दुचाकी वरचं प्रेम
किती छान होते ते दिवस !………
मी रोज सायंकाळी तिला दुचाकी शिकवायला जायचो, शिकवण्याच्या नादात आम्ही दूर निघून जायचो. कधी मोकळ्या मैदानी, तर कधी सरळ रस्त्याने………
बहुदा आमचा मार्ग लांब लांब रस्ताच असायचा. आमच्या त्याचं रस्त्याने एक पाणिपुरीचा ठेला लागत असे, त्यामुळे आमचा पाणिपुरी खायचा मोह आवरला जात नसे. मी तर पाणिपुरी फक्त इतक्या साठी खायचो कि तिच्या सोबत एकाच प्लेट मधुन खायला मिळेल…… समोरा समोर ऊभं राहुन तिला निरंतर न्याहळता येईल. मी पाणिपुरीचा आस्वाद कमी अन् तिच्या सौंदर्याचाच आस्वाद जास्त घ्यायचो. पाणिपुरीवाला मुद्दाम खोडसाळ पणा करुन थोडी तिखट पाणि पुरी माझ्या पुढ्यात ठेवायचा, नकळत मला भानावर आणायचा. माझ्या प्रतिक्रियॆवर ती खळखळून हसायची … एखाद्या अप्सरे पेक्षा सुंदर भासायची.
दुचाकी शिकवतांना…… तिच्या हाती स्टेरिंग देऊन, तिच्या थरथरणाऱ्या हातावर माझे हात ठेवायचो. त्या भितीच्या निमित्तानं का होईना, तिला स्पर्श करुन घ्यायचो. तिचा तो मखमली स्पर्श खूप सुखावत असे, आणि त्याचं स्पर्शानुभूतित सारा दिवस निघून जात असे. कधी कधी हळूच माझा उष्ण श्वास तिच्या मानेवर रुळायचा. कदाचित ती ही त्या श्वासात हरवून जात असेल म्हणून आम्ही कोलमडून पडायचो. झाल्यात हि जखमा शरीरावर पण तीनं जिद्द मात्र सोडली नाही. तिच्या थरथरणाऱ्या हातांना सांभाळणारे हात कधी तीच्या कमरे भोवती विळखा टाकू लागले कळलंच नाही. काही दिवसांनी, ती एकटीच सुसाट वेगात रस्त्यावर धावू लागली.माझी केविलवाणी नजर तीला दुरुनच पाहू लागली. तीचा तो दुरावा आता सहन होत नव्हता. का? शिकवलं हिला लवकर हाच पश्चाताप होत होता.
माझ्या मनाची घालमेल तीच्या बांबाना बहुतेक कळली होती. आमच्या लग्नाची पत्रिका दुचाकीवरच जुळली होती. आता आमच्या लग्नाला बरेच दिवस झालेत, गोड कडू असे बरेच क्षण हि येऊन गेलेत. पण दुचाकीवरचा तो आनंद पुन्हा कधी भेटलाच नाही ! कारण खोटं खोटं तीला आता शिकवू तरी कसं ……… आणि बसलोच पाठीमागं तर त्या भेदक नजरा खूप खूप छळतात. बोल त्या नजरांचे भरमसाठ……
काय हे उतारवयात चाळे ! , बघा हे पुन्हा यौवणात शिरतायं ! , कोलमडेल तेव्हा कळेल बाबाला !
अशा कितीतरी गोष्टी, म्हणुन सहसामीच ते टाळतो ………
आता पाणिपुरी हि घरीच येते, तीच्या डोळ्यात हरवायला वेळ मिळत नाही. नाजुक हाताला स्पर्श केला जरी तरी ते आता खरबरीत झालेय ! मानेवर रुळणारा तो उष्ण श्वास आता हळू हळू थंड पडू लागलाय.... आता उरलीय तीच दुचाकी आणि टकटकणारी अंधूकशी केविलवाणी नजर.... आता पुन्हा एकदा तिला म्हणावसं वाटतयं, शिकायला नकोस येऊ ! त्याच दुचाकीवरुन आपण दोघे लाँग ड्राईव्हला जाऊ, नसेल तो ठेला पाणिपुरीचा दुसऱ्याच ठेल्यावर पाणिपुरी ही खाऊ.
येशिल !!
©शिवा चौधरी
जामनेर,जळगांव
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें