मनाला भावतं……
मनाला भावतं……
तुझं उगवतीच्या पानासम
कोवळं दिसणं,
अन् उथळ झऱ्यासम
खळखळून हसणं.
मनाला भावतं……
तुझ्या रेशमी केसांचं
भुरभूर उडणं,
अन् नाजुक पापण्यांच
हळुच फडफडणं.
मनाला भावतं……
तुझ्या डाळिंबी ओठांचं
लालजर्द दिसणं,
अन् नाजूक नाकाचं
चाफेकळी असणं.
मनाला भावतं……
तुझं टुकूर टुकूर
माझ्याकडं बघणं,
अन् नजर मिळताच लाजून
जमीनीकडे बघणं.
मनाला भावतं……
उगाच गळ्यातल्या माळेच्या
मण्यांशी खेळणं,
अन् शुभ्र दातांच्या जात्यात
ओठाला दळणं.
मनाला भावतं……
तुझं लटक्या रागातलं
खोटंखोटं रुसणं,
अन् हळूच तोंड लपवत
गालातचं हसणं.
मनाला भावतं……
तुझ्या कानातल्या झुंबराचं
हळूच हलणं,
अन् मैत्रिणीच्या बहाण्यातून
माझ्याशी बोलणं.
मनाला भावतं……
तुझं लाजाळू समान
साजूक लाजणं,
अन् श्रावण सरींखाली
चिंबचिंब भिजणं.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें