|| जय जिजाऊ ||
श्री शिवा चौधरी
"मनकमल" 73/1
धनपुष्प कॉलनी,
वाकी रोड जामनेर
दिनांक :- 2/5/17
प्रिय,
हृदय मानव अशोक......
सप्रेम नमस्कार.
अरेरे ! .... प्रथमदर्शी हा उद्धटपणा वाटेल खरा,
कारण मित्रा तुझं मोठेपणच तेव्हढं आहे. पण शब्दांची सहजता आणि माझ्या मनातील भाव, सहज व सुंदर वाटण्यासाठी एकेरीचा मुद्दाम उल्लेख केला. त्या बद्दल क्षमस्व :
आता हे क्षमस्व कशाला, म्हणून उगाच भुवया उंचवू नकोस. तो हक्कच आहे तुझा. आजच्या भाषेत सांगायचं झालं म्हणजे तू ते डिजर्व करतोस.
हृदय मानव अशोक !.........
नावाची सुरवातच हृदयापासून होतेय यार... जिंकलास गडया, आणि मानवता ती तर आतल्या गाभाऱ्यात विराजमान झालीय, आणि हे काय अनुकूचिदार आणि हिरव्यागार पर्णांनी बहरलेला व आसमंताकडे झेप घेणाऱ्या अशोक वृक्षाचं क्रियाविषेशण सामावल्या गत नावाचा शेवट. अरे वा ! किती अर्थपूर्ण आहे नाही ?
आणि हो, त्याच्या तू लायक ही आहेस मित्रा. कारण तुझी झेप खरंच आसमंता कडे आहे. तुझी माझी ओळख पत्रलेखन स्पर्धेपासूनच झाली, म्हणून की काय ? तुला खरंच मनापासून पत्र लिहावंस वाटतयं. सोशल मिडीयाच्या माध्यमातून चेहरे दिसतात खरे, पण माणसाचं मोठेपण त्याच्या बोलीभाषेतून लिखाणातून स्पष्टपणे जाणवतं हा माझा तर्क.... आणि त्या तर्कानुरूप तुझं लिखाण ही सदैव वाचायला मिळतं असतं.
हे झालं तुझ्या बद्दल...... आता थोडं तुझ्या कार्याकडे वळू, तू जो साहित्य सेवेचा विळा उचललाय ना, त्याचा मलाच नव्हे तर गृप मधल्या सर्वच सदस्यांना सार्थ अभिमान आहे मित्रा ! नवनवीन स्पर्धांचं आयोजन करणे. विजेत्यांचा सत्कार करणे. इतकंच नाही तर नवकवींना पुरस्कार देऊन तू एक प्रकारे साहित्य क्षेत्रात आगमन करू पाहणारांना वाट मोकळी करून दिलीस. जेष्ठ आणि प्रसिद्ध साहित्यिकांना व्यासपिठावर आमंत्रित करून साहित्य प्रेमींची जणू सहलच घडवून आणलीस. आणि सहलीतला तो साहित्याचा मेवा, आपसूकच तृप्तीचा ढेकर देऊन गेला. आपल्या गृपमधील आ. बबन दादा चखाले आणि इतर काही मान्यवरांच्या संपर्कात मी होतोच. परंतु आ. प्रा डॉ. फुला बागूल सर व राजगुरू माई जे पत्रलेखन स्पर्धेचे परिक्षक होते, त्यांच्याशी शब्दविद्या च्या माध्यमातूनच परिचय झाला. आणि पुढे त्यांचे आशीर्वाद व मार्गदर्शन लाभले आणि लाभत ही राहिलं याचं श्रेय तुलाच मिळायला हवं, यात तिळमात्र ही शंका नाही. आणि तुझा तो प्रत्येकी दोन-दोन जिल्ह्यांचा उपक्रम, तो म्हणजे, साहित्यिकांसाठी पर्वणीच.
तू खरंच ग्रेट आहेस यार.....
अ हं ! हसू नकोस !
ही तुझी स्तुती बिलकुल नाहीये. हा तुझ्या कार्याचा आढावा आहे जो मी तोटकाच सादर केलाय आणि ती संधी दिलीय आ. योगिता ताई पाखलेंच्या चिंतनात्मक बुद्धीने, त्यांच्या संकल्पनेनं !
आणि हे काय ?त्यांच्या कौतुकाचे दोन शब्द लिहले म्हणून जलिस तर नाहीस ना झाला? अरे नाही ! गंमत केली मित्रा..... खूपच मग्न झालेला वाटला पत्र वाचतांना, म्हणून म्हटलं याला हसावायला हवं. कारण तू हसतांना छान लाजतोस म्हणे. खरंय का हे ? मला तर नाही वाटत. आणि लाजला ही असशील, पण ते पहिलं पत्र वाचतांना.....
हो तेच ! ज्याच्यामुळे मनात गुदगुल्या होतायं. असो हा ही एक गमतीचाच भाग आता तुला जाणवलं असेल यांने एकेरीनं सुरवात का केली असावी ते. चल ठीक आहे तू म्हणशिल सगळं तूच बोलतोय, मला संधीच देत नाहीये. पण काय करू रे नोकरीच अशी आहे, सोबत सहसा कुणी नसतं. एखादं दुसरा सहकर्मी किंवा मग पाखरं..... व्यक्त व्हायला या दोनच जागा. सहकर्म्यांशी किती बरं संवाद साधावा. म्हणून काही दिवसापूर्वीपासून पाखरांची भाषा समजण्याचा प्रयत्न करू लागलो. आताशी कुठे त्यांची भाषा समजायला लागली, पण त्यांना मात्र अजून माझी भाषा येत नाहीये. परवा असाच मी विचार करत बसलेलो, तर एक मैना म्हणते कशी ,काय शिवा ! प्रेयसीच्या आठवात दंगलाय की काय? मी बळेच मान डोलवली. पण खरं सांगू, मी तेव्हा स्त्री भ्रूणहत्त्ये बद्दल विचार करत होतो. तिला माझी भाषा कळली नसती, म्हणून मुद्दामच विषय टाळला.
त्यांच्यात नसतं ना रे असं !......
स्त्री भ्रूणहत्त्या वगैरे,मग आपण माणसंच का खेळ खेळतो असे निसर्गाच्या चक्राशी ? असो
ए आपण करुया का रे काही छान उपक्रम.... स्त्री भ्रूणहत्त्ये विरोधात?
स्त्री भ्रूणहत्त्या करू पाहणारांना गुपित प्रमाण पत्र देऊन.
जसं,
अभिनंदन ! आपण एका चिमुरडीचा जीव घेऊ पहात असाल तर लेक वाचवा संघटने कडून आपणास निषेध प्रमाणपत्र प्रदान करण्यात येत आहे.
आणि असं नसेल तर आपणास कोटी कोटी धन्यवाद !
आपली गर्भातली कळी
ए ! स्वारी हं राव, जरा भटकलोच होतो.।पण हे पत्र पुस्तक रूपात छापण्याचा मानस असल्यानं दोन शब्द समाजसुधारणे साठी वापरावे म्हटलं.
मला माहितीय ,डोळे पाणावले असतील तुझे....
पण असं करू नकोस मित्रा !
आता रडायचं नाही
लढायचंय....
जळायचं नाही
जाळायचंय...
आणि तेही विकृतांच्या विचारांना, बलात्काऱ्यांच्या प्रवृत्तीला आणि पेटून उठवायचंय रान साहित्याच्या तळपत्या लेखणीनं.
बघ, काय जादूय ना शब्दांची....
चार ओळी पूर्वी रडवेलं झालेलं मन लागलिच पेटून उठलं. म्हणून मला वाटतं या शब्दांची सेवा तुझ्या कडून अविरत घडत राहो. आणि तुझ्या प्रयत्नांना, चिकाटीला बळ मिळो. व तू यशाच्या उंच शिखरावर पोहचो हीच जिजाऊ चरणी प्रार्थना !
कळावे लोभ असावा.
तुझाच
*शिवा चौधरी*
*शिवा चौधरी*
*जामनेर,जळगांव*
*9592487310*
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें