रविवार, 10 जनवरी 2016

मी कुणब्याचं पोर

मी कुणब्याचं पोर

मी कुणब्याचं पोरं
उभ्या रानातलं ढोरं
माती कुतीत वाढलो
कसा होऊ शिरजोरं………

काळि माती शिकवते
मायेचा ओलावा जपणं
तिच्या भेगा शिकवती
दुःखात ही मज जीनं………

रंग पानांचा हिरवा
होई सुकून पिवळा
नाही पिकलं तरीही
गिळी दुःखाचा कोहळा………

जोडि बैलांची खिल्लारी
बळ देई जगण्याला
काय म्हणू पांडुरंगा
तुया ईपरित वागण्याला………

कधी सुकतं रे रानं
कधी हिरे पाचू पिकणारं
जरी भिडलो नभाशी
नाही इमानं ईकनारं………

माय मातीचे ऋण
नाही फिटतांना फिटे
तीची बघून दयना
कंठ कोरडाच दाटे………

किती येवो संकटे ही
नाही जीव सोडणारं
मज अभिमान माझा
मी कुणब्याचं पोर………

©शिवा चौधरी
जामनेर,जळगांव

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें