रविवार, 28 मई 2017

पहिला पाऊस

पहिला पाऊस

मंद मंद हा
खट्याळं वारा
मना मनाच्या
छेडीत तारा
भिजवूनी देह
चिंब करिती
मंद मंद या
पाऊस धारा || धृ ||

पहिला पाऊस
मृगा मृगाचा
शिळ घालतो
मुखी निराळी
अथांग सागर
लहरी मधूनी
नाचत जाई
निसंग होडी
मनी मोहरे
रम्य किनारा......1

चावट भारी
थेंब तयाचा
रेंगाळून ये
उदरा वरती
कोमल देह
तिचा बघूनी
फूल पाखरे
मनात झुरती
खोड काढूनी
देई शहारा.......2

गंध सुगंध
सोडत जाई
पहिल्या सरीत
भिजता माती
उनाड पक्षी
गिरकी घेऊनी
उंच भरारी
नभात घेती
गुज सांगतो
कानी वारा......3

रंग साजरा
इंद्र धनुचा
पाऊस धारा
घेऊन आली
जाई मोगरा
चाफा चमेली
निळ्या नभाच्या
सरित न्हाली
मोर नाचूनी
फुलवी पिसारा.....4

शिवा चौधरी
जामनेर,जळगांव
🍏 8275493221

सोमवार, 15 मई 2017

गोंधळ 4

*गोंधळ*

आई तुझी गं किर्ती
मी ऐकूनी आलो,
तुझ्या किर्तीचा महिमा
गावाया आलो.
नैवद्य घेऊन आलो
पुरणपोळीचा...
आहेरतुला घेऊन आलो
साडी चोळीचा
दारी गोंधळ गोंधळ
गोंधळ आईचा || धृ ||

तुझ्या हातावर शोभे आई हिरवा गं चुडा
तुझ्या गं भाळी चंद्र नांदे होऊनिया टिळा
सुर्याची गं आभा पसरली तुझ्या किर्तीतूनी
चांदणी गं होऊन बसली नासिकेत नथनी
अन् नभात फडफडतोय झेंडा गं देविचा || 1 ||

कवळ्याचीमाळ पायात पैंजण घालूनी मी नाचतो
तुझ्या कृपेची फुलं गं आई परडीत वेचतो
झेंडा घेऊन बोधाचा मी मिरवितो गं तिन्ही लोकी
तुझ्या लेकरा तारुण न्यावे तूच पाठीराखी
भक्ती करुनी उभारीन मी डोंगर राईचा || 2 ||

महिषासूर मर्दिनी तुझं गं रुद्ररूप भारी
त्रिशूल हाती घेऊन केली सिंव्हाची स्वारी
दैत्याचा संहार करुनी भक्त तू तारिला
भक्त तू तारिला गं आई महिषासूर मारिला
हर्षीभंडारा उधळतोय गं तुझ्याच पायीचा || 3 ||

✍🏽 *शिवा चौधरी*
*जामनेर,जळगांव*
📲 9592487310

शुक्रवार, 12 मई 2017

जागरण3

[12/05 8:02 pm] Shiva Chaudhary: जागरण/गोंधळ -1

नम: दुर्गा नम: दामिनी
संहार करण्या आले मी,
नाचून तांडव घालूनी
दृष्टास मारण्या आले मी ||धृ||

भभक भभक देह हा
नासिका फिंगारती
दृष्ट नष्ट करण्या
शस्त्र ही श्रृंगारती || 1 ||

थरथर का? कापतो
दृष्ट दैत्या आता
पुण्ण्याचा राहिला
घडा तुझा रे रिता || 2 ||

मुक्ती मुक्ती मागसी
मुक्ती तुला न लाभने
अंत हा समीप हा
कुकर्म तुझे रे वाढले || 3 ||

नेत्रात क्रोध, शस्त्रात वेध
हा वार कसा तू रोकसी
आलिय वेळ, सरलाय खेळ
प्राणास आता मुकसी || 4 ||

✍🏽 *शिवा चौधरी*
*जामनेर,जळगांव*
📲 9592487310

[12/05 8:13 pm] Shiva Chaudhary: जागरण/गोंधळ -2

वाजता शंखनाद,स्फुरती बाहू हे
माजता दृष्ट हे,केतू अन् राहू हे
हाती शस्त्र घेऊनी उठली उठली
रणरागीणीs s s पेटली s s s || धृ ||

दानवा दानवा, रक्तपात माजला
तव-तव तू कर्माने, आज रे भाजला
जाणता पातके आज मी रुठली रुठली || 1 ||

मी काली; मी दुर्गा; मी रण् चंडिका
भाळी रक्त चंदनं, गलमाला मुंडीका
वधण्या दृष्टीशी क्रोधी मी नटली- नटली || 2 ||

रक्ताभिषेक हवा, त्रिशुली दानवा
तव कंठ भेदूनी तारिते मानवा
प्राणभोग बघता काळरात्र गोठली गोठली || 3 ||

✍🏽 *शिवा चौधरी*
*जामनेर,जळगांव*
📲 9592487310

[12/05 9:48 pm] Shiva Chaudhary:

जागरण/गोंधळ -3

हो दूर्गा हो काली
महिषासूर मर्दिनी
अनाथांची हो वाली
रौद्ररूप धारिणी

सूड घे सूड घे
धडधडत्या ज्वालांनी
सूड घे सूड घे.....|| धृ ||

पिडीतांशी छेडणाऱ्या,दृष्टांचा सूड घे
निरागस लेकरांच्या,वेदनांचा सूड घे
रंजलेल्या भाभड्यांच्या, यातनांचा सूड घे....|| 1 ||

रक्तपात रक्तघात, दैत्य इथं मातला
अविवेकी दानवांचा सुळसुळाट माजला
सुळसुळत्या दानवांच्या बुद्धीचा सूड घे....|| 2 ||

मी अंबा जगदंबा, कंठ आज फोडणार
माजलेल्या दैत्यांशी यमसदनी धाडणार
माजलेल्या दैत्यांच्या कृत्यांचा सूड घे....|| 3 ||

✍🏽 *शिवा चौधरी*
*जामनेर,जळगांव*
📲 9592487310

मंगलवार, 2 मई 2017

पाळणा

स्पर्धेसाठी......

*पाळणा*

जो जो रे बाळा, जो जो गं ताई
बाळाचा पाळणा गाते रमाई
सावित्री तुला शिकवी अ आ ई
जो बाळा जो जो रे जो .......2

जो जो अंकिता जो जो अक्षरा
शिकवू पोरिला संकल्प करा
भ्रूण हत्तेला बाजूला सारा
जो बाळा जो जो रे जो .......2

होऊ अहिल्या होऊ जिजाऊ
अवनी चल गं शाळेला जाऊ
मुलींची किर्ती जगाला दावू
जो बाळा जो जो रे जो .......2

तू गं कल्पना तू गं सुनिता
अवकाशी झेपं घे गं अनिता
खगोल शास्त्र शिकूया आता
जो बाळा जो जो रे जो .......2

ऐका जरा हो संतोष भाऊ
पोरीला साहित्य शिक्षण देऊ
मराठी मातिचा लौकिक दावू
जो बाळा जो जो रे जो .......2

बाळं अपर्णा उध्दारी कुळा
फुलवेल हो ती किर्तीचा मळा
नात तुमची मोत्याचा घडा
जो बाळा जो जो रे जो .......2

*शिवा चौधरी*
*जामनेर,जळगांव*


विसावा (एक अंतिमपूर्व थांबा)

*विसावा* (एक अंतिमपूर्व थांबा)

                विसाव्यावर खांदे पालट करण्यासाठी थांबलेली अंत यात्रा पाहून, त्याच्या डोक्यात विचार आला.
त्यानं किरडीवर लेटल्या लेटल्या थोडा मागोवा घेण्याचं ठरवलं......
         शेवटचा श्वास घेत असतांना मन अगदीच विचलित झालं होतं, तो विचार करू लागला.
आता मला अंघोळ घातली जाईल !

पण कुठे ?

भर रस्त्यावर...!

अरेरे मग त्या संगमरमरी स्नानगृहाचं काय?

नवी कापडं ही मिळतील, पण बिन मापाची.

आणि ती कपाटातली !

कुणाला दिली असती तर बरं झालं असतं मरण्यापूर्वी.....!

मी कमवलेला पैसा...

तो ही तसाच पडून राहील तिजोरीत,

गाडी बंगला, शेती वाडी सगळं इथंच राहणार ना !

मग का कमवलं हे ?

कसला भोग ही घेतला नाही ना ? जिवंत असतांना.

नुसताच धावत राहिलो पैशामागे वेड्यासारखा.....

पत्नीला ही वेळ दिला नाही कधी,

तशी तिनं ही कधी तक्रार केलेली आठवत नाही मला !

मुलं लहान होती तोवर ठीक होतं, पण मोठी झाल्यावर ती ही लांब निघून गेली.

कसे राहतील बरं माझी मुलं ? माझ्या नंतर.....

आता राहतात तसेच, की तुटून विखरला जाईल हा परिवार.....
एखाद्या मोत्याच्या माळे सारखा,
जी माळ धागा जिर्ण झाल्यावर जशी विखरून पडते तशी.

मोठा मुलगा इंजिनियर सुन डॉक्टर, शहरात गुण्या गोविंदाने नांदतायत.

धाकटा पाटबंधारे खात्यात उच्च पदावर आणि मुलगी वकीलाच्या घरची सुन...
कुणाला काहीच कमी नाहीये.
सगळे सुखी आनंदी आहेत.

फक्त पत्नीच तेव्हडी एकाकी वाटत होती,

पैसा त्यानं चिक्कार कमवला होता.
करोडोची स्थावर मालमत्ता तर बँक बॅलन्स ही भरपूर होता.

कदाचित तीच भिती त्याला विचलीत करत असावी. मोठ्या मुलाच्या मांडीवर डोकं ठेवून त्यानं शेवटचा श्वास घेतला.
तसा तो मुक्त झाला या मोहमायेच्या जगातून....

असं त्याला वाटत होतं.
       
पत्नी ढसाढसा अश्रू ढाळत होती, मुलगी हंबरडा फोडून रडत होती, मुलं मधून मधून डोळ्याच्या कडा पुसत होते.

गावातील मंडळी, नाते वाईक, मित्रपरिवार अंत दर्शन घेऊन जात होती.

कुणी दोन चार वाक्यात त्याचा जिवनपट सांगून जातं होतं.
तर कुणी भल्या कामाची यादी बोलून दाखवत होतं.

मुलाच्या मांडीवर पडल्या पडल्या त्याला जरा हायसं वाटलं. त्यानं सुटकेचा निश्वास सोडला खरा, पण तो फार काळ टिकला नाही.
          जवळच उभी असलेली विहीन बाई आपल्या मुलिला दबक्या आवाजात काही तरी सांगत होती.

त्यानं हळूच खांबाआड जाऊन कानोसा घेतला.

त्याला जे ऐकायला मिळालं त्यावर त्याचा विश्वासच बसेना.....

थोरल्या सुनेची आई तिला सांगत होती, चार आठ दिवस दवाखाण्याला दांडी मार हवं तर पण तुझ्या वाटणी बद्दल आताच बोलून जा बाई, नंतर फालतू लचांड नको.

त्याला अगदी टकमक टोकावरुन ढकलल्याचा आभास झाला. त्यानं एक वळसा बैठक खोलीत मारायचा ठरवलं. तिथेही त्याला तेच दिसलं.....

त्याचे वकील व्याही असचं काही आपल्या मुलाला समजवत होते. कुणी घरदार विकायचा विचार करत होतं तर कुणी एकट्यानंच सारं हडपायच्या विचारात होतं. या पलीकडे कुणीच काही विचार करत नव्हतं.

फक्त एक अपवाद वगळता, आणि ती म्हणजे त्याची पत्नी......

आज नंतर सर्वांना काही ना काही मिळणार होतं, जे त्यांचंच होतं.

फक्त ती एकटीच अशी होती, जिचं सारंच हिरावलं जाणार होतं.
किंबहुना हिरावलं गेलंच म्हणायला हरकत नाही.

पती अगोदरच डोळे मिटून चालता झालेला,धन संपत्ती सोबत नाती गोती, मुलं बाळं साऱ्यालाच ती मुकणार होती.

देह जरी त्यानं त्यागला होता, परंतु खऱ्या अर्थानं आज ती मेली होती.

तो तिच्या कडे नुसताच भारावल्या गत बघत होता. पण काहीच करू शकत नव्हता.

जिवंत असतांनाची चूक आता भोवणार होती.

अचानक त्याला हलका झटका बसला, तसा तो भानावर आला.

विसाव्यावरून किरडी खांदेपालट करून पुढे निघाली होती.
आणि मागे सुटला होता फक्त प्रचंड जन सैलाब जो शेवटच्या थांब्यावरून परत फिरणार होता, पुन्हा एक मृतदेह आणून सोडालया........

✍🏽 *शिवा चौधरी*
*जामनेर,जळगांव*

हृदय मानवास पत्र

           || जय जिजाऊ ||

                                    श्री शिवा चौधरी
                                    "मनकमल" 73/1
                                   धनपुष्प कॉलनी,
                                   वाकी रोड जामनेर
                                   दिनांक :- 2/5/17

प्रिय,
         हृदय मानव अशोक......
सप्रेम नमस्कार.
      अरेरे ! .... प्रथमदर्शी हा उद्धटपणा वाटेल खरा,
   कारण मित्रा तुझं मोठेपणच तेव्हढं आहे. पण शब्दांची सहजता आणि माझ्या मनातील भाव, सहज व सुंदर वाटण्यासाठी एकेरीचा मुद्दाम उल्लेख केला. त्या बद्दल क्षमस्व :
      आता हे क्षमस्व कशाला, म्हणून उगाच भुवया उंचवू नकोस. तो हक्कच आहे तुझा. आजच्या भाषेत सांगायचं झालं म्हणजे तू ते डिजर्व करतोस.

हृदय मानव अशोक !.........

       नावाची सुरवातच हृदयापासून होतेय यार... जिंकलास गडया, आणि मानवता ती तर आतल्या गाभाऱ्यात विराजमान झालीय, आणि हे काय अनुकूचिदार आणि हिरव्यागार पर्णांनी बहरलेला व आसमंताकडे झेप घेणाऱ्या अशोक वृक्षाचं क्रियाविषेशण सामावल्या गत नावाचा शेवट. अरे वा ! किती अर्थपूर्ण आहे नाही ?
आणि हो, त्याच्या तू लायक ही आहेस मित्रा. कारण तुझी झेप खरंच आसमंता कडे आहे. तुझी माझी ओळख पत्रलेखन स्पर्धेपासूनच झाली, म्हणून की काय ? तुला खरंच मनापासून पत्र लिहावंस वाटतयं. सोशल मिडीयाच्या माध्यमातून चेहरे दिसतात खरे, पण माणसाचं मोठेपण त्याच्या बोलीभाषेतून लिखाणातून स्पष्टपणे जाणवतं हा माझा तर्क.... आणि त्या तर्कानुरूप तुझं लिखाण ही सदैव वाचायला मिळतं असतं.
          हे झालं तुझ्या बद्दल...... आता थोडं तुझ्या कार्याकडे वळू, तू जो साहित्य सेवेचा विळा उचललाय ना, त्याचा मलाच नव्हे तर गृप मधल्या सर्वच सदस्यांना सार्थ अभिमान आहे मित्रा ! नवनवीन स्पर्धांचं आयोजन करणे. विजेत्यांचा सत्कार करणे. इतकंच नाही तर नवकवींना पुरस्कार देऊन तू एक प्रकारे साहित्य क्षेत्रात आगमन करू पाहणारांना वाट मोकळी करून दिलीस. जेष्ठ आणि प्रसिद्ध साहित्यिकांना व्यासपिठावर आमंत्रित करून साहित्य प्रेमींची जणू सहलच घडवून आणलीस. आणि सहलीतला तो साहित्याचा मेवा, आपसूकच तृप्तीचा ढेकर देऊन गेला. आपल्या गृपमधील आ. बबन दादा चखाले आणि इतर काही मान्यवरांच्या संपर्कात मी होतोच. परंतु आ. प्रा डॉ. फुला बागूल सर व राजगुरू माई जे  पत्रलेखन स्पर्धेचे परिक्षक होते, त्यांच्याशी शब्दविद्या च्या माध्यमातूनच परिचय झाला. आणि पुढे त्यांचे आशीर्वाद व मार्गदर्शन लाभले आणि लाभत ही राहिलं याचं श्रेय तुलाच मिळायला हवं, यात तिळमात्र ही शंका नाही. आणि तुझा तो प्रत्येकी दोन-दोन जिल्ह्यांचा उपक्रम, तो म्हणजे, साहित्यिकांसाठी पर्वणीच.
तू खरंच ग्रेट आहेस यार.....
अ हं ! हसू नकोस !
ही तुझी स्तुती बिलकुल नाहीये. हा तुझ्या कार्याचा आढावा आहे जो मी तोटकाच सादर केलाय आणि ती संधी दिलीय आ. योगिता ताई पाखलेंच्या चिंतनात्मक बुद्धीने, त्यांच्या संकल्पनेनं !
आणि हे काय ?त्यांच्या कौतुकाचे दोन शब्द लिहले म्हणून जलिस तर नाहीस ना झाला? अरे नाही  ! गंमत केली मित्रा..... खूपच मग्न झालेला वाटला पत्र वाचतांना, म्हणून म्हटलं याला हसावायला हवं. कारण तू हसतांना छान लाजतोस म्हणे. खरंय का हे ? मला तर नाही वाटत. आणि लाजला ही असशील, पण ते पहिलं पत्र वाचतांना.....
   हो तेच ! ज्याच्यामुळे मनात गुदगुल्या होतायं. असो हा ही एक गमतीचाच भाग आता तुला जाणवलं असेल यांने एकेरीनं सुरवात का केली असावी ते. चल ठीक आहे तू म्हणशिल सगळं तूच बोलतोय, मला संधीच देत नाहीये. पण काय करू रे नोकरीच अशी आहे, सोबत सहसा कुणी नसतं. एखादं दुसरा सहकर्मी किंवा मग पाखरं..... व्यक्त व्हायला या दोनच जागा. सहकर्म्यांशी किती बरं संवाद साधावा. म्हणून काही दिवसापूर्वीपासून पाखरांची भाषा समजण्याचा प्रयत्न करू लागलो. आताशी कुठे त्यांची भाषा समजायला लागली, पण त्यांना मात्र अजून माझी भाषा येत नाहीये. परवा असाच मी विचार करत बसलेलो, तर एक मैना म्हणते कशी ,काय शिवा ! प्रेयसीच्या आठवात दंगलाय  की काय? मी बळेच मान डोलवली. पण खरं सांगू, मी तेव्हा स्त्री भ्रूणहत्त्ये बद्दल विचार करत होतो. तिला माझी भाषा कळली नसती, म्हणून मुद्दामच विषय टाळला.

त्यांच्यात नसतं ना रे असं !......
स्त्री भ्रूणहत्त्या वगैरे,मग आपण माणसंच का खेळ खेळतो असे निसर्गाच्या चक्राशी ? असो

ए आपण करुया का रे काही छान उपक्रम.... स्त्री भ्रूणहत्त्ये विरोधात?
स्त्री भ्रूणहत्त्या करू पाहणारांना गुपित प्रमाण पत्र देऊन.

जसं,

अभिनंदन ! आपण एका चिमुरडीचा जीव घेऊ पहात असाल तर  लेक वाचवा संघटने कडून आपणास निषेध प्रमाणपत्र प्रदान करण्यात येत आहे.
आणि असं नसेल तर आपणास कोटी कोटी धन्यवाद !

                         आपली गर्भातली कळी

ए ! स्वारी हं राव, जरा भटकलोच होतो.।पण हे पत्र पुस्तक रूपात छापण्याचा मानस असल्यानं दोन शब्द समाजसुधारणे साठी वापरावे म्हटलं.

मला माहितीय ,डोळे पाणावले असतील तुझे....
पण असं  करू नकोस मित्रा !

आता रडायचं नाही
       लढायचंय....
जळायचं नाही
        जाळायचंय...

आणि तेही विकृतांच्या विचारांना, बलात्काऱ्यांच्या प्रवृत्तीला आणि पेटून उठवायचंय रान साहित्याच्या तळपत्या लेखणीनं.
बघ, काय जादूय ना शब्दांची....
चार ओळी पूर्वी रडवेलं झालेलं मन लागलिच पेटून उठलं. म्हणून मला वाटतं या शब्दांची सेवा तुझ्या कडून अविरत घडत राहो. आणि तुझ्या प्रयत्नांना, चिकाटीला बळ मिळो. व तू यशाच्या उंच शिखरावर पोहचो हीच जिजाऊ चरणी प्रार्थना !
              कळावे लोभ असावा.

                                       तुझाच
                                 *शिवा चौधरी*
                           
*शिवा चौधरी*
*जामनेर,जळगांव*
*9592487310*