एक हृदय द्रावक कथा
हि कथा सत्य घटनेवर आधारित असून पात्र आणि स्थान काल्पनिक आहेत.
गोष्ट त्या वेळची आहे, ज्या वेळी आमची नियुक्ति अतिमागास देशात होती. तिथली परिस्थिति फारच बिकट, ना कुठलं प्रशासन ना जिवनावश्यक वस्तुंचा मुबलक साठा. त्यामुळे तिथे काही ना काही घटना घडतच असायच्या, अगदी कुणाचा कोंबडा जरी चोरीला गेला तरी पोलिस पाचारण करत असतं आणि सोबतीला आमची तुकडी. कारण स्थानिक पोलिसांना ते लोक कमीच भित असतं, आणि आमच्या हजेरीमुळं ते उपद्रव थोडा कमी करत असत. इतकच नाही तर स्वतःला सुरक्षित ही समजत पण दुर्दैव आम्हाला तिथली भाषाच कळत नव्हती. भाषेतील दुवा असायचा तो द्विभाषी कर्मचारी, त्याच्या मुळे आम्हाला बरचं काही जाणून घेता यायचं. आमची ड्युटी कधी सकाळी तर कधी दुपारी असायची.
अशाच एका दुपारी साधारण 3 वाजत आले होते. मी आणि माझे सहकारी पोलिस मुख्यालयात चर्चा करत बसलो होतो. आम्ही नेहमी फावल्या वेळात अशा चर्चा करत असू. हो दररोज विषय मात्र बदलत असे कारण आम्हाला कधी कोणाची कोंबडी वा बकरी शोधायला जावे लागेल सांगता येत नव्हतं. आणि चर्चॆला तिथंच खंड पडायचा मग दुसऱ्या दिवशी दुसराच विषय. त्या दिवशी चर्चॆचा विषय होता "आई" जो तो आपल्या आई विषयी किंवा त्यांच्या पाहण्यात आलेल्या मातृ प्रेमाचे दाखले देत चर्चा रंगवत होता. "आई" म्हणतात या शब्दात सारं विश्व सामावलं असतं. तिचे उपकार कधी ही फेडले जाऊ शकत नाही. तिच्या प्रेमावर शंका घेतली जाऊ शकत नाही वगैरे वगैरे…………
दररोज प्रमाणं आज ही बोलावणं आलंच पण आज कुणाची कोंबडी शोधायची नव्हती तर, चक्क हत्येची केस होती. तो देश थोडा उपद्रवी म्हणून आम्ही चिलखत, जिरे टोप, शस्त्रास्त्र घेऊन सज्ज असायचो. हो फरक इतकाच हा सारा साजोसामान आधुनिक होता. म्हणजे बुलेटप्रूफ जकेट, हेल्मेट, बंदूक वगैरे... आणि हत्तेची केस म्हटलं तर हत्यारा ही जरा दमदारच असेल म्हणुन आम्ही तयारी निशी आपापल्या गाड्यात जाऊन बसलो. आमच्या तिन गाड्या आणि स्थानिक पोलिसांची एक गाडी, अशा चार गाड्या घटना स्थळाकडे निघाल्या. त्या दिवशी आमचा द्विभाषीक आमच्या सोबतीला नव्हता. तर तो जागे अभावी दुसऱ्या गाडीत बसला होता. गाड्या सुसाट वेगानं निघाल्या होत्या, रस्ता कच्चा असल्यानं धुळीच्या लोटात एकाबाजूचं काही दिसत नव्हतं तर दुसऱ्या बाजूनं काही मोडकी तोडकी घरं आणि झाडं सुसाट पळतांना भासत होती. कुणी बरं केली असावी हत्या ? आणि का? या आधीही अशा घटना घडल्या होत्या, तशीच लिंक डोक्यात लावून मी तर्काच्या घोड्यांचा लगाम सैल सोडला होता. अचानक लगाम लागावा आणि घोडा थांबावा तसा गाडीचा करकचून ब्रेक लागला. आमची डोकी समोरच्या सिटवर आदळता आदळता राहीली, आणि मी भानावर आलो. अरेच्चा आपण आज घोड्यावर नव्हे तर विंचवावर स्वार आहोत. म्हणजे स्कॉर्पिओ गाडीत हं !
आम्ही गाडीतून भराभर खालि उतरलो, सोबत रोजच्या मानसां ऐवजी एक व्यक्ति नवा दिसत होता. त्याचं नाव कार्ल् बहूदा तो गृहस्थ हत्येची सुचना देनारा होता. आमची काही माणसं गाड्यां जवळ सोडुन त्याच्या मागोमाग निघालो. कारण पुढे अगदी अरुंद रस्ता असल्यानं गाडी जाणे अशक्य होतं. आम्ही सुरक्षित अंतर ठेऊन, आजुबाजूला चौकस नजर ठेऊन मार्ग क्रमण करत होतो. काही पत्री घरं काही छपराची सर्वाच्या भिंती जवळ लाकडी फळ्यांच्या प्रत्येक घरा समोर दोन चार शेंबडी मुलं अगदी नग्न अवस्थेत तर एखाद दुसरी स्त्री अर्ध नग्न अवस्थेत उभी असलेली जग लाजेनं फक्त कमरेखालचा भाग झाकलेला तोही एकाख्या मळकट पण फॅशनेबल कपड्यानं कदाचित शेजारच्या श्रीमंत देशाच्या नागरिकांची उतरण असावी, असावी काय होतीच. कारण तसे बाजार आमच्या पाहण्यात आले होते. त्या स्त्रीयांच वय फारसं नसायचं पण भासायच्या मात्र वयस्कर. कारण तिथल्या स्त्रीया जरा स्थूल असायच्या. पोटात काही नसलं तरी साधारणा तीन चार महिण्याची गरोदर तर नाही ना ? अशी शंका यायची. कडेवर एखाद मुलं लटकलेलं आणि तेही स्तनपान करण्यात व्यग्र, पण आम्हाला पाहुन ते पण कुतूहलाने आम्हाला पाहू लागलं होतं. बहुदा त्यांनी क्वचितच पोलिस बघितले असावेत आणि तेही विदेशी मानसं चेहरा मोहरा सगळं वेगळं. आम्ही तिन नाले आणि चार टेकड्या पार करुन एका मोकळ्या मैदानात आलो. तिथे जवळच एक छोटासा तलाव तुंबला होता. त्यात की पुरुष मंडळी आणि स्त्रीया अंघोळ करत होते. त्याचं वर्णन मी इथे मुद्दाम टाळतो कारण ते आपल्या सभ्यतेला साजेसं नाही. साधारण विस मिनिट चालल्या नंतर आम्ही एका घरा समोर येऊन उभे राहीलो. गर्दीच्या नावावर तिथं कुणीही नव्हतं. आम्ही अधिकाऱ्यांच्या निर्देशावर चहु बाजूनं ते घर घेरलं. एव्हाना हत्या कुणी ? कुणाची? का केली ? आम्हाला काही माहीत नव्हतं. कार्ल्, दोन पोलिस वाले एक द्विभाषी आणि आमची तिनं जनं असे एकून सात जन आम्ही आत शिरलो. शिरतांना विशेष काळजी घेत आत शिरलो. हत्यारा तिथं असणं संभव नव्हतं पण खबरदारी घेणं गरजेचं होतं. तो आमचा पोलिसी खाकाच असतो. घर आजूबाजूच्या घरापेक्षा जरा बरं होतं, कदाचित त्या भागातली छोटीमोठी असामी असावी. आम्ही घराच्या मागच्या बाजूला पोहचलो. तिथं एक विशीतली स्त्री उभी होती, चेहऱ्यावर कसला ही भाव नाही काही नाही. जवळच एक पाण्याची टाकी, आणि एक पिवळ्या रंगाची बादली होती बादली शेजारी पाण्याच्या टाकीचं झाकण पडलं होतं. त्याच झाकणावर निपचीत पडलं होतं एक निरागस बाळ त्याच्या अंगावर एखादा कपडा सुद्धा नव्हता.ते बाळ काही तासापुर्वी जन्मलेलं असावं. काही तासापुर्वी म्हणण्याचं कारण हेच कि बाळाची नाळ सुद्धा कापली गेली नव्हती. नाळे सोबत बाळंत पणा नंतर स्त्री करवी त्यागल्या जाणाऱ्या इतर आतड्या ही तशाच।जुडल्या होत्या. तिथे हत्या कुणा मोठ्या माणसाची नव्हे तर त्या चिमुकल्या जीवाची झाली होती. आमच्या ऐवजी सामान्य व्यक्तिने जर हा प्रसंग पाहीला असता, तर निश्चित भोवळ आली असती. कार्ल ने स्थानिक भाषेत सारं वृत्त पोलिसांना सांगितलं. आणि ते आपली कागद कार्यवाही करु लागले. मी संधी साधून द्विभाष्याला पकडलं आणि सारी घटना जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा समोर आली ती हृदय दावक घटना अशी…………
लिंडा तीन वर्षापुर्वी तीचं लग्न जैन नावाच्या व्यक्तिशी झालं होतं. जैन नशेचा आदि असल्यानं दररोज काही तरी वादविवाद होत असत. प्रेम म्हणून त्या दाम्पत्यात नव्हतचं, होती ती वासनापुर्ती त्याच वासनापुर्तीचा परिणाम जैन कडुन तिला एक कन्यारत्न झालं होतं. लिंडाला वाटत होतं जैन आता तरी सुधारेल पण सारं निरर्थक उलट तो दिवसेदिवस जास्त नशा करायला लागला. परिणामी त्यांचा घटस्पोट झाला. लिंडाची मुलगी जैन कडेच राहीली. लिंडा आता एकाकी पडली होती ऐन् तारुण्यात ती एकटी झाली होती. आई वडीलांना स्वतःचे खायचे वांदे ते तिचा काय सांभाळ करणार, पण कार्ल दाम्पत्याने तिला सहारा दिला. थोड्या पगारावर तिला कामावर ठेवले, लिंडाची पोटाची आग विझत होती पण तारुण्याचं काय? अशातच कार्ल दाम्पत्याच्या व घरच्यांच्या नजरा चुकवून लिंडाचे गावातील एका पुरुषाशी सुत जुळले. स्त्रीला हवा असतो भावनिक आधार... तोच आधार शोधता शोधता आधार केव्हा व्यभिचार झाला कळलंच नाही. लिंडाच्या पोटात बाळ वाढत होतं पण अगोदर सांगितल्या प्रमाणं, स्थूलपणा मुळे ते कुणालाच जाणवलंच नाही. आणि समजलं ते आज, जेव्हा लिंडाला प्रसव पिडा होऊ लागल्या. तेव्हा ती कार्ल दाम्पत्याच्याच घरातील बाथरुम मध्ये गेली. कदाचित ही जागा तिला सोईची वाटली असावी. तास झाला तरी लिंडा बाहेर येत नाही म्हणुन कार्ल ने पत्निला शहानिशा करायला पाठवलं. हो आलेच म्हणुन लिंडाने आतूनच आवाज दिला. कार्लच्या पत्नी परत कामात व्यस्त झाल्या. थोड्याच वेळात लिंडा बाहेर आली आणि घरातील कामं आवरु लागली पण शरीरातुन होणारा रक्त स्त्राव ती आवरु शकली नाही. फरशीवर रक्ताचे डाग दिसल्यानं मिसेस कार्ल ने पतीला सुचना दिली व स्वत: तीच्या सोबत बाथरुम मध्ये जाऊन पाहीलं आणि त्यामुळे तीचं भिंग फुटलं व हे चित्तथरारक हत्येचं प्रकरण समोर आलं. लिंडाने काही मिनिटापुर्वी एका गोंडस बाळाला जन्म दिला होता. बाळ तिच्या पेक्षा किती तरि पटीनं सुंदर होतं आणि हे स्वतःच्या डोळ्याने पाहिलं होतं आणि त्या निष्ठूर मातेनं जन्मताच बाळची पाण्यात बुडवून हत्या ही केली होती. आणि वेळ मिळताच तिचा त्या बाळाला जंगली श्वापदाच्या हवाली करण्याचा ही मानस होता. पण कार्ल दाम्पत्यांच्या माध्यमातून हे प्रकरण समोर आलं. तिनं आपलं पापच लपवण्याचा प्रयत्नच केला नव्हता तर " आई " या शब्दला काळिमा फासला होता. थोड्या वेळापुर्वी आम्ही आईच्या माहात्या विषयी चर्चा करत होतो तर आता हे चित्र पाहुन मनात अनेक प्रश्न निर्माण होत होते.
लिंडानं नेमकं काय केलं ? योग्य केलं कि अयोग्य ? निरागस बाळाकडे बघून वाटलं अशी पापिणी आई होऊच शकत नाही. ती जर आई असती तर तीनं असं करणं शक्यच नव्हतं. कदाचित नऊ महिने तीनं पोटात बाळ वाढवलं नसून पाप वाढवतोय असंच समजलं असेल का ? तीनं शरिराची भूक भागवली हे योग्य होतं कि तीनं हा व्यभिचार केला होता? आणि काहीही केलं असलं तर हत्या का केली ? आणि हत्याच करायची होती तर वाढवलंच का? वगैरे वगैरे पुन्हा माझे विचारांचे घोडे भरधाव धावू लागले. आम्ही सगळी कार्यवाही आपोपून तिला अगोदर इस्पितळात पोहचवलं नंतर कोर्टात……… पुढे काय झालं याची माहिति काढायला वेळच मिळाला नाही. बरेच प्रश्न अनुत्तरितच राहीले.
© शिवा चौधरी
जामनेर,जळगांव
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें