बारादी चा पाळणा
जो जो रे राज्या जो जो गं परी
सोन्याचा पाळणा रेशमी दोरी
बाळाचा पाळणा गाऊ द्या मला
मोगरा विनुन गुंफिन त्याला
जो बाळा जो जो रे जो
पहील्या दिवशी आल्या जिजाऊ
बाळाशी निरखुन लागल्या पाहु
मुली बाळ हे जानावे थोरं
नको भेद गं पोरगा नी पोरं
जो बाळा जो जो रे जो
दुसऱ्या दिवशी तुकोबा आले
तयाचे अभंग गाऊ लागले
मुली बाळ हे जानावे थोरं
शिवबावाणी गं दिसतया पोरं
जो बाळा जो जो रे जो
तिसऱ्या दिवशी शिवबा आले
जिंकावे कसे बोलु लागले
मुली बाळ हे जानावे थोरं
किर्ती तयाची होईल अपार
जो बाळा जो जो रे जो
चवथ्या दिवशी राजे शंभु गं आले
कसे लढावे सांगु लागले
मुली बाळ हे जानावे थोरं
नावं याच गं गाजेल भुवर
जो बाळा जो जो रे जो
पाचव्या दिवशी ज्योतीबा आले
शिक्षण महती सांगु लागले
मुली बाळ हे जानावे थोरं
शिक्षणा मध्ये शक्ति अपार
जो बाळा जो जो रे जो
सहाव्या दिवशी बाबा गं आले
घटनेचे शिल्प त्यांनी कोरले
मुली बाळ हे जानावे थोरं
हक्काचा आपला करा विचार
जो बाळा जो जो रे जो
सातव्या दिवशी सासु गं आल्या
म्हणे सुने तुम्ही आई गं झाल्या
मुली बाळ हे जानावे थोरं
कांती त्याची गं अती सुंदर
जो बाळा जो जो रे जो
आठव्या दिवशी सासरे आले
नातवाचे रुपं पाहु लागले
मुली बाळ हे जानावे थोरं
बिंबवु यावरी शिवबाचे विचार
जो बाळा जो जो रे जो
नवव्या दिवशी आई गं आली
म्हणे मुली मी आजी गं झाली
मुली बाळ हे जानावे थोरं
किलकाऱ्याने याच्या भरेल घरं
जो बाळा जो जो रे जो
दहाव्या दिवशी ननंद आली
हर्षाने मोठी फुलू लागली
वहीनी बाळ हे जानावे थोरं
कसे मानावे तुझे आभार
जो बाळा जो जो रे जो
अकराव्या दिवशी भाऊ गं आला
आनंदाने तो नाचु लागला
ताई बाळ हे जानावे थोरं
शिकवू त्यासी विवेकी आचार
जो बाळा जो जो रे जो
बाराव्या दिवशी ले गं कांता
जाहले बाळ अन् हरली चिंता
राणी बाळ हे जानुया थोरं
लौकिक देईल जगी हे पोरं
जो बाळा जो जो रे जो
जो जो रे राज्या जो जो गं परी
सोन्याचा पाळणा रेशमी दोरी
बाळाचा पाळणा गाऊ द्या मला
मोगरा विनुन गुंफिन त्याला
जो बाळा जो जो रे जो
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें