सोमवार, 30 नवंबर 2015

स्त्री ची साडेसाती

स्त्री ची साडेसाती

काय म्हणु देवा तुज
लाज उरली का नाही
आळा घालतांना का रे
तुज दिसे फक्त बाई……

माझ्या विटाळांच तुला
पाप कसं रे चढलं
पुजा करणारं थेर
स्त्री विटाळात वाढलं……

साऱ्या जगाला दावसी
तु रे तुझी साडेसाती
तुला सोसणार नाही
देवा स्त्रीची साडेसाती……

मी रे जिजाऊ इथली
सती प्रथा बंद केली
तुझ्या विस्वस्थांनी आता
तुझी शामत आणली……

पति पुत्र दोन वाघ
तुज झेपणार नाही
तुझ्या अष्टमात जर
आली कुणी धुर्त बाई……

छळु नको दुबळ्यास
प्रशासनास तु चोप
ज्याने केला सारा खेळ
त्याला दाव तुझा कोप……

घे तेलाचा अभिषेक
घाल त्याच्या जिभी आळा
जर चिडली नं बाई
राऊळाशी लागे टाळा………

© शिवा चौधरी
     जामनेर,जळगांव

अभंग

अभंग

देह हे मंदिर
कर्म हिच पूजा
नाही भाव दूजा
अंतरी या………

देव का? भजावे
उगा दगडांचे
देव सकळांचे
माता-पिता………

सत्संगी करावी
दुबळ्यांची सेवा
अनाथांशी मेवा
द्यावा सदा………

देव या जगती
सर्वांचाच एक
नावे ती अनेक
दिली त्यासी………

देवाचे स्वरूप
कुणा न कळले
नावे ते पडले
कल्पनेने………

सोन्याचे आसन
मागतो का? देव
उगा उठाठेव
कशापायी………

सुवर्णाच्या दानी
गोदामे भरती
भुकेने मरती
भक्त काही………

डाव हा पैशाचा
कळे जनोजनी
बोलेनाच कुणी
भीति पोटी………

दानाचे रहस्य
समज रे भक्ता
चालवती मक्ता
ढोंगी जन………

महापुरूषांचे
स्मरण करावे
वाटसरू व्हावे
तया मार्गी………

अभंग शिवाचा
सत्याकडे नेई
कळले का काही
त्याच्यातून………

©शिवा चौधरी
    जामनेर,जळगांव

रविवार, 29 नवंबर 2015

शिवबांचा जागर

।। शिवबांचा जागर ।।

असत्याची मळून माती
घडवू सत्याची घागरं
जिजाऊंची करु वंदना
घालु शिवबांचा जागर -5 || धृ ||

जगदेव तयांनी असा नमविला
सोन्याचा नांगर फिरवीला
ध्यास स्वराज्याचा हो धरला -2
राजे बसले तोरण्यावर ||1||

जाति अठरा पगड केल्या गोळा
भान हरपूनी लढला मावळा
सोडून अर्धा लगीन सोहळा -2
अशी पिरती राजांवर ||2||

परिवर्तनाची पेटवू नांदी
प्रतिगाम्यांची करुन कोंडी
पुरेगाम्यांच्या काढून झुंडी -2
माट करु अन्यायावर ||3||

शाहू फुलेंचे विचार मांडतोय
ज्ञानाचं चांदणं सांडतोय
सत्यासाठी जगाशी भांडतोय -2
गाऊ अभंग तुकोबांवर ||4||

अंबेडकरांची शिकवण स्मरुया
विकासाची कास धरुया
हक्का साठी सारे लढूया-2
जरी बेतलं जिवावर ||5||

आम्ही शिवबांचे मावळे
गिरवू इतिहासाचे धडे
खरा इतिहास मांडू जगापुढे -2
सारं सांगतो पुराव्यावर ||6||

©शिवा चौधरी
      जामनेर,जळगांव

सुविचार 30/11/15

🎿

तेच 🐤पक्षि त्याच वृक्षी🌳
जमले सारे थव्याने,
तोच 🌞सुर्य तिच धरती🌍
पण दिवस उगवला नव्याने.

उजळल्या दाही दिशा
सोडुन काळोखाच्या उशा,
करु सुंदर दिवसाची सुरवात
शिवाच्या वाचुन ओळी इवल्याशा.

शिव सकाळ🚩
शुभ सकाळ🙏🏼

©शिवा चौधरी
           जामनेर,जळगांव

हास्य विडंबन

हास्य विडंबन

(कॉलेज गॅदरींग च्या वेळच्या कवितेचं विडंबन कवि केशव खटींग सर् यांची माफी मागून )
( मुळ कवितेची सुरवात -> पिपळाचे पान जसे उगवताना लालं गं)

•••••••••••••••••••••••••••••••••

तिरपे तिरपे डोळे तुझे
चपलेलं नाक गं…
नाक गं …… तुझ्या कमरेत वाक गं (1)

काळ्या काळ्या तोंडा मध्ये
पांढरे शुभ्र दात गं…
दात गं……खातो तुझ्या दुधासंग भात गं (2)

आणली तुला घरी
जशी सुखलेली काडी गं…
काडी गं……आता झाली बघ जाडी गं (3)

स्वर तुझा फाटलेला
डि जे चा ढोल गं…
ढोल गं……जरा हळू हळू बोल गं (4)

येशी जवा लाडात
मारु नको शिंग गं…
शिंग गं……आता फुटलं तुझं भिंग गं (5)

शेपटीचा झुपका असा
मारु नको म्हशी गं…
म्हशी गं……बघ पडले सारे फशी गं (6)

हसू नका आता सारे
फिरवाना बोटे हो…
बोटे हो…… मला मार्काचे तोटे हो (7)

©शिवा चौधरी
    जामनेर,जळगांव

शुक्रवार, 27 नवंबर 2015

दिर्घ कविता 800 अक्षरे

दिर्घ कविता
(अष्ठाक्षरी/800 अक्षरे)

दगडा धोंड्या मंधी तू
पोरा शोधू नको देवं
माय बापाच्या कष्टाची
फक्त जाण पोरा ठेवं

मर मरतो रे बाप
अन झिजते माऊली
बाप सोसी अवकळा
तुले मायेची साऊली

सारा दिस शेतामंधी
दोन्ही जोडिनं खटता
तुया शिक्षणासाठी तो
लावे पोटाले चिमटा

जाण कष्टाची ठेऊन
बुकं चारं शिकं पोरा
खऱ्या खोट्याची परख
अभ्यासून कर जरा

इथं वेगळाचं न्याय
दगडाला तुप रोटी
सारा दिन खटून बी
माय निजे भुक्या पोटी

गरिबाचं सारं धन
थोतांडात वाया जाई
किती मेले रे या जगी
पोरा अंधश्रद्धे पायी

किती झाल्या जीवघेण्या
खोट्या खोट्याचं रे प्रथा
देवदासी  मुरळीला
तिच्या विचारा रे व्यथा

धर विज्ञानाची कास
येवू दे रे थोडा चेव
घे ज्ञानाची तलवार
मनी ठेऊ नको भेव

चार चौघं सांगतिल
चल धर्मासाठी लढू
शिवा सांगतो रे तुले
नको पचड्यात पडू

ते करती सोयरिक
एक दुसऱ्याच्या घरी
तुज लढवती सारे
धरमाच्या नावावरी

पोरा समज रे जरा
त्यांचा स्वार्थाचा रे खेळं
भटकवूनी गरीबा
मनी घालती भुरळ

कुणी दावितो कुराण
कुणी दावितो पुराण
देवा धर्माच्या नावानं
जमा करती वैरण

तुयं कापुनिया पोटं
त्याचं भरतो डाडरं
तुले जप्याले गोणटं
तेले रेशमी चादरं

आधी धर्माची भांडणं
मग जातीवर येती
तुया सादगीचा ते रे
भरपूर लाभ घेती

तुया बाप रे अडाणी
त्याचा केला रे कचरा
जसं शिकवलं त्यानं
तसा वागला बिचारा

होऊ नको रे लाचार
तु अज्ञाना पायी पोरा
तुया पुर्वजांचा तु रे
इतिहास जाण खरा

कुणी भुलविल तुज
कथा भाकड सांगून
तुले देतील दाखले
स्वार्थ स्वतःचा साधूनं

पण भुलू नको बाबा
कर तर्कानं विधान
तुया प्रश्ना तुन त्याचं
मन् होईल हैरान

असं होईल रे तेव्हा
जेव्हा शिकशिल बाबा
लोकशाहिवर तु रे
मग मिळवशी ताबा

का? असहिष्णू हा देश
जना वाटाया लागला
जरी सोडेना का कुणी
का रे बोभाटा हा झाला

तेच बोभाटा करुनी
खतं पाणी त्याला देता
गोष्ट असते वेगळी
उगा भांडणं लावता

काय खरं काय खोटं
आता तुय तुचं पाह्यं
तुया वापर विवेक
आणि मग पुढं जायं

नका लढू रे धर्मात
नका लढू रे जातित
जाति धर्माच्या लढ्यात
किती गेले रे मातीत

शिवा सांगतोय फक्त
स्वतःचा रे अनुभव
कसं वागावं जगावं
तुय तुच रे ठरवं

सारे मिळून धरुया
परिवर्तनाची कास
स्वत: संगति करूया
साऱ्या देशाचा विकास

©शिवा चौधरी
    जामनेर,जळगांव

बुधवार, 25 नवंबर 2015

1 दिसंबर बी एस एफ गीत

सीमा सुरक्षा बल

सुनो सुनाऊ सुनो  दोस्तो
यह बल है ऐसा सानी
सीमा सुरक्षा बल कि तुमको
आवो सुनाऊ कहानी - 2

सन् पैंसठ के अतं में
एक रूप नया बना था,
सीमा सुरक्षा बल यह नाम यारों
इसके लिये चुना था ।
खेल कूद हो या हो लढाई
या हो आतंकवाद मिटाना,
दुनिया के हर कोने ने
इसके नाम को जाना ।
चौबिसो घंटे अपनायें
हर मौसम कि रवानी,
सीमा सुरक्षा बल कि तुमको
आवो सुनाऊ कहानी - 2 ।। 1 ।।

शेरों सा दहाडता
हर जवान आया ऐसा,
अलग अलग है प्रांत उसका
पर है दसदस के जैसा ।
जीवन का यह यारों
ऐसा एक जुवां है,
खोकर अपने शेरों को
इसने दर्द सहा है ।
न्यौछावर कर दि इन्होने
देशपर अपनी यह जवानी
सीमा सुरक्षा बल कि तुमको
आवो सुनाऊ कहानी - 2 ।। 1 ।।

हो हिमालय कि चोंटी
या हो गुजरात कि दलदल,
निगाहें ताने बैठा है
हर जवान उसका हरपल ।
जुता वर्दि बंदूक यारों
है इनका श्रृंगार,
लगती है मासुम आँखे
पर बरसाते है अंगार ।
चौकन्नी है निगाहें इसकी
कर न पायेंगे कोई मनमानी
सीमा सुरक्षा बल कि तुमको
आवो सुनाऊ कहानी - 2 ।। 3 ।।

कोई हिंदू कोई मुस्लिम
कोई सिख ईसाई,
आपस का तुम प्यार देखो
जैसे भाई भाई ।
ईद दिवाली, लोहडी ख्रिसमस
संग संग ईसने मनाया,
दुश्मनो के छक्के छुडाने
हर मौका ईसने भुनाया ।
फर्ज के आगे कोई न करता
यहा पर आना कानी
सीमा सुरक्षा बल कि तुमको
आवो सुनाऊ कहानी - 2 ।। 4 ।।

                 ©शिवा चौधरी
                      जामनेर,जळगांव

हास्य कविता

हास्य कविता

माझ्या प्रित फुला
सर्वस्व वाहतो तुला,
एकदाच म्हणं I L U
दहा ₹ देतो मी तुला.

केसात तुझ्या गजरा
डोळ्यात काळा कजरा,
गुटखा खातांना का तू
चोरत होतीस नजरा.

टुकटूकनारे डोळे
मला करती बेहाल,
शेपटी शिवाय दिसते
तू भिंतीवरली पाल.

गाण्याच्या स्पर्धॆत तुला
त्यांनी एक पदक दिलं,
नंतर मोठा कप् देऊन
तुझं तोंड बंद केलं.

वाटलं होतं गाशिल
कोकिळेच्या गळ्यात,
नमले सारे श्रोते
गाढवी स्वराच्या पुढ्यात.

ओठाला लाली चोपडुन
म्हणे आहे मी सुंदर,
आरसा बघ एकदा
कशी दिसते तू मांजर.

तशी तू सुंदर
दिसते बाई खरी,
तुझ्या परीस माझी
कामवालीच बरी.

©शिवा चौधरी
      जामनेर, जळगांव

शनिवार, 14 नवंबर 2015

बालदिन

बालपण

आठवते मज
बालपण माझे
मोठेपण खुजे
तयापुढे……

दहा पैशामध्ये
गोळ्या येती दहा
किती हर्ष तेव्हा
होई मनी……

गोळीची भिंगरी
गरगर फिरे
तोडूनिया दोरे
जाई मुखी……

किती जरी खोड्या
केल्या तरी कुणी
ठेवेनात मनी
ईर्षा तेव्हा……

शेजाऱ्यांची बोरे
हळुच चोरली
दगडे मारली
पाथदिव्या……

जिवाचा खरडा
माय जेव्हा करे
ओलिस ती धरे
आजी माझी……

जसजसे मोठे
होत आम्ही गेलो
हर्षाशी मुकलो
सर्वार्थाने……

वय ही वाढले
चिंता ही वाढली
बदले घडले
जिवनात……

कळलेच नाही
कधी झालो मोठे
हरवले कोठे
बालपण……

मोठे होऊनिया
पैसे कमवली
क्षणे गमवली
स्वर्णमय……

एकदा अजून
लहान पण दे
हवे तितके घे
पैसे माझे……

©शिवा चौधरी
      जामनेर,जळगांव

गुरुवार, 12 नवंबर 2015

दुःखी गाणे

ससा - कासव

बसला कसा सांग ना………
धसका हा माझ्या मनी……
शोधितो रे बाबा मी,
आनंद या जीवनी……… || धृ ||

आई सदा व्यस्त राही,
बाबा तुला वेळ नाही.
छेडतो मजला वारंवार……
गोष्टी मधला राजकुमार……
किती गोड ती भासते,
पुस्तकातली राणी………
शोधितो रे बाबा मी,
आनंद या जीवनी……… || 1 ||

ये ना बाबा ये ना घरा
फिरा   यला नेना जरा
दंगा   मस्ती  चल ना करु
बागे    मधुनी   थोडं फिरु
चल आईस्क्रिम घेऊया……
कुल्फीवाल्याच्या  पेटीतुनी……
शोधितो रे बाबा मी,
आनंद या जीवनी……… || 2 ||

दमलो रे मी खुपच आता
मोबाईलचे खेळ खेळूनी
मज वाटे खुप खेळावे
मित्रां संगे खेळ मैदानी
झाडा आडूनी पाहतो……
खेळ त्यांचे मी डोकावूनी……
शोधितो रे बाबा मी,
आनंद या जीवनी……… || 3 ||

क्रिकॆट्ची रे आवड मजला
कुणी न बोलवी खेळायला
टोलवा टोलवी माझी होते
चेंडु सम हे मन् ही झिजते
अलगत कुणी घ्यावे……
मज वरचेवरी झेलूनी……
शोधितो रे बाबा मी,
आनंद या जीवनी……… || 4 ||

बसला कसा सांग ना………
धसका हा माझ्या मनी……
शोधितो रे बाबा मी,
आनंद या जीवनी………

© शिवा चौधरी
      जामनेर,जळगांव

बाल गित

बालगित

चंद्राच्या या बागे मध्ये गंमत आज करु
आई-बाबा मित्रां संगे खूप खूप फिरू  - 2 ।।धृ।।

हत्ति घोडे सारे आले चिनुच्या संगति
आपआपल्या खेळातल्या सांगू लागले गमती- 2
जिराफ हळुच शहाळे……मला तोडुन देई
हत्तिदादा सोंडे मध्यॆ पाणि घेऊन येई (फुर्रर्रर्र फुर्रर्रर्र)
लांब होत्या चिंचा तरी घेऊन आली खारू
आई-बाबा मित्रां संगे खूप खूप फिरू  || 1 ||

घंटी वाजवत आला बघा आईस्क्रिम वाला
कुणा हवा चोकोबार कुणा हवा वनिला - 2
बाबांनी मग मॅन्गो फ्लेवर मला घेऊन दिला (सुररररर सुरररर)
हळूच माझ्या हातुन तो खालि बघा पडला

(रडवेला होउन👇🏼)

सगळा भास चिनू सगळा आभास
कधी येतील दिवस माझे फुलायचे
झोपाळ्या वाचुन उंच उंच झुलायचे

मित्र आवाज देतात👉🏽 चिनू ओ चिनू ये खेळायला ये…………

(परत इमॅजिन)
अरे टिंगू मंगू सारे आज चेंडूफळीत दंगली
चंद्राच्या या बागेमध्ये मॅच आमची रंगली - 2
चेंडू माझ्या हाती आला पहिली माझी ओवर
टिनू ने मग कंबर कसली दाऊ लागली तेवर
अवघड चेंडूवर ही ती षटकार लागली मारू
आई-बाबा मित्रां संगे खूप खूप फिरू  || 2 ||

पाहुन तिचा खेळ आमची तारांबळ मग झाली
मंगूने मग तिच्यासाठी पुढची ओवर केली - 2
आला चेंडू फुलटच मग उंच उंच तिनं मारला
धावत पळत जाऊन मी झेल तिचा मग धरला…

पुन्हा भास चिनू … हंहंहंहहं…
परत निराश

मंगलवार, 10 नवंबर 2015

शेतकरी आणि दिवाळी

शेतकरी आणि दिवाळी

धीन धीन दिवाळी
गाई-म्हशी ओवाळी
कुठं गेल्या गाई-म्हशी,
शेतकरी पडे तोंड घशी
भर दिवाळीच्या दिवशी………

खिशात नसताना नाना
चार पणत्या लावतो
दुष्काळापायी गाई-म्हशी तो विकतो,
केविलवाण्या चेहऱ्याने
बळि राजाला शोधतो………

ईळा-पिळा जाऊ दे
बळीचे राज्य येवू दे
हे तर जुमलेच झाले,
कुणी स्वार्थी साठी तेव्हा
बळीराज्याला मारले………

पाप कर्म योनीतून
गल्लोगल्ली आज मात्र
स्वार्थी ईथं जन्मास आले,
माझ्या बळीच्या पाठीमागे
किती शेतकरी मेले………

तिळ तिळ तुटूनीया
महागाईच्या सावटी
रोज जगतो मरणं,
त्याचं वस्त्रहरण करी
सावकारी दु:शासन………

राज्य पुन्हा बळीचं येवोनी
फुलूनीया माळ सारा
पोर जाईल सासरि,
तेव्हा खरी ती दिवाळी
माझी होईल साजरी………

© शिवा चौधरी
     जामनेर,जळगांव

दीपावली

दीपावली

दीपों की मालाओं का त्यौहार दीपावली…………

एक दीप सुख लायें
एक दीप समृद्धी,
एक दीप दुख मिटायें
एक दीप लाये वृद्धी।

एक दीप ज्ञान बढ़ाये
एक दे जाये कुछ बोध,
एक हटाये अज्ञान
दुजा मिटाये क्रोध।

एक दीप प्रकाश लायें
एक मिटायें अंधकार,
एक दीप सोच बढ़ाये
एक हराये अहंकार।

एक जैसे है सारे पर
हर दीप यहाँ निराला है,
जलकर तपकर भी
हर एक खुशीओ वाला है।

दीपो की माला का
आया  यह त्यौहार,
खुशीओ कि खूब सारी
कर जायेगा बौछार।

इन दीपो की मालाओ से
तुम भी कुछ सीखो यारों,
दिवाली की मै लेकर आया
शुभकामनायें ढ़ेरो ।

कन्या

कन्या(हिरकणी)

तुझी लागता चाहूल
माझी खुलली गो कळी,
घरा येईल गो माझ्या
एक सोनपरी बाळी………

धडपडून गो तेव्हा
झाले स्वप्न गो साकार,
मज उदरी गो तुनी
पोरी घेतला आकार………

बाबा नाचला गो किती
जेव्हा जन्मास तु आली,
म्हणे गोड हिरकणी
राणि तू गो मज दिली………

घरभर तु गो पोरी
किती नाचली हिंडली,
भावासवे तु गो किती
खोटी खोटीच भांडली………

तुझ्या गुणानं गो कसा
पोरी लावला तु लळा,
तु गो जाशिल सासरी
सुना पडेल ह्यो मळा………

पण दुनियेची रित
तुका जावोच लागेल,
बाबा सवे पोरी माझ्या
धार डोळ्याशी लागेल………

तुझ्या जाण्याने गो बाबा
बघ होईल निराश,
तुझ्या सुखासाठी पोरी
सदा धरितो गो कास………

©शिवा चौधरी
    जामनेर,जळगांव

हृदय स्पंदने

हृदय स्पंदने

आपापल्या परी जन
जाता कराया सुलटे
प्रारब्धाचे भोग त्याचे
येथे होतिया उलटे………

खिचडीच्या व्यापा पायी
मर मरली मास्तर
विद्यार्थ्याच्या पोटामंधी
भुक तोडते लक्तरं………

जीव ओतुन मातीत
शेत पेरी शेतकरी
हाती धुपाटणे त्याच्या
तेला तुपात व्यापारि………

कोकिळेच्या जागी इथं
गाती घुबडच गाणी
वडचणीला चालले
आज आढ्याचे ते पाणी………

सासु सुनांचं भांडण
जन्मा जन्माचीच कथा
दोन जात्यात पिसतो
काय सांगावी ती व्यथा………

मुलाच्या हव्यासा पायी
किती गर्भपात होती
उद्या लेकरंच त्यासी
वृद्धाश्रम तो दावती………

एकेकाचे मन् येथे
बघा करती रुंदणे
बघुनिया खेळ सारा
स्तब्ध हृदय स्पंदने………

©शिवा चौधरी
    जामनेर,जळगांव

सोमवार, 9 नवंबर 2015

दिवाळीची अष्टाक्षरी

दिवाळीची अष्टाक्षरी

माझ्या अंगणी सजली
दीप दिव्यांची ती आळी
चला साजरी करुया
आज नवखी दिवाळी………

चला प्रदुषण टाळू
नका फटाकी रे जाळू
दिवे लावु शिक्षणाचे
उजेड ज्ञानाचा पाडू………

एक दिवा लेकी साठी
एक बळीराज्या साठी
अशी सजवू ती आळी
आज एका पाठोपाठी………

नका करु रे बाळांनो
उगा फटाक्यांचा नाद
या रे प्रदूषणा पायी
किती झाली बरबाद………

काही घरे जळतील
कानठळ्या बसतील
फटाक्यांच्या धुरापायी
कुणी दमा पाळतील………

संस्कृतिच्या नावाखाली
नका लावू रे लांछन
करा सर्वांचा विचार
नका करु रे भांडण………

संस्कृति शिकवी आम्हा
लावा दिव्यांची ती आळी
म्हणुनच तिचे नाव
अहो पडले दिवाळी………

दिवाळीच्या मुहूर्ताला
शिवा देतोय शुभेच्छा
सौख्य नांदो तव द्वारी
हिच सर्वोपरी ईच्छा………

------------------------------------------

आपलं प्रत्येक दुःख या तेवणाऱ्या ज्योतीत जळुन जावो,
आणि त्याच ज्योतीच्या प्रकाशात सारं जीवन फुलून येवो.

दिवाळीच्या या पावण पर्वात बळीराजाला शत् शत् नमन

प्रदूषण मुक्त दिवाळीच्या खुप साऱ्या शुभेच्छा,

©शिवा चौधरी
    जामनेर,जळगांव

संग

संग

मदनाचा मोर
तो चित चोर
तव रूपात दिसला गं

रेशमी बाल
नागिनशी चाल
मन् ढवळून गेली गं

नजरेचा तिर
काळजाला चिर
पाडुन गेला गं

ओठांची लाली
लाभली गाली
मन् बैचैन झाले गं

संगीत सुर
धडधडते ऊर
मनास भावले गं

होऊनी दंगी
त्या रास रंगी
तव संग लाभला गं

©शिवा चौधरी
    जामनेर,जळगांव

रविवार, 8 नवंबर 2015

विडबंन कणा

कवि कुसुमाग्रजांची कणा ही कविता खुप अप्रतिम ……

तिला सलाम 🙏🏼 म्हणुन आणि कवि कुसुमाग्रजांची माफी मागून कणाचं बिडंबन सादर करत आहे.

आपल्याला नक्की आवडेल ही आशा………

बघितलंत का रे त्यांना
दारात आले कोणी,
पोट होते भरलेले
एका त्यांची कहानी.

भरपुर फिरलीत
खूप खूप चरलीत,
आलीत विदेशी जाऊन,
केलेत गबर व्यावसायी
बस गेले शेतकरी राहून.

बापाचा माल समजून
वेळे आधीच माजली,
जाळून काया जनतेची
स्वतःची कणसे मात्र भाजली.

महागाई वाढवली
दांडगाई चालवली
कर्जापोटी गुरं सुद्धा नेली,
फास घेण्यासाठी त्यांनी
कासरे मात्र ठेवली.

मित्रांना घेऊन संगे
सारवा सारव करता आहे,
कधी गावात कधी शहरात
सगळीकडे हरता आहे.

झाडू कडे हात जाईल
तोवर एकेक मग निसटला,
मारु नका लोकहो आम्हा
जरा तोल आमचा सुटला.

जर टिकून राहीलो इथं
तर तोडू तुमचा कणा,
"अजून लूट बाकि आहे"
हा असेल आमचा बाणा.

©शिवा चौधरी(प्रहार)
         जामनेर,जळगांव

शनिवार, 7 नवंबर 2015

सांज सावल्या

सांज सावल्या

गुंफून हातात हात
प्रेमात बहरलेल्या,
आठवतात मज त्या
दुर्मिळ "सांज सावल्या".

नकळत जिवनात
माशी कुठे ती शिंकली,
या प्रेम सागराला का?
मोठी दरार पडली.

शब्दांच्या चकमकित
हृदयी जखमा झाल्या,
प्रेमापोटी तुझ्या राणी
आता कुठे त्या सुकल्या.

दरारीतला दुवा गं
ठरली बाळी आपली,
नाते कमजोर तीनं
इवल्या हाती जपली.

बोलु नको बोलकडू
आहे जखमा ओल्या,
जखमेवरी घालिती
फुंकर "सांज सावल्या".

                © शिवा चौधरी
                 जामनेर,जळगांव

झकासच झाली स्पर्धा
प्रतिभा अशा दाविल्या
शिव मनाशी भावल्या
साऱ्या " सांज सावल्या"

नावानिशी शुभेच्छा त्या
कुणा कुणास  मी द्याव्या
मनी वाटतसे माझ्या
प्रतिभा तव फुलाव्या

कुणी रेखाटी विरह
कुणी प्रेमाच्या भावना
"साज सावल्याच देती"
नवनविन प्रेरणा

समजू नका कविता
मी शुभेच्छा या धाडल्या
भावू द्या तव मनाला
शिवाच्या "सांज सावल्या"

             ©शिवा चौधरी

शुक्रवार, 6 नवंबर 2015

लावणी

लावणी

रंग असा गोरा गोरा
बांधा माझा पाठमोरा
ठसलाय तुझ्या रं मनात
येतया समदं माझ्या ध्यानात……

रंकाळ्या पोर राया
झीजवीन माझी काया
पायात चाळ बांधुन
ढोलकीचा ताल धरुन
घेईन गिरकी मी जोमात
येतया समदं माझ्या ध्यानात……

नाजुक कमरेचा झटका
जिव्हारी तुझ्या चटका
लावुन जाते मी खरी
जीव हा पाखरा परी
उडुन पाखरु जाई रानात
येतया समदं माझ्या ध्यानात……

मिशीला ताव देता
नजरेनं वार करता
जराशी कळ काढा
पावनं हा हात सोडा
मदनाचं ईख तुमच्या मनात
येतया समदं माझ्या ध्यानात……

ठुमकत मी येईन अशी
पाडु नका तोंड घशी
करा हो दौलत जादा
तुमचीच आहे मी सदा
नका येवू तुम्ही लाडात
येतया समदं माझ्या ध्यानात……

                                ©शिवा चौधरी
                                  जामनेर,जळगांव

गुरुवार, 5 नवंबर 2015

१ ते ११

(१ ते ११ अक्षरी
एक नवा प्रयोग )

मी
स्त्री
तु
श्री

प्रेम
माझं
तसं
तुझं

मी दिवा
तु वात
मी सर्प
तु कात

मी धवल
तु सावळा
मी स्वराज्य
तु मावळा

मी तुझे चित्र
तु माझा रंग
मी तुझी काया
तु अंतरंग

मी तुझी कीरण
तु माझा प्रकाश
मी धुंद पाखरू
तु निळे आकाश

मी तुझे रे शहाळे
तु शहाळाचे पाणी
मी तुझी रे रसना
तु माझी मिष्ठ वाणी

ओवाळून जीव माझा
अर्पेन तुज साजना
मी सांभाळेन सख्या रे
जन्मातरी च्या बंधना

मी मुक्त मोरणी तुझी रे
तु मोर बेधुंद नाचरा
मी रे ऋतू तुझा गुलाबी
तू वारा त्यातला बॊचरा

वल्हवीली मी नौका प्रेमाची
जरी वादळ वारे वाहीली
अठरा वसंता पासून मी
वाट तुझी रे किती पाहीली

ओरडून मी सांगेन जगाला
प्रीती तुझ्यावर अशी जडली
तुझ्याच मिलनाने का? सख्या रे
माझी कोमल काया गंधाळली .

© शिवा चौधरी(कळमसरेकर)
       जामनेर, जळगांव