शुक्रवार, 25 सितंबर 2015

सारंग

सारंग

मी सकाळी समुद्रावर गेलो,
तो खुप खवळला होता,
रात्रीचा नजरा मला सकाळी दाखवत होता.

मला म्हटला का आलास ?
मी म्हटलं तुला भेटायला,
तुझ्या खाऱ्यापाण्याची चव चाखायला.

तो म्हटला आला तसा माघारी जा !
अगोदर निर्मळ झरा बनुन खडकाळ भागात वहा,
मग माझ्या पाण्याची चव पहा.

मी म्हटलं तिकडे निर्मळ काहीच राहीलं नाही,
मानुस मानसालाच काळ्या पाण्यात पाही,
म्हणुन आलो तुझ्या ठायी.

तो परत म्हटला, अरे इथं असं का येता येतं,
खुप दिव्य पार करावं लागतं,
मग हे खारं पाणि ही काही तरी देतं.

मी म्हटलं नको दावू चव
तुझी ,
पण काय सामावलंय आत ते सांग,
मानसाने जगावं कसं ते सांग.

तो शेवटी म्हटला मन् अथांग ठेवा माझ्या सारखं,
मग त्यात सारं काही सामावेल,
स्वछंद खेळणारे आनंदाचे मोती,
दुःखीत शिंपले ज्यांनी त्यागलेय मोती,
हळुच निसटणारे वाळुचे कण,
दुःखात ही हसणारं मोठं मन्,
आकाशात जाणारे गोड वारे,
खालि राहणारे क्षार खारे,

त्यानं खुप काही सांगितलं,
मला त्याचा शब्द अन शब्द पटला,
आज माझ्या ताई मध्ये मला सारंग भेटला.

बुधवार, 23 सितंबर 2015

वंशाची पणती दिर्घ लेख

लेख

$$ "वंशाची पणती" $$

       जरा वेगळेच वाटतेय ना  " वंशाची पणती !".....वाटेलच! कारण आपण ऐकलाय तो वंशाचा दिवा....आपला वंश पुढे चालावा म्हणून या दिव्यासाठी समाजात गर्भपात, कन्याभ्रुण हत्या व पिशाच्चविद्येचा सहारा घेऊन असंख्य मुलींची हत्या करण्यात आली आहे आणि आज ही सर्रास होत आहे. स्वतःला सुशिक्षित म्हणवून घेणारे किती तरी महाभाग आपल्याला समाजात बघायला मिळतील. गर्भनिदान करायला तेच पूढे असतील,जे सुशिक्षित आहेत. मग ते कसले आले सुशिक्षित? त्यांना तर अगदी रसातळाचा दर्जा दिला तरी हरकत नाही. आज पेपर मध्ये बातम्या बघायला मिळतात आणि पूर्वी ही मिळायच्या... सोनोग्राफी सेंटरला ठोकले कुलुप, गर्भनिदान करणारा डॉक्टर गजाआड, मुलगी जन्मली म्हणुन विवाहीतेचा छळ, विवाहितेला जीवे मारले अशा किती तरी बातम्या वाचायला, बघायला मिळतात. याला जबाबदार कोण ? असा प्रश्न पडतो. याला जबाबदार म्हटले तर आपणच आहोत. आता तुम्ही म्हणाल का ? त्याही प्रश्नाचं उत्तर आहे. अहो, काही दिवसापूर्वी बागेत बसलेल्या दोघा भाऊ-बहीणीला जवळपासच्या लोकांनी प्रेमी युगल म्हणून चांगलेच चोपले कारण ते एकांतात गप्पा मारत होते. काही ठिकाणी प्रेमी युगलांसोबत ही असा प्रकार झाला.त्याचे व्हीडीओ बनवून व्हायरल करण्यात आले. पण खरे पाहीले तर एक ही व्हिडीओ असा दिसला नाही कि कुणी त्यांना समजावून सांगतेय....आणि समजावले असले तरी असे व्हीडीओ दिसणार नाहीत.कारण त्यांना टीआरपी नको असते, म्हणून ते असले प्रकार सहसा करत नाहीत. त्यांना सुधारणा हवी असते पण प्रेमी युगलांचे व्हीडीओ व्हायरल करणारांना हवी असते टीआरपी. मग टीआरपी चे अजून अनेक मार्ग आहेत....आणि प्रश्न ही अनेक आहेत.ते का नाही तुमच्या स्टाईलने सोडवत तुम्ही?कुणी डॉक्टर गर्भनिदान करताना आढळला, कुणी शेजारी मुलगी झाली म्हणुन विवाहितेला छळताना आढळला, कुणी सासू सुनेला टोमणे देताना आढळली...तिथे करा ना दादागिरी!त्यांना शिकवा ना  धडा, बनवा व्हीडीओ...करा व्हायरल...वाचवा मुलगी!पण नाही ....ते नाही जमत.कारण याच प्रोसिजरमध्ये आपण ही कुठे तरी दोषी असतो.आपले मन मानत नाही आणि समजा स्वत:त बदल करुन इतरांना बदलायचा प्रयत्न केला तर तू काय केले होते?हा समोरच्याचा टोमणा ठरलेला असतो. तेव्हा तुझी अक्कल काय शेण खायला गेली होती का?तुला आता अक्कल आली का? असे किती तरी प्रश्न.पण मला सांगा अक्कल यायची काही वेळ असते का?अहो,पूर्वी झाल्या असतील चूका पण आपण त्याच चूका परत परत करत रहायच्या का ? अशाने परिवर्तन घडेल का? नाही ना! नाही तर चालू द्या, माझ्या बापजाद्यापासुन हे चालत आले आहे. मी कसे सोडू?नको बाबा, देव कोपेल...असे कुठपर्यंत चालणार? हे करुनच टाकतो असे म्हणत किती तरी भाकडकथांना निरंतर चालू ठेवलेय, त्याने तसे केले.मग आपण ही तसेच करायचे अशीच मानसिकता जास्त दिसते.ती बदलायला हवी. मी असे केले तर लोकांनी माझे अनुकरण करावे ही मानसिकता असायला हवी. कन्याभ्रुण हत्या, कन्या जन्माला आली म्हणुन छळ करणे, मुलगी वागवणे जीवावर आले म्हणून तिला मारुन टाकण्याच्या मानसिकतेतून बाहेर यायला हवे आणि जर ही मानसिकता बदलली नाही तर पुढे ही असेच होत राहिल.मुलींच्या हत्या होतच राहतील.हो,हत्याच...! मी तर याला हत्याच म्हणेन कारण आपला वंश पुढे चालावा म्हणून मुलगाच हवा ही समाजाची धारणा होऊन बसलीय. आणि त्यासाठी ज्या नराधमांनी मुलींच्या हत्या केल्या असतील त्या कोणत्या का रुपाने असो हा लेख वाचतांना त्यांच्या नाकाला मिरच्या नक्कीच झोंबतील यात शंकाच नाही. आणि ज्यांना झोंबल्या त्यांनी निदान एकदा केलेल्या चुकांसाठी किमान दोन भ्रुण हत्या रोखुन चूक सुधारण्याचा प्रयत्न करायला हवा.पण ज्यांच्याकडुन चूक झालीय त्यांनी हं, नाही तर स्वतः एक चुक करा आणि दुसऱ्याच्या दोन थांबवा यात काहीही तथ्य नाही.आणि जनता ही म्हणेलच की "लोका सांगे ब्रह्म ज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण"! ज्यांनी असे नाही केले,मुलीलाही मुलासारखेच मानले त्यांचे कौतूक करावे तितके थोडेच आहे. अशा व्यक्तींचे वेळोवेळी कौतूक व्हायलाही हवे. त्यांचे दाखले इतरांना द्यायला हवेत कारण चुकणाराला शिक्षा तर चांगले कार्य करणाराचा गौरव व्हायला हवाच ना?
         समाजात जरी मुलगा वंश चालवतो ही धारणा असली तरी माझ्या मते वंश पुढे ढकलण्याचे काम करते ती मुलगी.जी तुमच्यासाठी तुमची कधीच नसते पण तुमचा वंश चालवण्यासाठी दूर कुठे तरी ती वाढत असते. अगदी तुमच्या नकळतपणे!पण तरीही तो कुंभार ती पणती घडवत असतो-अगदी नि:स्वार्थपणे, कुठली ही अपेक्षा न ठेवता! त्याला माहीत असते, ही लग्न होऊन सासरी जाणार.... माझे आयुष्य परत माझ्या पत्नीत गुंतणार... या वृक्षाची छाया दुसऱ्याच्या अंगणात पडणार.... तरी ही तो त्याला खत पाणी घालतोच.समजा, जसे आपण केले तसे त्याने केले तर मग कुठून येईल तुमचा वंश चालवायला मुलगा? पत्नीच नाही तर सगळे व्यर्थ! तो त्याचे काम नि:स्वार्थपणे करतो पण आपण स्वार्थी माणसे त्याच मुलीने जर एखाद्या मुलीला जन्म दिला तर तिच्यावर ताशेरे ओढतो.काही महाभागतर जीवे मारतात कारण त्यांना दुसरी सून आणून किंवा पत्नी आणून मुलगा जन्माला घालायचा असतो.पण मुलगा अथवा मुलगी होणे हे सर्वस्वी पुरुषावर अवलंबुन असते हे विज्ञानाने सिद्ध केले आहे पण मुलगा होत नाही म्हणून पोटच्या मुलाला मारणारे आईबाप आपण पाहीले का? किंवा आपल्या मुलीला मुलगा होत नाही म्हणून कुणी जावई मारलाय हे आपल्याला बघायला मिळाले का?नसेल, मग हा ठेका काय विधात्याने फक्त मुलाच्या आईबापाला दिलाय की काय अशी ही शंका वाटते. अरे दुसऱ्याच्या घरातून आलेल्या मुलीने तुमचा वंश पुढे चालावा म्हणून मुलगाच जन्माला घालावा, असा तुमचा हेका असतो पण तुमच्यासाठी ज्यांनी मुलगी तुमच्या घरात पाठवली, त्यांच्या उपकाराची फेड म्हणून का होईना मुलीला जन्माला येऊ द्या.पण तशी मानसिकता असावी लागते तसा सद्विचार अंगी असावा लागतो. पण आमच्या अंगी तसे मोठेपण यायला किती काळ लागेल सांगता येत नाही. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण याऐवजी जया अंगी मोठेपण त्याची किर्ती महान हे वाक्य याबाबतीत तरी घोषवाक्य व्हावे.
         स्त्री मुलाला जन्म देत नाही म्हणुन तिला जीवे मारणारे नराधम आज ही पहायला मिळतात. कुण्या बापाने लाडाने वाढवलेल्या कन्येला मारताना लाज कशी वाटत नसेल त्या नालायकांना? त्यात काही स्त्रियाही असतात, त्यांनी तरी याला विरोध करायला हवा.पण नाही, काहीवर जबरदस्ती केली जाते तर काही स्वतःहून 
ते पाप करायला पुढे सरसावतात. स्वतःचा वंश पुढे चालावा म्हणुन दुसऱ्याचा वंश चालवण्यासाठी आकार घेत असलेल्या फुलाला गर्भातच कुस्करायला एक स्त्री तयार कशी होते या गोष्टीचे नवल वाटते.फेसबुक वर प्रेयसीसाठीची कविता वाचून लाईक ठोकताना प्रेयसीसाठी जसा प्रेमाचा झरा वाहू लागतो. तसा गर्भपात करताना,मुलींना जीवे मारताना तोच प्रेमाचा जरा एकदम कसा आटतो? तेव्हा प्रेम कुठे जाते? एखाद्या मुलीने सुंदरसा फोटो अपलोड केला कि कमेंट सांगायची गरज नसते त्या वेळेस जणू ते लेखक होतात आणि एका पेक्षा एक सरस कमेंट टाकतात. लहान मुलींसाठी क्युट बेबी म्हणणारे आपण वास्तविक जीवनात मुलींसाठी काय करतोय? लहान असताना मला राखी बांधायला बहीन का नाही म्हणून रडणारे मोठे झाल्यावर मला मुलगीच हवी असा हट्ट धरताना फारच थोडे बघायला मिळतात. लिंग गुणोत्तरातला फरक दिवसेंदिवस इतका वाढत चाललाय कि भविष्यात पून्हा पुराणकालीन स्वयंवर करावे लागतील हे नक्की. टीव्हीवर शो म्हणून स्वयंवर पाहायला मिळतोय पण असेच चालू राहीले तर दैनंदिन जीवनात ही असे स्वयंवर घडले तर त्यात नवल ते काय?यासाठी उपाय योजना प्रत्येक घरातून व्हायला हवी,अगदी तळागाळापासून व्हायला हवी. कि याचा ही  विचार  सरकारनेच करावा असे वाटतेय? नवल आहे राव तुमचे!
सरकारच्या नावाने बोंबा मारायची इतकी सवय पडलीय की आता इथेपण सरकार बोलवायला आपण कमी करणार नाही, हो ना ? 
अबबब! धुर्तपणाचा कळस केलाय तुमच्या विचारांनी.तुमचा मेंदू  कधी काय विचार करेल काही सांगताच येत नाही.
आपल्या सर्वांना ही मानसिकता बदलावी लागेल कारण आपल्याला वंशाचा दिव्यासोबत वंशाच्या पणतीची पण तितकीच गरज आहे. हे लक्षात घ्यायला हवे, कारण आपल्या घराचा वंश चालवण्यासाठी जर दुसरी व्यक्ती मुलगी जन्माला घालतेय तर दुसऱ्या कुणाचा तरी वंश चालवण्यासाठी आपण मुलीला जन्म दिलाच पाहीजे हे जाणले पाहीजे. तरच सृष्टीचे संतुलन टिकून राहील, अन्यथा भविष्यात मुलींसाठी मारामाऱ्या, लढाया सुरु होतील.बलात्कारांची संख्या किती वाढेल सांगता येत नाही. कुणी असेही म्हणत नाही कि मुलगी होत नसेल तर डझन भर मुले जन्माला घाला पण गर्भात मुलींना मारणे तर थांबवू शकता ना ? का ती ही देवआज्ञा आहे? का जिथे तिथे त्याला बदनाम करतो आपण? चांगले झाले तर आम्ही मेहनत केली आणि त्याची कृपा होती साथीलाआणि वाईट झाले तर त्याची तशी इच्छा होती असेच ना? अरे कधीपर्यंत दुसऱ्याच्या नावाने खडे फोडणार?स्वतः काही तरी करा.... मुलीला जन्म देणाऱ्या स्त्रीला त्रास देणे थांबवा . इतके तर करा कारण सृष्टीकर्त्याने जगण्याचा अधिकार फक्त तुम्हालाच नाही दिलेला! तो अधिकार प्रत्येकाचा आहे मग ती मुलगी असो वा मुलगा. त्या चिमुकलीचा जीव नका घेऊ आणि त्या वंशाच्या पणतीला आकार घेऊ द्या. आपण सुरवात तर करा, चांगले बीज पेरले तर फळ ही चांगलेच मिळेल यात शंका नाही. म्हणतात ना,
"शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी!"

© शिवा चौधरी(कळमसरेकर)
       जामनेर, जळगांव

गुरुवार, 17 सितंबर 2015

बालगीत

बालगीत

लल्लल ला लल्लल ला गंमत जंमत हो हल्ला
लल्लल ला लल्लल ला गंमत जंमत हो हल्ला(कोरस मुलं)

शाळेमध्ये आज भरवु गमतीचा तास
सोडवा पाहु मुलांनो एक कोडं खास
ईटुकली पिटुकली एक अशी छोटुकली
हळुहळु चालत जाय सांगा कोठे तिचे पाय
लल्लल ला लल्लल ला गंमत जंमत हो हल्ला
लल्लल ला लल्लल ला गंमत जंमत हो हल्ला(कोरस मुलं)

नाही माहीत कुणाला...

लल्लल ला लल्लल ला गंमत जंमत हो हल्ला
लल्लल ला लल्लल ला गंमत जंमत हो हल्ला(कोरस मुलं)

ईटुकली पिटुकली गोगलगाय छोटुकली
हळुहळु चालत जाय पोटा मध्ये तिचे पाय
लल्लल ला लल्लल ला गंमत जंमत हो हल्ला
लल्लल ला लल्लल ला गंमत जंमत हो हल्ला(कोरस मुलं)

घरघर गरगर गाडी चाले तिला लागे रस्ता
गोगलगाय चालत जाते मागे सोडी रस्ता
अशी आमची गोगलगाय
मऊ मऊ तिचे पाय
लल्लल ला लल्लल ला गंमत जंमत हो हल्ला
लल्लल ला लल्लल ला गंमत जंमत हो हल्ला(कोरस मुलं)

गोगलगाय गोगलगाय पाठीवरती तिच्या काय
पाठीवरती घर तिच्या सदाकदा असते
दिसता कुठं धोका तिला आत आधी घुसते
अशी आमची गोगलगाय
शांतपणा शिकवुन जाय
लल्लल ला लल्लल ला गंमत जंमत हो हल्ला
लल्लल ला लल्लल ला गंमत जंमत हो हल्ला(कोरस मुलं)

वर मी आणनार लावणी ला

वर मी आणनार लावणी ला

चाल :- येवु तशी कशी मी नादांयला....

हौसं नवसं जमल्यात सारि
गालबोट नको माझ्या कलेला
वर मी आणनार लावणी ला हो
वर मी आणनार लावणी ला

मराठमोडी लावणी ऐका
संगतीला ढोलकिचा ठेका
नका करु भलताच हेका - 2
फड हा चाललाय विलयाला हो
वर मी आणनार लावणी ला

शाहीर आमचे आहे जोरात
नव्या पोरीबी आल्याय फडात
तरी नाय बसनार मी घरात - 2
लावते मी घुंगरु पणाला हो
वर मी आणनार लावणी ला

लावणी नव्या रुपात गाऊ
अख्या जगाला मुठीत ठेऊ
नखरा तीचा साऱ्यानां दावू - 2
लागेल पताका फडकायला
वर मी आणनार लावणी ला

लावणी आमची आहे झकास
डंका तिचा हो परदेशात
ताबा मिळवील तुमच्या मनात - 2
बसवेन ऑस्करच्या लाईनीला हो
वर मी आणनार लावणी ला

बुधवार, 16 सितंबर 2015

माँ

माँ

ओ माँ , ओ माँ , ओ माँ , ओ माँ ,

तु मेरी धडकन, तु मेरी जान्,
तु मेरी सांसे तुही पहचान
ओ माँ , ओ माँ , ओ माँ , ओ माँ ,

मुश्किलों में तुने, मुझको है पाला
हर दर्द तुने हसके है झेला
फिर भी न समजा तेरा एहसान
तु मेरी सांसे तुही पहचान
ओ माँ , ओ माँ , ओ माँ , ओ माँ ,

दुनिया का दस्तुर तुने सिखाया
खतरों से लढ़ने के काबिल बनाया
फिर क्यो न गाँऊ तेरा ही गान
तु मेरी सांसे तुही पहचान
ओ माँ , ओ माँ , ओ माँ , ओ माँ ,

जीवन के सच को तुने दिखाया
मुश्किल घडी में भी चलना सिखाया
बनुगां वही जो तेरा अरमान
तु मेरी सांसे तुही पहचान
ओ माँ , ओ माँ , ओ माँ , ओ माँ ,

तु ही माता तु ही गुरु है
मेरे हर पल से तु  रुबरु है
सबसे बढा है माँ तेरा ज्ञान
तु मेरी सांसे तुही पहचान
ओ माँ , ओ माँ , ओ माँ , ओ माँ ,

आईने में ना खुद को सवारा
सिर्फ मेरे बचपन को तुने उबारा
कैसे चुकाऊँ तेरे एहसान
तु मेरी सांसे तुही पहचान
ओ माँ , ओ माँ , ओ माँ , ओ माँ ,

तु मेरी धडकन, तु मेरी जान्,
तु मेरी सांसे तुही पहचान
ओ माँ , ओ माँ , ओ माँ , ओ माँ ,

वाट वैकुंठाची

वाट वैकुंठाची

जायचच होतं प्रिये सोडुन अर्ध्यावर
तर का गं असं वागलीस

सोडुन मोह या स्वार्थी दुनियेचा
का वैकुंठी चीन निद्रॆत झोपलीस

बरी उशी ती फाटक्या चिंध्यांची
का माझी उबदार गोधडी शिवलीस

बरे विखुरलेले मोती जिवनाचे
का हार त्या मोत्यांचा बनवलीस

मन् होते गळुन पडलेले प्राजक्त
का तु त्याचा गजरा ओवलीस

धाव माझी सागर गाठण्याची
का प्रेमाचा बांध अडवुन बसलीस

बरी स्वैर भरारी नभी
पारव्या सम घरट्याच्या मोही का पाडलीस

मज झोकून आठवांच्या वणव्यात
का वाट तु एकटीने काढलीस



(काही नाती रक्तीची असतात तर कि विचारांच्या साम्यतेनं जुळतात. रकथाची नाती वैचारिक मतभेदानी तुटु शकतात. पण विचारांच्या साम्यतेनं जुळलेली नाती रक्त कीतीही वेगळं असलं तरी टिकतात.
म्हणुन रक्तांच्या नात्यांनाही वैचारीक पातळीवर जोडण्याचा प्रयत्न करा, जीवन खुप सुंदर आहे)

सैनिकाची व्यथा

सैनिकाची व्यथा

डुलत होती अंगणी गं एक अशी कळी
फुलत होती हळुवार एक चाफे कळी
ताई आज माझी मोठी झाली आहे थोडी
बाबा वाणी मला तुझी लागली गं गोडी
तुला आज मला काही विचारायचं ताई
माझ्या साठी होनार का बाबा अन आई
सांगतो मी ताई आज बाबांची कथा
वाणीतुन माझ्या सैनिकाची गं व्यथा

तुच माझी आई ताई तुच बाबा माझे
बाबावीन बालपण गेले कसे तुझे
देशासाठी त्याग त्यांनी घराचा गं केला
कोमजतं बालपण, आपला काय गुन्हा झाला
काय अशी अडचन बाबानां गं आली
त्याच्या पाठीमागं मुलं मोठी कशी झाली
एक ताई बाबांची तु खरीखुरी गाथा
वाणीतुन माझ्या सैनिकाची गं व्यथा

गद्य (कधी कधी बाबा घरी येतात, आपल्याला घेऊन फिरायला ही जातात. तेव्हा आपन खुप मज्जा करतो, कधी बाजारात तर कधी बागेत ही जातो.
बाबा सिमेवर जातांना मात्र आईच्या डोळ्यांना अश्रुंच्या धारा लागलेल्या असतात, हेसगळं बघतांना माझेही डोळे पाणवतात, माझ्याच संतप्त भावना मलाच हीनवतात. तु ही हिरमुसून रडतेस ताई, पण बाबांना मी रडतांना कधी पाहीलंच नाही)

डोळ्यातले अश्रु बाबा लपवता असे
मनातले हुंदके ताई लपतील कसे
दंगा आपण केला तर कंटाळते आई
तु तर मोठी झाली तुला कळत का नाही
असं का गं सदा कदा म्हणते गं आई
तु ही माझ्या संग उद्या खेळणारं नाही
तुच सांग ताई आता कसं मी खेळावं
माझ्या सवे खेळायाला बाबांनी गं यावं
सांग ना गं ताई मला बाबांची कथा
वाणीतुन माझ्या सैनिकाची गं व्यथा

गद्य (काल माझ्या मित्राचा वाढदिवस होता, सारा दिवस त्याचा बाबा त्याच्या सोबत होता. पण आपले बाबा मी माझ्या वाढदिवसाला कधी पाहीलेच नाही. त्यांना ही वाटत असेल ना गं, आपण ही मुलांसोबत रहावं, आपल्या चिमुकल्यांचं बालपण जवळुन पाहवं, तुच म्हणते ना ताई बाबा देशरक्षणा सोबत समाजात सद्भावना पसरवतात, मग मुलांच्या विरहात स्वतःचं मन् का मारतात.)

बाबा काही दिसले नाही ताई जन्मदिनी
आईच्या डोळी तेव्हा तरळतं पाणी
आले होते का गं बाबा वाढदिवसाला तुझ्या तरी,
अशी कशी सांग ताई आपल्या बाबाची नोकरी
त्रासुनिया आई कधी मला का बोलते
काय अशी कोंडी आपल्या बाबांची गं होते
सिमेवर जातांना गं परतुन यावं
लेकराला एकदाच कुशित गं घ्यावं
बालपणा परी माझ्या कर्तव्य मोठं झालं
डोळ्या मध्ये ताई पाणी मात्र तेव्हा आलं
समजली मुकेपणी बाबांची कथा
वाणीतुन माझ्या सैनिकाची गं व्यथा




पावसा

पावसा

असा येतोस आणि असा जातोस
का आमच्या भावनेशी खेळतोस
कधी वाहतोस भरुन दुथडी
कधी मारतोस अचानक दडी

भरलेस तर भरतो डोह आणि तळे
दांडी मारुन जाळतोस मन् आणि मळे
इवल्या इवल्या पिकांना तुझा विरह जाळतो
नाजुक पाने कोमेजतांना फक्त बळीच विव्हळतो

इवल्या इवल्या पिकात दिसतं मला मरण
कोमेजलेल्या पाणांकडे पाहुन जळतं रे अंतकरण
पण आज खरचं बाबा सुखावुन गेलास
पुन्हा लढ़ायला मला बल देऊन गेलास

पाणावलेले डोळे अलगद पुसुन गेलास
काळजाचा ठोका चुकता चुकता राहुन गेला.

हळद गीत

हळद

गरगर गरगर भिंगरी, भिंगरी गं भिंगरी
रोमांच फुलवी, फुलवी अंतरी
गरगर गरगर भिंगरी, भिंगरी गं भिंगरी

मोगऱ्याचा गजरा भुलवी वेड्या मनाला
शहारते मन् बाई होता स्पर्श मानेला
मोगऱ्याची मंजीरी, मंजीरी गं मंजरी
रोमांच फुलवी, फुलवी अंतरी
गरगर गरगर भिंगरी, भिंगरी गं भिंगरी

हळदीचा गुण तुझ्या, खुलवी रुपाला
सोखावले मन् तुझे, नवऱ्याच्या भेटीला
नवरा भेटेल, भेटेल सासरी
रोमांच फुलवी, फुलवी अंतरी
गरगर गरगर भिंगरी, भिंगरी गं भिंगरी

मेंहदीचा रंग तुझ्या हातावर चढला
गाता गाता हळद गाणे दिवस ढळला
सजली नवरी, नवरी गोजिरी
रोमांच फुलवी, फुलवी अंतरी
गरगर गरगर भिंगरी, भिंगरी गं भिंगरी

मंगलवार, 15 सितंबर 2015

(आरोळी)माझं तुला तुझं मला

आरोळी

माझे शब्द तुला घे, तुझं शब्दधन मला दे.
माझी साठवण तुला घे,  तुझी आठवण मला दे.

माझा वसंत तुला घे,  तुझी पानगळ मला दे.
माझा उत्साह तुला घे,  तुझी मरगळ मला दे.

माझा मोहर तुला घे,  त्याचं फळ मला दे.
माझी मेहनत तुला घे, फक्त बळ मला दे.

माझं मन् तुला घे,  तुझ विमन मला दे.
माझे प्राण तुला घे,  तुझं जीवन मला दे.

माझं सुख तुला घे,  तुझं दुख मला दे.
माझी तृप्ति तुला घे,  तुझी भुक मला दे.

माझा हर्ष तुला घे,  तुझा स्पर्श मला दे.
माझी खोडी तुला घे,  तुझा आदर्श मला दे.

माझे नेत्र तुला घे,  तुझे स्वप्न मला दे.
माझी मौज तुला घे,  तुझे विघ्न मला दे.

माझे रंग तुला घे,  तुझे चित्र मला दे.
माझे फुल तुला घे,  तुझे इत्र मला दे.

माझं यश तुला घे,  तुझे प्रयत्न मला दे.
माझा उल्हास तुला घे,  तुझ्या यातना मला दे.

माझी कुरघोडी तुला घे,  तुझी गोडी मला दे.
मी राहील सदा तत्पर, तु फक्त आरोळी दे

लावणी

लावणी (श्रृंगारीक)

आधी गाठ पडु द्या
पहीली भेट घडु द्या
मग गाऊ या गावराण गाणी
अन् राया मी होईल तुमची राणी
अन् राया मी होईल तुमची राणी

राया सिनेमा मला दावा
माझ्या बाजुला खुर्ची लावा
नका करु हो चावट वाणी
अन् राया मी होईल तुमची राणी
अन् राया मी होईल तुमची राणी

मला हाटेला मंधी नेवा
बेत मटणाचा आज ठेवा
करु नका हो घाई धनी
अन् राया मी होईल तुमची राणी
अन् राया मी होईल तुमची राणी

अशी मागवा दारु झ्यॉक
माझ्या साठीबी बनवा पॅक
नका टाकु हो त्यात पाणी
अन् राया मी होईल तुमची राणी
अन् राया मी होईल तुमची राणी

जवा चढलं नशेची धुंदी
मगं देईल इश्काची संधी
तवा नका करु आनीकानी
अन् राया मी होईल तुमची राणी
अन् राया मी होईल तुमची राणी

तुमी बिंधास आज पेवा
माझा मी जपलाय आजवर ठेवा
नाही शिवला हा ठेवा कुणी
अन् राया मी होईल तुमची राणी
अन् राया मी होईल तुमची राणी

आधी गाठ पडु द्या
पहीली भेट घडु द्या
मग गाऊ या गावराण गाणी
अन् राया मी होईल तुमची राणी
अन् राया मी होईल तुमची राणी

सोमवार, 14 सितंबर 2015

एक सर् पावसाची

एक सर् पावसाची

एक सर् तर मागितली होती पावसाची पण नाही दिली
सुकवून रानं सारं धार अश्रुची माझ्या डोळ्यांना दिली

धान्याचा साठा ज्याच्या कडे त्यास भुक नाही दिली
भुकेनं तडफडता लेकरं माझी पण मला वर्षाची भाकर नाही दिली
एक सर् तर मागितली होती पावसाची पण नाही दिली

एसी त राहतो, मोटारीतुन फिरतो माझ्याच मालावर गबर होतो
तो करोडो कमवतो मला मात्र दमडीच दिली
एक सर् तर मागितली होती पावसाची पण नाही दिली

त्याच्या कडे पैसा आहे म्हणुन माल साठवतो
मी एका एका दान्यासाठी रक्त आटवतो
त्यानी पैशाच्या जोरावर ईज्जत कमवली
मी कर्जापायी इज्जत विकुन शेती पिकवली
एक सर् तर मागितली होती पावसाची पण नाही दिली

माझ्याच मालावर बांधल्यात महाड्या
पण एक पैसा भाव वाढवून नाही दिलास गड्या
शेतमालाला भाव नाही म्हणुनच आम्ही आत्महत्या करतो
तरी तुम्ही आत्महत्येची मुळं नाही शोधली
एक सर् तर मागितली होती पावसाची पण नाही दिली

अजुन कायदे करा कि तुमच्या बद्दल कुणी बोलु नये
आमच्या भावना तुमच्या पर्यंत पोहचवूच नये
प्रत्येकानं ही गादी पाच वर्षासाठीच मिळवली
अन सगळी मंडळी आमच्या भावनेशीच खेळली
एक सर् तर मागितली होती पावसाची पण नाही दिली