अन वांझ पणाचं दुःख मात्र भोगतेय माती
आ वासून अंबराकडे जणू शुक्राणूच मागतेय "ती"
खरं तर अंबरच झालाय षंढ,
अन वांझ पणाचं दुःख मात्र भोगतेय माती………
गर्भाशयाच्या टिचऱ्या, करपलेल्या गवतात झाकतेय
अती उष्णतॆच्या सेवनानं, तीच माती आग ओकतेय
तीच्या मातृत्वाच्या देणगीला, शाप बनलीय मानव जाति
अन वांझ पणाचं दुःख मात्र भोगतेय माती………
वृक्ष तोडून आम्हीच तीची, गर्भाशयाची नाड काटली
रजोनिवृत्तीत आटणाऱ्या रक्तागत, विहिरीतली झिरं ही आटली
आमच्याच दोषातून लागलीय आम्हा साडेसाती
अन वांझ पणाचं दुःख मात्र भोगतेय माती………
पावसाचं अनियोजन आपलं, प्रदूषण ही आपलंच
निष्काळजी सरकारं ही आपलं, त्यांचं बिनकामी भूषण ही आपलंच
रासायनिक खतापायी बरबाद होतेय शेती
अन वांझ पणाचं दुःख मात्र भोगतेय माती………
योजना जाताय बारगळून, पाण्यापासून फारकत घेतय धरण
वृक्षारोपण फक्त कागदावर, अन सेल्फीत सामावलयं मरण
मरणाऱ्या शेतकऱ्या ऐवजी पुढारी जपतोय नाती
अन वांझ पणाचं दुःख मात्र भोगतेय माती………
कोऱ्याठण सातबाऱ्यावर, सांगा होणार कसा फेरफार
बिन नवऱ्याच्या बाईगत, मातीचा ही गर्भ नाहीच फुलणार
एसी त बसून मानवाची गहाण पडलीय मती
अन वांझ पणाचं दुःख मात्र भोगतेय माती………
शिवा चौधरी
जामनेर,जळगांव
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें