रविवार, 30 अक्टूबर 2016

मराठी

*मराठी*

शब्दांचे बांधून बंगले
वसवला माझा गाव रे
कानामात्रांच्या वेशी मध्ये
लकाके मराठी नाव रे

माय मराठी माझी  देते
हर्ष   मनाशी   ममतेचा
वाक्यातूनी संदेश वाटे
जना जनाशी   समतेचा

चिता बदले चिंते मध्ये
अनुस्वार बसता हाशी
चिंता पेटवी जित्यापणी
चिता जाळे मृत देहाशी

शब्दातून तिच्या लिलया
गोड कविता पाझरती
अर्थाचा अनर्थ करिती
विराम चिन्हे ओझरती

सांगतांना महती तिची
शिवा थकणार नाही रे
झेलत लाटा मराठीच्या
उभा आनंदाच्या डोही रे

🏽 *शिवा चौधरी*
*जामनेर,जळगांव*

शुक्रवार, 28 अक्टूबर 2016

दिवाळी

👮🏽 *दिवाळी* 👮🏽

बाबा दिवाळीला येताय ना ……?
आम्ही तुमची वाट बघतोय………

बाबा फराळ नको आम्हाला, तुमच्या सोबत खेळायचंय……

मिठाई तर अजिबात नको, आईच्या चेहऱ्यावरची नाजूक खळी बघायचीय………

आणि फटाके तर नकोच नको फक्त चार पणत्या तुमच्या सोबत लावायच्याय………

एक निर्भयासाठी………
एक शेतकऱ्यासाठी……
एक तुमच्या 👮🏽मित्रांसाठी……
एक अनाथ👫 बालकांसाठी………

बाबा आम्ही ही काहीसे तसेच आहोत ना? तुम्ही असून ही अनाथ………!

असू द्या बाबा, नका येऊ यंदा ही……
फक्त मागच्या वर्षी प्रमाणे एक आश्वासन जरुर द्या कि पुढच्या वर्षी नक्की येईल………

पुढच्या वर्षी ही नाही जमणार तुम्हाला बहूतेक……

पण तरी ही मी वाट बघतोय………

बाबा याल ना ?…………!

*शिवा चौधरी*
*जामनेर,जळगांव*

शनिवार, 15 अक्टूबर 2016

गणिका

गणिका

मौजेसाठी खरीदतो
पोटासाठी विकते मी
तू बदलले जितके देह
तितकेच बदलले मी

कुणी आणलं इथंवर?
तुमच्या कुचालीरितीनं
तुम्ही वाटलेल्या जातीनं
कुठं उपासमारिच्या भितीनं

हो करते अश्लिल इशारे
कामुक हसते सुद्धा मी
तुमच्याच चिकण्या शब्दात
अवचित फसते सुद्धा मी

मुलगी बनलिय गणिका
मुलगा आपला दलाल
तुझी ही तितकीच जरी
इज्जत माझी होते हलाल

माझ्या इज्जतीचं काय!
ती विकलीय मी बाजारात
तु घेतली  होती प्रेमानं
कुणी घेतली हजारात

तुझी इज्जत लिलाव होतेय
ज्याचं तुला भानच नाही
तुच करुन गेलास पोटूशी
ज्याची तुला जाणंच नाही

आज तिच पोर जवान झाली
सौंदर्याचं लेणं ही ल्याली
तुझ्या छत्र छायेविना ती
बघ वेड्या गणिका झाली

तु ही रडणार आतून
जितकी  रडलेय रे मी
तु सडणार तुझ्या कर्मानं
फक्त वेश्या ठरलेय  मी

रांडोपण

रांडोपण(अष्टाक्षरी)

नदी   सुकली  सुकली
नाला आटला आटला
भेगाळल्या      भूईगत
उरं   फाटला   फाटला

बाप  फिरतो  रानात
गुरासंग     अनवाणी
जळे काळीज तयाचं
करपल्या पानावाणी

जळलं  रे  रान   सारं
कशी थापावी भाकरी
आमुच्याच शेतामंधी
आम्ही करितो चाकरी

बापासंग  माय    खटे
रातदिन    रानोमाळी
चंद्रकोर      कपायाले
लाल लावुनिया भाळी

पोटामंधी घास नाही
तरी   धन्याचं भुषाणं
माय हसे  गालामंधी
बळ  आणून    उसणं

वैतागुनिया     बापानं
जीव दिला असाकसा
सुनं   कपाय    पाहुनी
माय   रडे   ढसा ढसा

माय  व्हती  सवासिन
शोभे    कुकू   कपायले
का रे दिलं *राडोपण*
देवा तिच्याच वाट्याले

शिवा चौधरी
जामनेर,जळगांव

शुक्रवार, 14 अक्टूबर 2016

नात्यांचा वृक्ष

*नात्यांचा वृक्ष*

नात्यांचा वृक्ष खूप होता बहरला
पानं फुलं फळांसोबत छान होता तरारला

दृष्ट लागावी अशी त्याची ख्याती
वृक्ष ही पाखरा संग जपत होता नाती

कुठून तरी एक मैना उडत उडत आली
सोबतीला कुलूषित मनाची वाळवी घेऊन आली

वाळवी लागली खोडाला अन् गळु लागली पाने
वाळवीच्या वाणाने कुलूषित झाली मने

पहात होता राघू सारं दुरून टकामका
नात्याच्या वृक्षावरचा त्याला दिसत होता धोका

वाळवी साठी राघूनं मिठाचे खडे आणले चार
राघूलाच मग वृक्षानं मग केला हद्दपार

मिठाचा खारटपणा वृक्षाला कळलाच नाही
मिठा शिवाय जेवनाला ही चव येत नाही

वृक्षाला हवा होता गोडवा साखरेचा राघूकडून
कळला नाही त्याला धोका मधुमेहाचा गोडाकडून

हरलं उपदेशाचं मिठ जिंकली पैशाची साखर
वृक्ष पानाफुला फळावीन  होऊन पडला जर्रजर्र

आता वृक्ष नात्यांचा ईन्सुलिनवर जगतोय
अजूनही राघू नुसत टकामका बघतोय

कधी बहरेल कोन जाणे वृक्ष पुन्हा नात्यांचा
कधी सरेल कोन जाणे मोह साखर पोत्यांचा

*शिवा चौधरी*
*जामनेर,जळगांव*

बुधवार, 12 अक्टूबर 2016

बलात्कार

*बलात्कार*

टिव्ही वर बातमी पाहून
चिमुकलीनं प्रश्न केला
चार वर्षाच्या वयात आई
बलात्कार कसा झाला

काय असतो बलात्कार
आई सांग ना गं मला
का ?कुणी?केव्हा?कसा?
कुणावर गं तो केला

काय देऊ उत्तर तिला
काहीच मला सुचेना
गोंधळून चित्र सुध्दा
टिव्हीवरचं दिसेना

कुठं शेजार पाजार
कुठं मास्तर घेतोय बळी
कोण घालणार कोन जाणे
या वासनांधांना गोळी

गदा गदा हलवून मला
म्हटली आई भानावर ये
खूप सतावतोय प्रश्न हा
आज उत्तर नक्की दे

भेदरुन म्हटलं तीला
बाळ शाळेत नको जाऊ
वाटलं तिला पुन्हा आज
गर्भात सामावून का घेऊ

शाळेत नको जाऊ आई
मग कशी घेऊ गरुड झेप
माझ्यावर ही होईल का गं
असाच कधी गैंग रेप

आता तू तरी सांग ना रे
देवा तिला काय उत्तर द्यावं
पदराला बांधून फिरावं
कि गळा दाबून मारावं

🏽 *शिवा चौधरी*
*जामनेर,जळगांव*

सोमवार, 10 अक्टूबर 2016

मैथून

*मैथून*

आज मला एक विचित्र माणूस भेटला
काय असतं मैथून कवितेत सांग म्हटला

विलक्षण वाटली मला तयाची ईच्छा
कवीमनाची माझ्या अवघड होती परिक्षा

सुरवात केली सांगायला थोडं मी थबकून
पराग कणांचं आदान प्रदान तेच फुलांच मैथुन

प्रत्तेकच सजीवात अशी क्रिया होत असते
सृष्टिचक्राच्या गतीसाठी मैथून घडत असते

प्राणि पक्षि गुरं ढोरं कुणी नाती जाणत नाही
जी जाणतात नाती त्यांना गुरं म्हणत नाही

अन्ना प्रमाणे मैथूनाची शरिरास गरज भासते
शारिरीक भाषेतून भूक फक्त त्याची दिसत असते

मैथूनावर बोलणं समजू नको घृणित वाचा
उघड्यावर होत नसतो संभोग मानवाचा

प्रसव स्त्रीचा पडद्याआड गुरं उघड्यावर जणतात
म्हणुन भल्या मानसा आपणास माणूस असे म्हणतात

अजून मी दुविधेत आहे त्याला म्हणावे का? विकृती
कि प्रश्न करुन मज तो जाणत होता प्रकृती

*शिवा चौधरी*
*जामनेर,जळगांव*

शनिवार, 8 अक्टूबर 2016

आयुष्याची संध्याकाळ

*आयुष्याची संध्याकाळ*

एकाकी मनाचा हिंदोळा कसा झुलवू सांगा
आयुष्याची संध्याकाळ कशी घालवू सांगा

ती माझीप्रशस्त शिड मी तिचं गलबत
शिडाविन गलबत कसे चालवू सांगा

वाटते तीने खेळावे मज सवे पारंब्या
पारंबी मी एकटाच कसा हलवू सांगा

आस आहे आज ही आठवात जगण्याची
आठवांची समई ती कशी मालवू सांगा

तीच्या विन गड्या मी दुःखी असे निरंतर
सुखी आहे म्हणून मान कशी डोलवू सांगा

दूर गेली कायमचीच मज सोडूनिया
सुकल्या कंठाने तिला कशी बोलवू सांगा

एकाकी मनाचा हिंदोळा कसा झुलवू सांगा
आयुष्याची संध्याकाळ कशी घालवू सांगा

*शिवा चौधरी*
*जामनेर,जळगांव*

मंगलवार, 4 अक्टूबर 2016

माणूस आणि देव

माणूस आणि देव

माणसांच्याच सोईचे राऊळे हजार येथे
राऊळी दैवतांचा भरला बाजार येथे

अंगणी त्याच्या लाख मेले काकडून हिवाने
मखमली चादरीने झाकती मजार येथे

भोळ्या-भाबड्यांचा पैका होतो क्षणात परका
दानाने देवभोळ्यांच्या माजले शेजार येथे

दर्शनास धोंड्याच्या दर सुची झडकवती
लाच दिल्यावर ही भक्त होई बेजार येथे

धर्म मार्तंडांना सोडवेना धनाचा गोडवा
जरी मधुमेहाचा जडलाय आजार येथे

शिवा चौधरी
जामनेर,जळगांव

शनिवार, 1 अक्टूबर 2016

माणूसकी

स्पर्धॆत……

पाखरांच्या गाण्यावर
सूर लावते   कोकिळा
मंजूळ     सूर     ऐकून
मोर होऊ   लागे वेडा

निसर्गाच्या चारोळीत
झरा खळाखळा  हसे
गवताच्या   पात्यावर
दवं मोत्यावाणी   बसे

चांद ताऱ्यांची लावणी
जेव्हा सजली रातीला
रातराणीचा      सुगंध
येई    पहाटे   मातीला

वाघोबाच्या छक्कडीला
कोल्हे    कुईचा   कोरस
ढोलकीच्या    तालासंग
पेटी    वाजवी     सारस

काव्यात माणूसकिच्या
जीव ओतून ही   सारा
कवितेला   मानसाच्या
नाही दिला कुणी थारा

माणसा तुझ्या खेरीज
प्राणि   पक्षि   तरी बरे
मुकेपणी   खूप    सारे
बोलतात  बोल  न्यारे

✍🏽 *शिवा चौधरी*
*जामनेर,जळगांव*

एक मराठा लाख मराठा

एक मराठा लाख मराठा

मी एक मराठा
तु एक मराठा
मराठ्यांच्या उत्कर्षी
देऊ खारीचा वाटा
बघ बघ चाललाय………
एक मराठा लाख मराठा ।।

उगाच वाटेला कुणाच्या
आम्ही जात नाही
नाकासमोर चालतो आम्ही
बापाला कुणाच्या भीत नाही
छाती ज्याची ढाल हात तलवार
तोच खरा धीट मराठा
बघ बघ चाललाय………
एक मराठा लाख मराठा ।।

दुश्मन आमचे सारे
दराऱ्यावर नाचवतो
आई बहिणीची अब्रू
रक्त सांडून वाचवतो
भिऊ नको ताई माई
अजून आहे रक्ताचा साठा
बघ बघ चाललाय………
एक मराठा लाख मराठा ।।

संघटनाची शक्ती
आम्हा कळू लागली
शिवशाही नव्यानं
बघा सळसळू लागली
एकत्रीत होऊ लागलाय
शिवबा तुझा मराठा
बघ बघ चाललाय………
एक मराठा लाख मराठा ।।

मुकेपणीच त्याने
रेकॉर्ड सारे तोडले
अदृष्य तलवारीनं
काळीजं चिरुन काढले
चालता चालता एक मराठा
झाला लाख मराठा
बघ बघ चाललाय………
एक मराठा लाख मराठा ।।

अत्याचार होतोय तिथं
घाल मराठ्या हात
दीन दुबड्यांची मराठ्या
बघू नको रे जात
शांत नितळ पाण्यात
ऊठू लागल्यात लाटा
बघ बघ चाललाय………
एक मराठा लाख मराठा ।।

माळी धोबी कोळि कुणबी
आम्ही एक जात मराठा
दाखवून देऊ जगाला
झंजावात आहे मराठा
जिजाऊ बोले शिवदासा
लेखणीतून दाव शूर मराठा
बघ बघ चाललाय………
एक मराठा लाख मराठा ।।