शुक्रवार, 8 जनवरी 2016

पोवाडा जिजाऊंचा

जिजाऊ पोवाडा

प्रथम मुजरा हो आई आऊला
प्रथम मुजरा हो आई आऊला
नमन तुमच्या ही करतो चरणाला
वंदूनी माय माऊ-लिला
शाहिर गाऊ लागला
डफावर ताल असा धरला
शाहिर पोवाड्यात शिरला जी र हा जी जी… || 1 ||

{गद्य:- 12 जानेवारी 1598, सिंदखेड नगरीतला तो दिवस सोन्याचा ठरला. लखूजी जाधव आणि म्हाळसा राणि यांच्या उदरी, असे कन्या रत्न जन्माला आले. जीनं पुढं चालुन स्वराज्याचा शिल्पकार घडवला. तुमचा माझा राजा शिवबा घडवला.}

सती प्रथा तीनं मोडली
भूमि जगदेवाची फाळली
सत्यासाठी सदा नडली
सत्यासाठी सदा नडली
अशी जिजाऊ मायमाऊली जी रं हा जी जी…………… || 2 ||

{गद्य:- शहाजी राजांनी सोपवलेली पुण्याची जहागिरदारी सांभाळली, शिवबांसाठी आई आणि वडिल अशा दोन्ही भुमिका निभावल्या, निजामशाही व अदिलशाहींच्या स्वाऱ्यांमुळं पुण्याची दुरावस्था झाली होती, अशा वेळी शिवबाच्या पाठी खंबीरपणे उभे राहुन शहराच्या विकासकामावर भर दिला.}

शहर नव्यांने अभा...रले
स्थानिकांना अभयं दिले
मावळे दिलेरं जम...विले
इतिहासाचे शिल्प कोरले जी र हा जी जी………… || 3 ||

{गद्य:- शिवबांच्या मनात कर्तव्याची ठिणगी टाकली, शिवबाला शिकवले, शिवबाला घडविले, अन्याय करणारास कठोर शासन करण्याचे धाडस दिले. याचंच एक ज्वलंत उदाहरण म्हणजे रांझाचा पाटिल.}

गरजा शेतकऱ्या…च्या पुरविल्या
जनतेच्या आशा वाढ…विल्या
नाही न्यायात चु…का केल्या
अशा राजमाता होऊनी  गेल्या जी र हा जी जी………… || 4 ||

{गद्य:- सई बाईच्या निधनानंतर बाल संभाजीची सारि जबाबदारी घेतली, शिवबा प्रमाणं बाळ राजे संभाजींना ही घडविले, धर्माच्या ठेकेदारीला नजुमानता बजाजी निंबाळकरांना पुन्हा धर्मात घेतले, इतकचं नव्हे तर बजाजीच्या मुला संगे राजकन्या सखूबाईचा विवाह करुन राज सोयरिक ही साधली }

अशी द्रष्टा माऊली झाली
सहिष्णुता तिनं दावली
भल्याभल्यांची जिर…वली
समतेची शिकवण दिली जी र हा जी जी………… || 5 ||

{गद्य:- शिवबांच्या गैरहजेरित राजकारभार चालवला, राजे आगऱ्याला कैदेत असतांना उतारवयात ही राज्याची जबाबदारी कौशल्यानं वाहुन नेली, राजांच्या स्वाऱ्यांचा तपशिल ठेवला, त्यांच्या खलबतात सल्ला मसलतीत भाग घेतला, शिवबांचा राज्याभिषेक केला. स्वराज्याची संकल्पना राजमातेचीच.}

चारित्र्याची शिकवणं दिली
संघटनाची महिमा सांगिली
सत्वगुणाची घुट्टी पाजिली
ज्ञान चातुर्याचं दे ऊ नी गेली जी र हा जी जी…………… || 6 ||

{ गद्य:- इतकंच नाही तीनं शिवबाला राजकारणाचे धडे दिले, युद्ध कौश्यल्य शिकवले, न्याय संगत पणा शिकवला. अठरा पगड जातिंना एक समान वागणुक दिली. अशा आमच्या आऊ साहेब राजमाता जिजाऊ. त्यांची महती सांगावी तितकी थोडिच.}

सारा समाज गोळा केला
गोरगरिबासं आधारं दिला
स्वराज्याचा झेंडा रोविला
स्वराज्याचा झेंडा रोविला
माझा मुजरा अशा मायमा ऊ लीला जी रं हा जी जी…………
हो. || 7 ||

©शिवा चौधरी
    जामनेर,जळगांव

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें