🚶💃🚶💃🚶💃🚶💃🚶
सवाल -जबाब
अगं दिवसा ढवळ्या ऊन तापतं, रातीला टिपुर चांदण पडतं गं
अन् कसं काय या जगा मंदि वेडवाकडं घडतं गं
ग ग ग गं माझी राणी तु गं...
आर् खेळ अंताक्षरीचा नाही गड्या हा, सवाल जबाब यासी म्हणती रं
अन् चला ऐकुया कसं जगी या वेडवाकड घडतं रं
र र र रं माझ्या राज्या तु रं ...
सवाल पहिला तुला शाहीरा लक्ष देऊनी ऐक जरा
जिंकलास जर आज अगर तु देईन तुजला कलगी तुरा र र र रं
सवाल:-
अहो पुराणात ते वर्णन मिळते शंभो त्रिनेत्र धारीचे,
आज कोणते नेत्र तिसरे जे उद्धार करी हर नरनारीचे,
जी जी जी जी
जबाब:-
अगं काय सवाल तु केला साजणी समजु नको मला भोळा गं
नरनारीचा उद्धार करतो शिक्षण तिसरा डोळा गं
ग ग ग गं....
सवाल:-
सवाल करतो तुला साजने जबाब दे गं खरा खुरा
वस्तु कुठली या जगी ज्यासी कापु न शके चाकु-छुरा ग ग ग गं
जबाब :-
आरं काय सवाल तु केला शाहीरा जबाब याचा ऐक खरा,
काचेला त्या कापे हिरकणी अपयश येते चाकु छुरा र र र रं
अहो शाहिर तुमची बुद्धि छोटी, छोटे प्रश्न तुम्ही करु नका
अन् प्रश्न ऐकुनी वेगळाच हो धिर तुम्ही आता सोडु नका
र र र रं माझ्या राज्या तु रं
सवाल:-
अहो अमरवेल ही जगते दुसऱ्या सहाऱ्यावर,
अन अशीच दुसरी वेल कोणती वाढते या धरतीवर
जी जी जी जी
जबाब:-
अहो लाख मोलाचा सवाल केला बाई तुम्ही आज हीमतीनं
अन् वंशवेल ही अशीच वाढे एकमेकाच्या संगतीन
ग ग ग गं माझी राणि तु गं
सवाल:-
अहो हिंदू मुस्लिंम शिख ईसाई असे धर्म वाढले कलीयुगा मंधी,
अन् श्रेष्ठ कोणता धर्म सांगा बाई आज या जगा मंधी ग ग ग गं
जबाब:-
अगं निरुत्तर तु झाली साजने जबाब सांगतो कानात
मानवता हा जगामधला धर्म श्रेष्ठ ठेव ध्यानात
ग ग ग गं
माझी राणी तु गं
ग ग ग गं....
©शिवा चौधरी(कळमसरेकर)
जामनेर,जळगांव
💃🚶💃🚶💃🚶💃🚶💃
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें