द्वंद्व
लुळा पांगळा असलो तरी
त्यांच्या सारखा वागत नाही
पांढरपोशा सैतानांगत
भीक दयेची मागत नाही
काखेत कुबडी कमरेत वाक
तरी ताठ आहे अजून बाणा
उगा मोठेपणा दाखवत नाही
नसून खिशात माझ्या नाणा
काळा चष्मा हातात काठी
भार अंधत्वाचा वाहतोय
खेळ डोळस आंधळ्यांचा
बंद डोळ्यांनीच पाहतोय
जीभ असूनही शब्द माझे
मुखावाटे निघत नाहीत
बोल बच्चन देऊन देऊन
हे का कसे? थकत नाहीत
बरं दिलयं रे बहीरेपण
कान त्यांनी पिकवले असते
बहिऱ्याला सुद्धा विकासाची
गाजरं दाखवले असते
कागदावरच्या विकासाची
त्यांनी खुंटवून ठेवलीय गती
शिकून सवरून बुद्धीवंतांनो
तुमची गहाण पडलीय मती
विकृतांशी लढता लढता
खचलंय जरी तन माझं
पालथी घालण्या विकृतिला
द्वंद्व करतंय मन माझं
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें