जगु कि मरू…
सोसू अवधळा कितीही धनी
पण आत्महत्या नका करू,
तुमच्या पाठी धनी
जगु कि मरू……
रक्ताळले डोळे
भेगाळली धरा,
येईल दिस सोन्याचा
अजून थोडा तग धरा,
सतवील तो कितीही
आपण सदा प्रयत्न करू!
तुमच्या पाठी धनी
जगु कि मरू……
मातीशी ईमान
आम्ही सदाच राखला,
एक बैल विकला तवा
धनी माझा औताला जुपला,
एकटी कसा छाटू
कर्जाचा कल्पतरु !
तुमच्या पाठी धनी
जगु कि मरू……
वासनांधाच्या नजरा
खिळतील उराशी माझ्या,
नजरेनं लक्तर तोडतील
ते पोरीचेही तुझ्या,
तुझं अस्तित्व आम्हासाठी
असेल महामेरु !
तुमच्या पाठी धनी
जगु कि मरू……
खाणाराची रांग इथं
सरता ना सरे,
तलाठी म्हणे 7/12 साठी
₹ 100 तरी दे रे,
तुम्हास्नी पैसं, मला इज्जत
मागली तं काय करु !
तुमच्या पाठी धनी
जगु कि मरू……
आंब्याच्या फांदिवरचा
दुहेरी झूला,
बाभळीवर येऊन का ?
एकेरी झाला,
बाभळीवर कसं शोधू
मायेचं पाखरू !
तुमच्या पाठी धनी
जगु कि मरू……
गाळू नका अवसान
एक दिस फुलल हा मळा,
भोगू दुख: आणिक थोडं
लावू मातीलाच लळा,
शिकवून पोरं आपली
मोठी सायेब करु !
तुमच्या पाठी धनी
जगु कि मरू……
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें