सोमवार, 7 सितंबर 2015

आई


            :::  आई  :::

आईच्या जिद्दीपायी जन्माला मी आले
आजा अन् बाप मात्र पोटातच मारायला टपले
अशिक्षीत पण खंबीर होती माझी आई
पोरी साठी जीव तीचा तिळ-तीळ तुटत जाई

लेकरा साठी तिची बाळा दैना लय झाली
माझ्या साठी उन्हातान्हाची पर्वा तिनं नाही केली
इतकं सोसुनही आयुष्याला कधी वाईट नाही म्हटलं
माझं लगीन होन्या आधीच डोळं तिनं मिटलं

लहानपणा पासुन आज्या-बाबाच्या डोळ्यात मी सलत आले
लग्न करुन माझं खोट्या खोट्या ऋणातुन ते पार झाले
इथं आता तुझे बाबा माझ्याशी बाळा असे वागत होते
जणु आईचे उरलेले भोग मी इथं भोगत होते

कामाची दाणत त्याच्या अंगी मरेस्तोर नाही आली
माझ्या कष्टाच्या पैशातुन दारुची तहान मात्र भागली
दारु पिऊन दंगा तो रोजच करायचा
रोजराती बाळा मला गुरासारखा मारायचा

तु ही बाळा असं कसं काय रे केलं
कशापायी मला वृद्धाश्रमात रे धाडलं
आश्रमाच्या भींती इथं छळतात रे फार
त्या परी बरा तुझ्या बापाचा तो मार

श्राद्ध नको करु बाळा माझं
नको आगारीवर तुपाची ती धार
जमेल तर माझ्या बाळा
बंद कर त्या वृद्धाश्रमाचं दार
बाळा वृद्धाश्रमाचं दार.

©शिवा चौधरी(कळमसरेकर)
      जामनेर,जळगांव
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें