गुरुवार, 30 मार्च 2017

आठवातली ती

निळसर आकाशात सैरभैर धावणारे खट्याळ मेघ,

तुझ्या आठवांवरचं पांघरून काढून, दूरवर कुठेतरी निघून जातात.

त्यांच्या हालचाली पाहून घरट्याकडे बेभान धाव घेतात काही पाखरं.....

अंगाला झोंबणारा गारगार वारा रोमारोमात शहारे भरून जातो,

कुठेतरी पाऊस पडत असल्याचा संकेत असतो त्या गारव्यात.

बेभान झालेल्या मनाला आस लागते पहिल्या वहिल्या पावसाच्या भेटिची...

आठवतं आज ही जेव्हा तू एकदा भेटली होतीस अशाच एका रम्य सायंकाळी,

बोल फुटत नव्हता तुझ्या कोमल चाफेकळी ओठातून एकही.

अचानक झालेल्या विजेच्या कडकडाटानं, घट्ट बिलगली होतीस तू मला....

मी ही नटखट पणे घट्ट आवळली होती ती मिठी, त्या अनपेक्षित स्पर्शातून मनातले भाव समजून घेण्यासाठी,

चिंब भिजलो होतो आपण दोघंही मृगातल्या त्या पहिल्या पावसात......

वसुंधरा ही पसरवत होती मनमोहक सुगंध मातीचा,

जणू त्या मिलन समारंभातील इत्रदानीतून फव्वारलेल्या इत्रासारखा....

आजही शोधतोय मी तुला,
त्याच निळ्या आकाशा खाली पुन्हा एकदा कवेत घेऊन चिंब भिजण्यासाठी.

दगड धोंडी मी कसा असणार………

*दगड धोंडी मी कसा असणार बरं वेड्या……*

देव देव म्हणत म्हणत
शेंदूर लावू नगं गड्या,
दगड धोंडी मी कसा
असणार बरं वेड्या……

कुणी लावतोय दिवे
कुणी जाळतोय धूप
तेला धूराच्या वासानं
त्रास होतोय रे खूप
नको जाळू तेला संग
अगरबत्तीच्या काड्या
दगड धोंडी मी कसा
असणार बरं वेड्या……

कुणी आने पितांबर
कुणी भरजरी शालू
डोक्यावर ताज नको
नको कानी कुंडल घालू
यापरीस   गरजूंना दे
धोतर आणि साड्या
दगड धोंडी मी कसा
असणार बरं वेड्या……

कुणी शिंपडीतो दहीभात
कुणी शिंपडी गो मूत्र
कुणी अंथरीतो पायघडी
कुणी देई सोन्याचं छत्र
वाया नको घालू दहीभातं
नको टाकू पायघड्या
दगड धोंडी मी कसा
असणार बरं वेड्या……

कुठं अंगारा धुपारा
कुठं अबीर गुलाल
भेव दाखवून जनतेला
माझे पैदा झालेत दलाल
दलालीच्या पैशांवर
बांधू लागलेत माड्या
दगड धोंडी मी कसा
असणार बरं वेड्या……

मनन कर चिंतन कर
डोकं वापरून बघ थोडं
माझ्या वाचून तुझं कधी
अडणार नाही घोडं
कर्मच तारी माणसाला
नाही भाटाच्या त्या पुड्या
दगड धोंडी मी कसा
असणार बरं वेड्या……

संत श्री गाडगे बाबांच्या चरणी अर्पण🙏🏽

✍🏽 *शिवा चौधरी*
*जामनेर,जळगांव*
9592487310

मंगलवार, 28 मार्च 2017

भाकरीची परिमीती

*भाकरीची परिमिती*

उगवतिच्या सुर्यासमवेत,
रोज चिंतेची जीवा घेऊन उठतोय मी,
आयुष्यच्या परिघावरती,
रोज नव्याने पोटासाठी झटतोय मी.

रोजगाराच्या गाजरांचा,
विधीमंडळात वाचला जातोय पाढा,
हलवा बनवून गाजरांचा त्या,
म्हणतात त्याचं घनफळ काढा.

त्रिज्ये इतकाच प्रवास जीवनाचा,
भुक्यापोटी व्यासा सारखा वाटतोय मला,
गळ्या भोवतालचा हात त्यांचा,
अगदीच फासा सारखा वाटतोय मला.

शाळा कॉलेजात कागदावरची,
वक्र - चक्र, भूमिती मी पाहिली आहे,
सरळ जगण्याची निती मात्र,
इथं शिकायची राहिली आहे.

मध्य बिंदूशी एकरूप होऊन,
चहूकडे आशाळभूत नजरेनं बघतोय मी,
रोजंदारीच्या पाया अभावी,
भाकरीच्या परिमितीला ही मुकतोय मी.

वर्तुळाची परिमिती = 2×पाय×त्रिज्या

✍🏽 *शिवा चौधरी*
*जामनेर,जळगांव*

शुक्रवार, 3 मार्च 2017

द्वंद्व

द्वंद्व

लुळा पांगळा    असलो तरी
त्यांच्या सारखा वागत नाही
पांढरपोशा        सैतानांगत
भीक   दयेची    मागत नाही

काखेत कुबडी कमरेत वाक
तरी ताठ आहे अजून बाणा
उगा मोठेपणा दाखवत नाही
नसून खिशात माझ्या नाणा

काळा चष्मा हातात काठी
भार अंधत्वाचा वाहतोय
खेळ डोळस आंधळ्यांचा
बंद डोळ्यांनीच पाहतोय

जीभ असूनही शब्द माझे
मुखावाटे निघत   नाहीत
बोल बच्चन देऊन देऊन
हे का कसे? थकत नाहीत

बरं   दिलयं    रे     बहीरेपण
कान त्यांनी पिकवले असते
बहिऱ्याला सुद्धा विकासाची
गाजरं    दाखवले      असते

कागदावरच्या     विकासाची
त्यांनी खुंटवून ठेवलीय गती
शिकून सवरून बुद्धीवंतांनो
तुमची गहाण पडलीय मती

विकृतांशी    लढता  लढता
खचलंय  जरी    तन   माझं
पालथी घालण्या विकृतिला
द्वंद्व   करतंय    मन     माझं