खपली
करुन घाव रक्त सांडण्या
सारे इथं टपली,
उगाच नाही जपत आलो
जखमेवरची खपली || धृ ||
जखम केली पावसानं
जाळलं सारं रान,
पाण्या वाचुन गुरंढोरं
सोडू लागली प्राण,
उरल्या सुरल्या पिकानं
मान खाली टाकली…
उगाच नाही जपत आलो
जखमेवरची खपली……………
काढुन खपली त्रास होतो
पुन्हा अनावर माझा,
सावकाराच्या दारी जाता
दिसे बंद दरवाजा,
वेदनेच्या वनव्यामंधी
रक्तासंग काया सुकली…
उगाच नाही जपत आलो
जखमेवरची खपली……………
मलम म्हणुन आम्हा
दिल्या थोड्या टिकल्या,
जखमेवर मीठ चोळतांना
का? असतील लाजा विकल्या,
नाव मोठं करण्यासाठी
असतील का? ती चगली…
उगाच नाही जपत आलो
जखमेवरची खपली……………
जित्यापणी मरतांना
कुणी तिथं फिरकत नाही,
का करतोय आत्महत्या
कुणीच का विचारत नाही,
मेल्यानंतर पोरांसंग
फोटो काढण्या झुकली…
उगाच नाही जपत आलो
जखमेवरची खपली……………
आरं शेती संग मरणाची
कारण असती खुप,
जित्यापणी मारतीया रं
चिमुकल्यांची भुक,
शेतकऱ्यांच्या आनंदाची
गाडी कशी हुकली…
उगाच नाही जपत आलो
जखमेवरची खपली……………
आज सांगतो ठोकुन छाती
संकटाशी लढणार,
किती येवो दुःख तरी
संघर्ष मी करणार,
देईन मज सहारा
ही काळि आई आपली…
उगाच नाही जपत आलो
जखमेवरची खपली……………
चला ऊठा संघर्ष करा
अजून थोडा धीर धरा,
पावसा संग तारेल रे
आपणाला वसुंधरा,
देव"इंद्राची" कुणाजवळी
नका करु रे चुगली…
उगाच नाही जपत आलो
जखमेवरची खपली……………
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें