शुक्रवार, 15 जनवरी 2016

चाल तुले मया रोज मरणारा बाप दावतो

चाल तुले मया रोज मरणारा बाप दावतो

डिस्कवरितल्या सापांना न्याहाळू नको नुसता
चाल तुले जंगलमंधी जितेच साप दावतो
म्हाडीतुनच अंदाज बांधू नको आत्महत्येचे
चाल तुले मया रोज मरणारा बाप दावतो ………

पाऊस पाण्या वाचून जळतंय रान उन्हानं
बाप मह्या मरतो दुबार पेरणीच्या ताणानं
थकून भागून आल्यावर पोरास्नी जोजावतो
चाल तुले मया रोज मरणारा बाप दावतो ………

ताईच्या लग्नासाठी कर्ज घेतलंय ढिगभर
येता जाता मान वाके सावकारच्या दारावर
स्वार्थ्यांच्या साहणी देह चंदनागत झिजवतो
चाल तुले मया रोज मरणारा बाप दावतो ………

किडीनं पिक मेलं भाव कापसाला ही राहीना
म्हतारी ले औषध नही होई लेकरांची दैना
कधी कधी लेकरं राती भुकेलेच झोपवतो
चाल तुले मया रोज मरणारा बाप दावतो ………

फाटकी त्याची वस्त्र पायतान पायी टायराचं
जीवनी अवधळा साऱ्या जीनं काचकुयऱ्याच
काळि काळि माती केसांना शाम्पू म्हणून लावतो
चाल तुले मया रोज मरणारा बाप दावतो ………

सण नही वार नही नही लगन याव त्याले
शेतामंधीच खटनं पुजलयं तेच्या पाचीले
साऱ्यायच्या पोटाची खरीभुक तोच भागवतो
चाल तुले मया रोज मरणारा बाप दावतो ………

अठरा तास लोड शेडिंग वर बीलाचा बोझा
रंक करुन सोडलाय माझा शेतकरी राजा
लोटा लोटा पाणि देऊन पिकं थोडी जगवतो
चाल तुले मया रोज मरणारा बाप दावतो ………

थोडा खाई व्यापारी थोडं मोठं खातोय दलाल
निसर्गाचा मार न्यारा शुष्क देह होई हलाल
ज्याच्या मनी येई तो ढोलकी सारखा बडवतो
चाल तुले मया रोज मरणारा बाप दावतो ………

खस्ता खाता खाता संसाराच्या झाली अशी दुर्गती
नयनातूनी वाहे त्याच्या लुप्तप्राय सरस्वति
कंटाळून साऱ्या जाचाला गळ फास तो लावतो
चाल तुले मया रोज मरणारा बाप दावतो………

©शिवा चौधरी
    जामनेर,जळगांव

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें