शनिवार, 30 अप्रैल 2016

बाप 3

बाप माझा मायाळू

लेकरांसाठी माय होतो
वासरांसाठी गाय
बाप माझा मायाळू जसा
दुधावरली साय…………

लेकरांना घास देतो
जनावरांशी चारा
पोटासाठी बाप माझा
फिरे गरागरा,
फिरता फिरता दमून
कधी दुखेना का पाय
बाप माझा मायाळू जसा
दुधावरली साय…………

पावसाची झळ सोसे
संग सावकारी देणं
शेतामंधी राबून तुला
मिळेनाच धनं
आमच्या साठी बापा तुही
सदा हाय हाय
बाप माझा मायाळू जसा
दुधावरली साय…………

योजनेच्या नावाखाली
सरकार देई फाटा
हृदयात तवा तुह्या
रुते बाबा काटा
काटा रुते हृदयात
रघात डोयावाटे जायं
बाप माझा मायाळू जसा
दुधावरली साय…………

दोन बुक शिकावं मीन्ह
वाटे तुले जव्हा
एक आना भेटेना रे
खिशामंदी तव्हा
खिशामंदी हात घालता
आरंपार जाय
बाप माझा मायाळू जसा
दुधावरली साय…………

लगिनाला पोर आली
जोय नाही पैसा
कोपऱ्यात बसुन बाबा
रडे ढसाढसा
फाटक्या पदरानं मंग
डोये पुसे तेचे माय
बाप माझा मायाळू जसा
दुधावरली साय…………

ताई म्हणे बाबा
रडू नको ढसाढसा
लढू आम्ही तुया संग
ठेव भरवसा
आमच्या साठी बाबा तुले
जगायंच हाय
बाप माझा मायाळू जसा
दुधावरली साय…………

डोक्यावरुन हात फिरवत
सांगे बाप मले
शिक पोरा शिक तू रे
साहेब व्हयाले
जगामंदी शिकणारायचा
रुबाब पोरा लय
बाप माझा मायाळू जसा
दुधावरली साय…………

माय म्हने धनी मले
जीव द्यावा वाटे
आपल्याच जिवनात
कसे बरे काटे
पोरायची दैना धनी
होतीय लय लय
बाप माझा मायाळू जसा
दुधावरली साय…………

बाप म्हणे खुळी तू गं
समजेना काही
मरुन काही समदेच
प्रश्न सुटत नाही
मया मांगे काठी वाणी
नुसती उभी राह्य
बाप माझा मायाळू जसा
दुधावरली साय…………

कितीही केलं  कवतिक
बाबाचं तरी
बापा खेरीज कुणी नाही
मह्या अंतरी
चरणात  होऊ दे लिनं
दाव रे तुझे पाय
बाप माझा मायाळू जसा
दुधावरली साय…………

शिवा चौधरी
जामनेर,जळगांव

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें