सवाल जबाब
पहिला आमुचा मुजरा मंडळी
थोर शिवाजी राजानां……
अन मुसळा एव्हडं कुसळ लोचणी
तरी कळेना लोकांना जी जी रं जी |||
माझे राजे जी रं खरे राजे जी रं
(काय सांगताय शाहिर………)
अगं स्वार्थासाठी खोटंच लिहती
अन खोटंच दावती जनाला
जरी एखादी लिहतो सत्य
मुकतो आपुल्या प्राणाला गं गं गं
माझी राणि तु गं माझी राणि तु गं |||||
काय सांगताय तुम्ही शाहिर
असं हो कधी झालयं का?
अन् सत्य कधी असत्या म्होरं
सांगा बघू मेलयं का? रं रं रं
माझ्या राजा तु रं माझ्या राजा तु रं |||||
अगं काय सांगू तुला साजने
खोटं घुसवून इतिहास बाटवला
अन् सत्तेसाठी राजा आपुला
घातपाताने मिटवला गं गं गं
माझी राणि तु गं माझी राणि तु गं |||||
अशा साठी चला हो शाहिर
सवाल-जबाब आपण करु या
अन् गावरान या ठसक्या मधूनी
सत्य जगा म्होरं आणूया रं रं रं
माझ्या राजा तु रं माझ्या राजा तु रं |||||
(असं होय)
मग ऐक साजने सवाल माझा
कुणी दावले राजे खरे
अन् सांगत होते कोण शिवाजी
का जीवे मारिले पानसरे गं गं गं
माझी राणि तु गं माझी राणि तु गं |||||
(आता गं बया……)
जगा म्होरं येती शिवबा
जेव्हा फुले शोधती समाधी
अन् वाघा म्होरं कशा हो येतील
षंढांच्या त्या अवलादी रं रं रं
माझ्या राजा तु रं माझ्या राजा तु रं |||||
(आता माझा सवाल ऐका शाहिर…)
गुरु तयाचा असे निराळा
का ? सांगत सुटती दुसराचं
अन् जागा होता समाज थोडा
का ? इंगीत करती तिसराचं रं रं रं
माझ्या राजा तु रं माझ्या राजा तु रं |||||
अंग चाल तयांची कळुन चुकली
त्यासी किती करु दे हायतौबा
एक गुरु आई जिजाऊ
दुसरे गुरु तुकोबा गं गं गं
माझी राणि तु गं माझी राणि तु गं |||||
जागे पणी जे सोंगात झोपलयं
कसं तयांना उठवावे
अन् बुद्धि जयांची दुसऱ्या हाती
सत्य त्यासी कसे पटवावे गं गं गं
माझी राणि तु गं माझी राणि तु गं |||||
शिकलीय आता नवी पिढी
तीच जाणतील खोटं-खरं
अन् वाचुन खरा इतिहास राजांचा
सत्य आणतील जगा म्होरं रं रं रं
माझ्या राजा तु रं माझ्या राजा तु रं |||||
शौर्य जयांचे अनमोल शाहिरा
मुजरा साऱ्या मावळाला
अन् सरते शेवटी पुन्हा एकदा
वंदन आपुल्या राजांना जी जी रं जी
माझ्या राजा जी रं माझ्या राजा तु रं |||||
©शिवा चौधरी
जामनेर,जळगांव
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें