शुक्रवार, 27 मई 2016

बाप

बाप

ईतुकासा शब्द "बाप"
महती सरता न     सरे
छोट्या मोठ्या दुःखासही
बाप जिद्दीनं   मागं सारे

निसर्गाची मार  भारी
पडे सल काळजावर
खुल्या लोचणातून पाही
मढं, त्याचं तोच सरणावर

रक्ताळल्या पाऊलांनी
बाप औता मागं फिरे
जरी बेतलं  जिवावर
बाप मह्या पुरूनच उरे

जीव       पेरला  मातीत
पाऊसानं     दिला दगा
त्याचं     मातीत दिसती
त्याच्या काळजाच्या भेगा

भेगा बुजण्या कुणीही
नाही फिरकला घरी
तरासून   बाय मह्या
लटकला आढ्यावरी

बापा तुह्या मांगे मायची
बांधाईन   रे     चकरी
वासनांध    बोकडांच्या
जशी कळपातली बकरी

बापा जीव नको देऊ
लढ प्राण पणाशी लावून
एक दिसं सजलं रे धरा
हिरवं  लुगडं     लेवून
हिरवं  लुगडं     लेवून

शिवा चौधरी
जामनेर,जळगांव

अन वांझ पणाचं दुःख मात्र भोगतेय माती

अन वांझ पणाचं दुःख मात्र भोगतेय माती

आ वासून अंबराकडे जणू शुक्राणूच मागतेय "ती"
खरं तर अंबरच झालाय षंढ,
अन वांझ पणाचं दुःख मात्र भोगतेय माती………

गर्भाशयाच्या टिचऱ्या, करपलेल्या गवतात झाकतेय
अती उष्णतॆच्या सेवनानं, तीच माती आग ओकतेय
तीच्या मातृत्वाच्या देणगीला, शाप बनलीय मानव जाति
अन वांझ पणाचं दुःख मात्र भोगतेय माती………

वृक्ष तोडून आम्हीच तीची, गर्भाशयाची नाड काटली
रजोनिवृत्तीत आटणाऱ्या रक्तागत, विहिरीतली झिरं ही आटली
आमच्याच दोषातून लागलीय आम्हा साडेसाती
अन वांझ पणाचं दुःख मात्र भोगतेय माती………

पावसाचं अनियोजन आपलं, प्रदूषण ही आपलंच
निष्काळजी सरकारं ही आपलं, त्यांचं बिनकामी भूषण ही आपलंच
रासायनिक खतापायी बरबाद होतेय शेती
अन वांझ पणाचं दुःख मात्र भोगतेय माती………

योजना जाताय बारगळून, पाण्यापासून फारकत घेतय धरण
वृक्षारोपण फक्त कागदावर, अन सेल्फीत सामावलयं मरण
मरणाऱ्या शेतकऱ्या ऐवजी पुढारी जपतोय  नाती
अन वांझ पणाचं दुःख मात्र भोगतेय माती………

कोऱ्याठण सातबाऱ्यावर, सांगा होणार कसा फेरफार
बिन नवऱ्याच्या बाईगत, मातीचा ही गर्भ नाहीच फुलणार
एसी त बसून मानवाची गहाण पडलीय मती
अन वांझ पणाचं दुःख मात्र भोगतेय माती………

शिवा चौधरी
जामनेर,जळगांव

रविवार, 22 मई 2016

विरह गाणे

चंद्र ओंजळीत

मला वाटले,
चंद्र ओंजळीत आला.
तुझ्या असण्याचा,
मला आभास झाला.

खिडकित बसूनी;
मी चांदण्यात न्हाते,
तुझ्या आठवांचे;
सख्या गीत गाते,
गीतात माझ्या;
तू उतरुन आला………

या शुभ्र राती;
तू ये ना एकदाच,
ये ना जरा तू;
माझ्या कवेत,
कुशित माझ्या;
तू अबोल झाला………

मनाने माझ्या;
झुगारला पदर,
तुझ्या आठवांचा;
अंतरी व्हावा गजर,
गजराचा ध्वनी ;
मग बेफाम झाला………

निजतांना जेव्हा;
काजवे गीत गाती,
चंद्राचे कवळसे ;
मज छेडून जाती,
कवळसा एक,
हळू आत आला………

भासातून  एकदा;
तू ये वास्तवात,
मनाला नको रे;
टाकू विस्तवात,
निखारा दिलाचा,
तडपून लाल झाला………

मला वाटले,
चंद्र ओंजळीत आला.
तुझ्या असण्याचा,
मला आभास झाला.

शिवा चौधरी
जामनेर,जळगांव

शुक्रवार, 20 मई 2016

माझ्या प्रेमात वेडा झाला

माझ्या प्रेमात वेडा झाला

आला आला रे फेरीवाला
माझ्या प्रेमात वेडा झाला ||धृ||

होऊन सायकलवर स्वार,
वर केळांचा भार
गल्लीबोळात बोभाटा केला
माझ्या प्रेमात वेडा झाला…………

त्याला खिडकी आडून,
मी पाहीला दडून
कावरा बावरा झाला फेरीवाला
माझ्या प्रेमात वेडा झाला…………

मी आवाज दिला,
तो पळत आला
मज निरखून पाहू लागला
माझ्या प्रेमात वेडा झाला…………

केळं डझन भरं,
ठेवले हातावरं
भाव केळांचा नाही केला
माझ्या प्रेमात वेडा झाला…………

झाले लाजून चूरं,
धडधडला ऊरं
जसा नजरेचा बाण मारियला
माझ्या प्रेमात वेडा झाला…………

मी उगा चिडले,
अन मागं वळले
तो मंदमंद मिशीत हसला
माझ्या प्रेमात वेडा झाला…………

त्याचे बघून चाळे,
प्रश्न मनी पडे
हा होईल का? माझा दादला
माझ्या प्रेमात वेडा झाला…………

बघून गबरु गडी,
मी ही झाले वेडी
मनोमनी त्यासी वरीयला
माझ्या प्रेमात वेडा झाला…………

शिवा चौधरी
जामनेर,जळगांव

मंगलवार, 17 मई 2016

भाऊ बोहल्यावर…………

भाऊ बोहल्यावर तू जाsssय………

काय सांगू बायकोची कsssहाणी…
मी तीन बायकाचा धनी
भाऊ बोहल्यावर तू जाsssय………
अन् लगीन करुन पहाय………|| धृ ||

झालं पह्यलं माह्य सो   यर
संग तीन पोरायचा आहेर
पोरं जपती माय पाशी
माह्य आथरुन घरा बाहेर
भाऊ बोहल्यावर तू जाsssय………
अन् लगीन करुन पहाय………[1]

आली दूसरी माही बाई
संग बीन लगीनाची ताई
का केली लगीन घाss ई
ताई उमजू दे ना काही
भाऊ बोहल्यावर तू जाsssय………
अन् लगीन करुन पहाय………[2]

बाय तिसरी माह्यी गोssड
तिले माह्येराची ओढ
म्हणे नांदीन तुया संगति
पहले सवती माह्या सोड
भाऊ बोहल्यावर तू जाsssय………
अन् लगीन करुन पहाय………[3]

भाऊ सां …ग…  तो  रे खरी
बस एकच बायको बरी
जर करशी बायका चाss र
जीव जाईल खाटल्यावरी
भाऊ बोहल्यावर तू जाsssय………
अन् लगीन करुन पहाय………[4]

शिवा चौधरी
जामनेर,जळगांव

रविवार, 15 मई 2016

रानवारा

🌿🍀रानवारा🍀🌿

चंद्रकळी रूप तुझे,सहवास धुंदवारा
आठवात तुझ्या उगा, झोंबतो रानवारा !

उगा झोकतो मी, कामात मन माझे
कामात ही कैकदा, झोंबतो रानवारा !

झोंबूनिया तनावर, उठती गोड शहारे
शहाऱ्यातून मनाला, झोंबतो रानवारा !

तरंगे मनाच्या डोही, वलयात लुप्त होती
तरंगास ही डोहाच्या, झोंबतो रानवारा !

निपचित देह सारा, तुझ्या विरहात
थंडगार देहास ही, झोंबतो रानवारा !

रक्तपर्णे अधरे तुझी, फिरली कधी गाली
गालास ही मग त्या, झोंबतो रानवारा !

एक एक क्षण माझ्या, जाळून जाई हृदयास
लालबुंद हृदयास ही, झोंबतो रानवारा !

शिवा चौधरी
जामनेर,जळगांव

शनिवार, 14 मई 2016

थ्री इन् वन (सर्वोत्कृष्ट)

थ्री इन् वन स्पर्धॆसाठी………

शिवाजी राजे  आमचे
निश्चयाचा    महामेरू
उगाच नव्हतं      श्रेष्ठ
त्या जिजाऊंचं लेकरु

आशा होती मावळ्यांची
स्वराज्य स्थापिती राजे
म्हणून माझ्या   राजांचा
तिन्ही लोकी डंका बाजे

यश   राजांच्या     पदरी
विनोदानं   आलं    नाही
स्वराज्यासाठी राजांनी
काय   काय   केलं नाही

माझ्या आऊंचा वारसा
नारी गं तू घेशिल का?
जन्म एका शिवबाला
सोनाली तू देशील का?

मुजरा    राजे       मुजरा
मुजरा       करतो   शिवा
माझिया राज्यांची किर्ती
मनी     साठवूनी      ठेवा

🏽शिवा चौधरी
जामनेर,जळगांव

मंगलवार, 10 मई 2016

उखाणा

उखाणा स्पर्धॆसाठी………
(वृषाली ताईंच्या वतीनं)

वाद्यात वाद्य ढोलकी छान
लावणीत ती भरते जान

लावणी चा ठेका भारी
नाव ऐकण्या आतुरल्या पोरी

पोरींनी घातल्या शालू नी पाटल्या
ढोलकिच्या तालावर नाचत सुटल्या

एकिचा पाय मुरगळला
केसातला हार चुरगळला

केसात हार मोगऱ्याचा
मोगऱ्याचा सुगंध छान
……………राव माझे सर्वात महान !

🏽शिवा चौधरी
जामनेर,जळगांव

त्राही त्राही

त्राही त्राही

धर्म     धर्म   करु  नका
नका काढू उगा खोड्या
बघतोय   मी   रे    सारं
नका करु    कुरघोड्या

अक्स   माझा  नसून ही
वर       चादर      हिरवी
धर्माच्या तू   नावाखाली
का ? रे भीति मना भरवी

रंग  केला   लाल   माझा
शेंडीला     तूप      तुझ्या
धाक दावतो माझा जना
अन तुच   करतो    मजा

शिकली सारी आता
तुला लावतील घोडे
तोड    तुझे   ताविज
धागे ढिले सोड थोडे

का  वेद     कुराणाचे
ज्ञान सांगतोस मोठे
वाचतिल तेच   सारं
करतिल   खरे खोटे

सत्य जरी वेद तुझे
जर सत्य ते पुराण
का लादतोस गिता
का लादतो कुराण

धर्म       एक     सारा
समजवं साऱ्या जगा
मानवतेचा    मानसा
तु सोडू  नको  धागा

मी   नाही   कुणी    ईश्वर
मी नाही  कुणी     अल्ला
स्वार्थासाठी लालच्यांनो
नका   करु    हो   हल्ला

जगू   दे  रे मानवाला
नको पाडू पचड्यात
साऱ्या जाती धर्मास
बांध एक बुचड्यात

मी  निमित्त  रे   फक्त
सुत्र सारे तुझ्या हाती
विण  एका  वेणीत  रे
वाचवण्या  ही   माती

नको    वाटू     धर्मात
नको    वाटू    जातीत
हेच    धर्म    एकदिनी
गाडतिल तुज मातीत

राख    तुझी    करतील
ते    जित्या   पणी बाबा
नाही   तारणार     तुला
कुणी काशी आणि काबा

म्हणून सांगतोय तुला
फक्त मानवता पेरावी
मेला जरी आज तरी
किर्ती    येथे    उरावी

नका करु शिया सुन्नी
नको  ब्राह्मणानी  शुद्र
वाट  फक्त  गोडवाच
नको    वाटू  बोलभद्र

नाही कुठली   जादू इथं
नाही   कुठली      लिला
ना मुस्लिंमांचा जॅक इथं
ना    हिंदूंचा      वशिला

एकच  सृष्टिकर्ता  मी
अन् एकटाच विधाता
बाण जरी    खूप सारे
पण एकच माझा भाता

नाव   तया  तुच  दिले
भलत्या सलत्या रुपाने
जगू   दे   रे     मानवास
जगू   दे   तू       सुखाने

पोटासाठी      भटकती
ती     सारे     गावोगावा
ना समज     ते   बिचारे
ना समजती तुझा कावा

खडसावून सांगतो रे
शेवटचे    तुला      मी
ते सहणार नाही    रे
तव धर्माची   गुलामी

ध्यानी येता डाव सारे
घालतिल   रे     गोळी
कुणी करेल    हलाल
कुणी पेटविल   होळी

कधी उंच उडवतील
ते   तुला    आसमंती
अन् केला जर कहर
मग गाडेल हिच माती

मग   रडू    नको  तु रे
जिता जाता सरणावर
कुणी   रडणार   नाही
तुझ्या अशा मरणावर

किती सांगू बाबा तुला
सुधारणा     रे      थोडं
मज   ही    ज्ञात  नाही
काय वाढलयं तुझ्यापुढं

नका   वापरु मला रे
या धर्माच्या बाजारी
विट तुझ्या भांडणांचा
भांडणे आली जिव्हारी

एक दिवशी शिकविण
धडा तुला चांगलाच
जर का ठेकेदारा तू
अविवेकी वागलास

मी रे जरी मोठा इथं
पण खेळ तुझा सारा
भरले तुझे दिस आता
आवर  तुझा   पसारा

मी जर का खेळ केला
तू     सोसणार    नाही
खेळ     माझा    दाहक
होशिल    त्राही   त्राही !
होशिल    त्राही   त्राही !
होशिल    त्राही   त्राही !
होशिल    त्राही   त्राही !

शिवा चौधरी
जामनेर,जळगांव

गुरुवार, 5 मई 2016

मानवता

मानवता

कसे जगावे या जगी लय सांधतो मी
पुण्य सोडून का मग पाप सांधतो मी

केल्या चिंध्या मीच माझ्या तत्वांच्या
लाजून बोचक्यात लाज बांधतो मी

सत्तेसाठी इतका मी हपापलेलो
नात्यांना ही मग तंदूरीत रांधतो मी

वासनेची का भूक लागली देहास
निरपराध सावज का शोधतो मी

स्वार्थ इतका येथे बोकाळला प्रकर्षाने
स्वार्थ्यांच्या गोटात स्वार्थ शोधतो मी

जळून खाक झाली निखारे मानवतेची
विझलेल्या निखाऱ्यात आग शोधतो मी

सुविचार

🌸 सुविचार  🌸

झोपून राहीलं तर नुसते स्वप्न बघता येतात,
पण जागे झालात तर तीच स्वप्न पुर्ण करता येतात.
जागे व्हा आणि निघा स्वप्न पुर्ततेच्या ध्येयाकडे………
यश आपली वाट बघतयं.

शुभ प्रभात ! 😊💐🙏🏽

जय जिजाऊ जय शिवराय

सुविचार :- शिवा चौधरी
                जामनेर,जळगांव

शिवाचे सुविचार 19/05/16

ध्येय प्राप्त करायचं असेल……

तर आकाशाला गवसणी घालण्याच्या प्रयत्नात रहावे,

पडतिल हात अपूर्ण कवटाळायला आकाश !!

पण मेहनत ईतकी करावी, कि आकाशानेच लहान व्हावे.

शिवा चौधरी
जामनेर,जळगांव

शिवाचे सुविचार

सर्वात अगोदर विस्वास संपादन करायला शिका.

मग विश्व आपल्याला श्वास थांबल्यावरही विसरणार नाही,

कारण विश्वासातच "विश्व आणि श्वास" दोघं दडलेले आहेत !!

शिव सकाळ शुभ सकाळ

शिवा चौधरी
जामनेर,जळगांव

सोमवार, 2 मई 2016

विठ्ठला$$$$$

चित्र काव्य स्पर्धा………

विठ्ठला sssss तू माय बाप खरा…………

तुझिया नामाने चालतो पसारा,
विठ्ठला sssss तू माय बाप खरा…………

मनी जडला हा संगिताचा नाद
मन रंगले रे तव भजनात
येवूनी एकदा भेट जरा,
विठ्ठला sssss तू माय बाप खरा…………

कानी कुंडले नी भाळी अष्टगंध
मना लागला रे विणेचाच छंद
येवूनी मजसवे ताल धरा,
विठ्ठला sssss तू माय बाप खरा…………

आम्ही वारकरी तू ओंकार स्वरुप
मम लोचणी ते तुझे विश्वरुप
मिटूनी लोचणे बघे खेळ सारा,
विठ्ठला sssss तू माय बाप खरा…………

शिवदासे रचिले भजन तुझे रे
निमित्त जन्मदिन अरविंद शेलारे
चित्रकारी तयाची बहरु दे जरा
विठ्ठला sssss तू माय बाप खरा…………
✍🏼शिवा चौधरी
जामनेर,जळगांव

आता तरी माणसा माणसावाणी वाग……

आता तरी माणसा तू माणसावाणी वाग……

पुरे जीनं कुतऱ्याचं
आता बन तु रे वाघ
आता तरी माणसा तू
माणसावाणी वाग……

पैशासाठी खूण झाले
शौकासाठी गुन्हे
माणसाचा जन्म भेटला
आता काय तुला उणे
फायद्यासाठी वापर तुझा
करती महाभाग
आता तरी माणसा तू
माणसावाणी वाग……1

काय होतं तुझं इथं
काय कमवशिलं
इथलंच सार बाबा
इथंच गमवशिलं
हाय पैसा हाय पैसा
नुसता लालसेचा भाग
आता तरी माणसा तू
माणसावाणी वाग……2

चिखल झालाय नुसता
शिरु नको खोलात
भिकेला लागली कुणी
कुणी गेली जेलात
लालसेची कधी इथं
शमत नाही आग
आता तरी माणसा तू
माणसावाणी वाग……3

धर्माच्या नावाखाली
तुला लावती फास
एका हांडी शिजवती
साले गोस्त आणि मास
तरी तुला रे कसा
येत नाही राग
आता तरी माणसा तू
माणसावाणी वाग……4

तुझी बहीण जपावी
दुसऱ्याची लुटावी
रात्री धंदे पापाचे
दिवसा माळा जपावी
मरतील एके दिनी
कुकर्मी हे घाग
आता तरी माणसा तू
माणसावाणी वाग……5

जात नाही धर्म नाही
नाही मोठा इथं कुणी
सुंदर नाही धर्म कोणता
इथं मानवतेवानी
माणसातला माणूस तू
ओळखायला लाग
आता तरी माणसा तू
माणसावाणी वाग……6