घरातून व्हायला हवी,अगदी तळागाळापासून व्हायला हवी. कि याचा ही विचार सरकारनेच करावा असे वाटतेय? नवल आहे राव तुमचे!
सरकारच्या नावाने बोंबा मारायची इतकी सवय पडलीय की आता इथेपण सरकार बोलवायला आपण कमी करणार नाही, हो ना ?
अबबब! धुर्तपणाचा कळस केलाय तुमच्या विचारांनी.तुमचा मेंदू कधी काय विचार करेल काही सांगताच येत नाही.
आपल्या सर्वांना ही मानसिकता बदलावी लागेल कारण आपल्याला वंशाचा दिव्यासोबत वंशाच्या पणतीची पण तितकीच गरज आहे. हे लक्षात घ्यायला हवे, कारण आपल्या घराचा वंश चालवण्यासाठी जर दुसरी व्यक्ती मुलगी जन्माला घालतेय तर दुसऱ्या कुणाचा तरी वंश चालवण्यासाठी आपण मुलीला जन्म दिलाच पाहीजे हे जाणले पाहीजे. तरच सृष्टीचे संतुलन टिकून राहील, अन्यथा भविष्यात मुलींसाठी मारामाऱ्या, लढाया सुरु होतील.बलात्कारांची संख्या किती वाढेल सांगता येत नाही. कुणी असेही म्हणत नाही कि मुलगी होत नसेल तर डझन भर मुले जन्माला घाला पण गर्भात मुलींना मारणे तर थांबवू शकता ना ? का ती ही देवआज्ञा आहे? का जिथे तिथे त्याला बदनाम करतो आपण? चांगले झाले तर आम्ही मेहनत केली आणि त्याची कृपा होती साथीलाआणि वाईट झाले तर त्याची तशी इच्छा होती असेच ना? अरे कधीपर्यंत दुसऱ्याच्या नावाने खडे फोडणार?स्वतः काही तरी करा.... मुलीला जन्म देणाऱ्या स्त्रीला त्रास देणे थांबवा . इतके तर करा कारण सृष्टीकर्त्याने जगण्याचा अधिकार फक्त तुम्हालाच नाही दिलेला! तो अधिकार प्रत्येकाचा आहे मग ती मुलगी असो वा मुलगा. त्या चिमुकलीचा जीव नका घेऊ आणि त्या वंशाच्या पणतीला आकार घेऊ द्या. आपण सुरवात तर करा, चांगले बीज पेरले तर फळ ही चांगलेच मिळेल यात शंका नाही. म्हणतात ना,
"शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी!"
© शिवा चौधरी(कळमसरेकर)
जामनेर, जळगांव
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें