रांडोपण(अष्टाक्षरी)
नदी सुकली सुकली
नाला आटला आटला
भेगाळल्या भूईगत
उरं फाटला फाटला
बाप फिरतो रानात
गुरासंग अनवाणी
जळे काळीज तयाचं
करपल्या पानावाणी
जळलं रे रान सारं
कशी थापावी भाकरी
आमुच्याच शेतामंधी
आम्ही करितो चाकरी
बापासंग माय खटे
रातदिन रानोमाळी
चंद्रकोर कपायाले
लाल लावुनिया भाळी
पोटामंधी घास नाही
तरी धन्याचं भुषाणं
माय हसे गालामंधी
बळ आणून उसणं
वैतागुनिया बापानं
जीव दिला असाकसा
सुनं कपाय पाहुनी
माय रडे ढसा ढसा
माय व्हती सवासिन
शोभे कुकू कपायले
का रे दिलं *राडोपण*
देवा तिच्याच वाट्याले
शिवा चौधरी
जामनेर,जळगांव
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें