गुरुवार, 28 जनवरी 2016

चल दिस ते जगूया

चल दिस ते जगूया

चल दिस ते जगूया
बालपणात शिरुया
पुन्हा होऊन लहानगे
थोडं ऊनाड फिरुया

फुलपाखरु धरुया
बैल मातीचा करुया
झोका बांधुन झाडाला
उंच हिंदोळा घेऊया

काही वेगळं करुया
पीकं पैशाचं पेरुया
आई नसतांना घरी
थोडी साखर चोरुया

चल बांधानं फिरुया
सारं शिवारं घेरुया
पात तोडूनं कांद्याची
त्याच्या पिपाण्या करुया

किल्ला वाळूचा करुया
उन्हातान्हात फिरुया
पानं तोडून एरंडाची
माथी सावली धरुया

क्षण निसटले जे होते
पुन्हा क्षण ते धरुया
नाही सर बालपणीची
चल प्रयास करुया

© शिवा चौधरी
     जामनेर,जळगांव

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें