शेतकरी अन् देव
काल मी मेलो तवा एक मानुस मले भेटला,
म्हणे मी देव आहे असं सांगत सुटला,
काहुन देला जीव म्हणे बळीच्या पुत्रा,
का संपवलं रे जीवन तुनं अनाठाई मित्रा,
मी मनलो देवा समदंत तुच करतु,
मय मऱ्याच कारण मले काहुन ईचारतु,
दिसलं नई का तुले पोरच्या झंपराच ठिगय,
का दिसली नई तुले शेकऱ्याची मरगय,
अरे वह्यापुस्तका साठी मी पोरायले शेतात नेत व्हता,
कसं व्हइन् पोरचं लगन मनुन खस्ता खात व्हता,
निंदुन टिपुन मया कव्व्या पोरच्या हाताले फोड आले व्हते,
ते नही दिसले तुले तवा का तुये डोये आले व्हते,
औषिद नही भेटलं मनुन सरणावर गेली मयी माय,
पोटासाठी कसायाच्या दारि मले बांधनी पडली गाय,
तवा तुया एक बी नेता घरी नई आला,
आता मातर नेत्या संग समदा गाव गोया झाला,
तुले लाखोचा मुकूट चढवता लोकं पण मले कोनी उधार बी देत नई,
कुंभमेल्यात करोडो खरचता नेते लोकं पण सरकार मया मालाले भाव बी देत नई,
कांद्याचा भाव वाढला म्हणुन ईनोद तेयले सुचता,
कुंभमेल्यात काहुन मग देव अनाठाई भजता,
आता मी मेलो तं सरकार मया घरी एक लाक रुपये तं दिन,
पोरचं लगन व्हईन मयी बायको तीले नवं झंपर बी घीन,
दोन सांजची भाकर पोरगं पोटभर खाईन,
उरले जर पैसे तं शाळेमंधी बी जाईन,
नहीतरी समदे आम्ही भुकेनं मरणारच व्हते,
मया मराणाच्या पैशानं निदान ते एक वरीस तरी जगणार व्हते,
तुले मया राग येत आशीन भौ खरा,
पण समद्या शेतकऱ्याची मातर एकच हे तऱ्हा.
©शिवा चौधरी(कळमसरेकर)
जामनेर,जळगांव
++++++++++++++++++++++++++
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें