|| जय जिजाऊ ||
दिनांक:- 07/04/16
क्षत्रिय कुलवंतास …… कुळवाळी भुषण, बहुजन प्रतिपालक, राजमान्य राजश्री, श्रीमान शिवाजी महाराज यांना आपल्या स्वराज्यातील आपल्या मृत्यूनंतर सुमारे 300 वर्षानंतर जन्मलेल्या एका सामान्य नागरिकाचा मानाचा मुजरा..………
महाराज पत्र लिहण्याचे प्रयोजन असे कि, मी शोधतोय…… तुम्ही स्थापन केलेले स्वराज्य, मला हवंय ! आपल्या साम्राज्यात असायचं, तेच रयतेच्या चेहऱ्यावरलं हास्य ! पण ते सापडनेसं झालयं हो. अहो राजे ! वर्तमानात तर ते हरवलंयच, पण इतिहासात ही ढवळाढवळ होतेय, त्याचं विकृतीकरण होतयं…… त्यामुळे भविष्यात काही महाभंयकर घडणार तर नाही ना? याची चिंता सतवतेय. पण त्याला थांबवायची ताकद, माझ्या सारख्या कोणत्याच मावळ्यात नाही. हाच का तो महाराष्ट्र? जिथे तुम्ही स्वराज्य स्थापण केलं होतं. राजे तुमच्या स्वराज्यात तुम्ही काढलेल्या आदेशाचं जातीनं पालन व्हायचं, याचं जीवंत उदाहरण म्हणजे तुम्ही काढलेला तो आदेश.……
कि कोणत्याच शेतकऱ्याच्या शेतातून घोडदळ किंवा पायदळ नेवू नये, शेतमालाची नासधूस करु नये. या आदेशाचं पालन करत, एका शेतकऱ्याच्या मुलानं चक्क तुम्हालाच बांधावरुन जातांना अडवलं. आणि तुम्हाला तुमच्याआदेशाची आठवण करुन दिली, व मागं फिरवलं. आणि तुम्ही ही फिरलात. इतकंच नाही तर तुम्ही त्या मुलाचं कौतुक करुन पाठ ही थोपटलीत. पण इथं…… इथं तसं अजिबात राहीलं नाहीये महाराज. इथले काही राजकारणीच बऱ्याच नियमांची पायमल्ली करतांना दिसतायं. आणि हो, थाप ही पडते बरं का.…… पण कौतुकाची नव्हे ! कार्यकर्त्यांची, आणि नुसती थापच नाही तर ते तुडवेस्तोर मारतात हो. तेव्हा आठवण होते आपल्या स्वराज्याची, आज आमच्यात बोलायची ही हिंमत नाही. मग आम्ही जाब विचारावा तरी कुणाला? पण आज हिंमत करतोय प्रतिलिपी च्या पत्र लेखन या उपक्रमातून………
राजे अहो शत्रूच्या मुलींना साडीचोळी देऊन रवानगी करण्याची रित आपली !……… पण इथं तर आता बापच मुलीवर डोळा ठेवू लागलाय, भाऊ बहिणीचं पवित्र नातं भाऊ पायाखाली तुडवू लागलाय. का? …… का तर नशेनं तरुणाईचं पार वाटोळं केलयं महाराज …… तुम्हाला डोक्यात घेण्या ऐवजी डोक्यावर घेणारी ही तरुणाई लयास जातेय हो! कसं आवरावं हे ही कळतं नाही. मला माहित आहे, तुमच्याकडे जादू नाही किंवा कुठला चमत्कार ही नाही, कि या बिघडणाऱ्या तरुणाईला दाखवलं जाईल .पण निदान या तरुणाईला सद्बुध्दी तरी लाभू द्या महाराज ! आज नाबालिकेवर बलात्कार करुन मारुन टाकलं जातयं. 3-3 , 4-4 वर्षाच्या त्या निष्पाप मुली ही सोडल्या जात नाहीये. याला काय म्हणावं? राजे !…… यातिल काही प्रकरणं उघड होतात, तर कितीतरी प्रकरणं दाबली जातात. पैशाच्या जोरावर गरिब रयतेला छळलं जातयं. आणि प्रकरणं दाबणारेच उघड झालेल्या प्रकरणातील मेनबत्ती रॅलीत सामिल होतांना दिसतात. साळसूद पणाचा आव आणतात. महाराज गनिमा कावा शत्रू विरोधात वापरावा असं आपल्या कडून शिकलोय आम्ही, पण तेच कावे आता कुठेही वापरले जाताय. पण मी म्हणतो राजे ती रॅली काढायची वेळ तरी का यावी बरं ! …… स्वतःच्या बहीणीकडे वाकड्या नजरेनं बघणाऱ्याचे डोळे फोडुन काढायची भाषा बोलणारे मात्र दुसऱ्याच्या बहिणीकडे कामुक नजरेनं बघताय. तसं बघतांना त्यांच्या डोळ्यात जळजळ ही होत नसेल का हो? महाराज अश्याच प्रकरणात तुम्ही रांझाच्या पाटलाला कठोर शासन केलं होतं. पण आजचे शासनकर्ते अशा रांझ्याच्या पाटलांना वाचवण्यासाठी प्राण पणास लावताय. आणि काही तर चक्क रांझाचे पाटील होताय हो ! मग तरुणाईला तरी दोष कसा द्यायचा महाराज !…………
राजे मी सत्य बोलतोय खरा, पण ते कितीतरी मनाला बोचत असावं. मी इतका मोठा नाही तरी सुद्धा असेच बोलणाऱ्या बऱ्याच विद्वानांना इथं चक्क मारुन टाकण्यात आलंय. आता महात्मा फुल्यांच्या पुण्याईने सारेच शिक्षित झाल्यानं.… आणि महामानव बाबासाहेबांच्या संविधानामुळं, त्यांना तुकोबांना जसं सदेही वैकुंठाला गेल्याचं कुंभाट रचलं होतं तसं रचता आलं नाही. आणि दाभोळकर, पानसरे आणि कलबुर्गी सारख्यांना संपवण्यात आलं. आणि जनतेला दुसराच आरसा दाखवला गेला. राजे, राजे जातिवादानं महाराष्ट्रा सह साऱ्या देशालाच होरपडंय. मनुस्मृती गेली , पण…… त्याची उपज असलेली वर्ण व्यवस्था आज ही शेकडो प्राण घेत असते. हिला कुठंतरी थांबवायची गरज आहे महाराज ! पण कोण ? आणि कसं? थाबवणार हे कळणासं झालंय. म्हणून तुम्हाला पत्र लिहून सल्ला मागायचा हा उपद्व्याप मी केलाय.
राजे स्वराज्या अगोदरच्या काळात जसं सारा जास्त गोळा व्हायचा आणि सरकारी तिजोरीत कमी पोहचायचा अगदी तसंच पण इथं थोडं उलट झालंय. ज्या योजना गरिब जनतेसाठी सुरु केल्या जातात, त्यांचा पुरेपुर फायदा त्यांच्या पर्यंत पोहचतच नाही. मधली फळीच दिवसेदिवस गबर होत जातेय. महाराज ! ……… महाराज तुम्ही नुसतेच हसत आहात ! तुम्हाला नाही का हो वाटत ? कि जशी तुमची किर्ती आहे तशीच या महाराष्ट्राची रहावी. हं……… वाटत ही असेल म्हणा... पण तुम्ही तरी काय करणार ! जर एखादी जडी बुटी उगळून पाजायची असती तर केव्हाच पाजली असती, हे ही मी जाणतो. पण अक्कल वाटणार तरी कशी ?
राजे हा जो प्रकार घडतोय याला काही अंशी आम्ही, म्हणजे ही "सद्याची रयत" ही तितकिच जबाबदार आहे, असं म्हणायला काहीच हरकत नाही. महाराज संविधाना नुसार आमचा नेता आम्हीच निवडतो. पण योग्य नेता आम्ही निवडूच शकत नाही. कारण ती मंडळी प्रलोभनाची अशी मलई खायला घालते कि ती मलई येई पर्यंत आमच्या लालची रयतेचा पाय मतदानासाठी घराबाहेरच पडत नाही. पैशाच्या जोरावर निवडून येणारे राज्यकर्ते विकास कसा बरं करणार ! विकास होतो महाराज पण तो विकास म्हणजे अनैतिक संबंधातून झालेल्या बाळाचं नाव असतं. कारण त्यांनी जो पैसा जनतेला वाटलाय तोच व्याजासहित अपहत करायचा असतो. आणि आम्ही ओरडतो विकासाच्या नावानं ……… रागवू नका महाराज हे मी सत्य तेच सांगतोय. वाटलं होतं का तुम्हाला? तुमच्या जाण्यानंतर काही शतकातच असं होईल म्हणून……… आणि तुमच्या साकारलेल्या स्वराजाचा असा बेरंग होईल तो……
इतकंच नाही हो महाराज ……… इथं शिक्षणाचा ही बाजार सुरु झालाय अव्वाच्या सव्वा डोनेशन घेऊन ज्ञान वाटलं जातयं. ज्ञान कसलं कागदाच्या तुकड्यावर ज्ञानी असल्याचा लेखी पुरावा दिला जातोय. नर्सरीत शिकणारांना ही हजारो रूपये डोनेशन द्यावं लागतयं. त्याच पैशाच्या जोरावर त्यांच्या कार्यालयात एसी बसवले जातात. आणि त्या मुलांना साधा पंखा ही नसतो हो…… शाळेच्या भोजन योजनेत ही भ्रष्टाचार होतोय. सरकारी कर्मचारीच मुलं प्रायवेट शाळेत टाकताय, मग सरकारी शाळेची पत तरी कशी सुधारणार? सुधारली ही असती पण त्या मास्तरांना दुसरीच कामे जास्त वाटली असतात अहवाल बनवा, निवडणूका करा, ईतकंच काय संस्था चालकांच्या घरी किती तरि शिक्षक पाणि भरतांना दिसतात. आता पाणिच भरायचं होतं तर शिकलास तरी का बाबा? हा प्रश्न पडतो. सरकारी बांधकाम इतकं निकृष्ट असतं कि उद्घाटना आधिच कोलमडून पडतं, तेव्हा हेवा वाटतो शिवकालिन बांधकामाचा ………
याला जबाबदार कोण ? महाराज ! हेच कळत नाहीये विकत डिग्रि घेतलेले बोगस डॉक्टर, मेहनती आणि हुशार डॉक्टरांची ही पत घालवतायं. मानवी अवयवाची तस्करी करणारे ही बोगसच . महाराज गणिताचं सुत्र माहीत नसणारे इथं खजांची होऊन बसलेय. शिक्षणाची पात्रता नसणारांना शिक्षण पद्धतीचा ठेका दिला जातोय. कुणी आपलं अडाणी पण लपवण्या साठी डिग्रि विकत घेतोय, तर कुणी देशाला चुना लावायला डिग्य्रा विकतोय. महाराज सगळाच खेळ झालाय……… अरे हो! खेळावरुन आठवलं, खेळात ही सट्टा लावला जातोय. मोठमोठ्या खेळाचं आयोजन करुन स्टेडियम बनवतांना पैसा खाल्ला जातोय. इतकंच नव्हे काही खेळाळूच मैच मध्ये सट्टा लावताय.तर काही डोपिंगचे दोषी सापडतायं. इतक्यावर जर हे खेळाळू थांबले तर गनिमत सांगता येईल महाराज…… अहो चक्क फिक्सिंग करुन पैसा कमवायचा शॉर्ट कट मार्ग निवडताय. यातून ते काय सिद्ध करताय तेच कळत नाहीये. महाराज राजकीय पक्षांची तर इथं कमीच नाही ज्याला वाटलं त्यानी उठावं आणि पक्ष स्थापन करावा. आणि तुमच्या नावाचा वापर करुन सामान्य मानसांच्या भाबडे पणाचा फायदा घेताय. महाराजांनी असं म्हटलंय, तसं म्हटलयं म्हणून तुम्ही असं करा तसं करा. म्हणून उगाच रयतेला आपापसात भडकवले जातेय. महाराज तुमच्या सैन्यात किती तरी वफादार मुस्लिंम सैनिक होते, पण ईथं महाराज मुस्लिंम विरोधी होते असं खोटं चित्र रंगवलं जातयं. हिंदू मुस्लिंम दंगे घडवले जाताय. काही हिंदू तर काही मुस्लिंम दबंग लोकांनी जनतेच्या भाबडे पणाचा फायदा घेत राज्यात दोन गट निर्माण करून ठेवलेय. इतकच नाही तर या दोन गटात पुन्हा त्यांनी उपगट निर्माण केलेय. अहो इतकंच काय 31 डिसेंबर
साजरे करणारे, स्वतःचे वाढदिवस इंग्लीष् कॅलेंडर नुसार साजरे करणारेच, तुमची जयंती तिथी नुसार साजरी करताय. एक गट तारखेनुसार तर एक गट तिथी नुसार असा वाद निर्माण करुन जनतेत फुट पाडत आहेत आणि वर पुरस्कृत ही त्यांनाच केलं जातयं. वर बोलबोला हि त्यांचाच………
बरं ते असू द्या ! पण निदान सत्य तरी जगापुढं आनावं ना महाराज , पण इथं असत्य मांडलं जातयं. एखाद्या व्यक्ति विषेशचा उदोउदो केला जातोय. आता तुमचंच उदाहरण घ्या राजे…… आता तुम्ही इतकी मोठी कामगिरी केली, परंतु त्याचं श्रेय तुमच्या पराक्रमाशी दूरदूर संबंध नसणारांना दिलं जातयं. अमका होता म्हणून शिवाजी महाराजांना हे शक्य झालं असं चित्र रंगवलं जातयं. पण मी म्हणतो कुणी श्रेष्ठ असेल तर मान्य करायला पैसे मोजावे लागतात कि काय? एखादी व्यक्ति मुळातच हुशार आणि मेहनती असते, मग ते मान्य करा ना. हे जातिवर जातात राजे. यांचा हा जातिवाद कुणी ठेचून काढावा महाराज.
राजे जगात असला जातिवाद नसल्यानं, अमेरिका रशिया सारखे देश , दिवसा दुप्पट रात्री चौपट अशी प्रगति करत आहेत. राजे सुमारे दिडशे दोनशे वर्षापूर्वी मानवाने चंद्राची वारी केली, पण आम्ही अजून ही उंद्राभोवतीच फिरत आहोत. राजे मनात श्रद्धा असावी, पण श्रद्धॆतून अंधश्रद्धेने जन्म घ्यावा व व्यक्ति कर्मापेक्षा दैवीशक्तीवर भरवसा ठेवून निगरगठ्ठ व्हावा हे मला पटेनासं झालंय. बरं थोडी श्रद्धा ठेवली राजे काही हरकत नाही, पण मग त्या श्रद्धा स्थानांवर स्त्री पुरुष भेदभाव का? स्री मुळे सृष्टि दिवसेंदिवस वृद्धिंगत होतेय मग तिचा विटाळ अपवित्र का? कोल्हापूरला गाभाऱ्यात स्त्रीयांना प्रवेश का ? नाकारतात. का? शनिचौथरा प्रवेश बंदी. राजे मी तुम्हाला इतकं सांगतोय म्हणून वाईट वाटून घेऊ नका, पण मी सांगतो याच स्रीने जर का बंड पुकारले तर सर्व धर्माच्या ठेकेदारांना पळता भूई फार होईल. त्यांची दुकानदारी बंद होईल. आणि दुसऱ्याला साडेसातीत अडकवणारा शनिदेवालाच स्रीची साडेसाती लागेल. राजे इथं अशी अनेक देवालये आहेत ज्यांच्याकडे अमाप संपत्ती आहे. पण त्याचा वापर फक्त विशिष्ट वर्गापुरताच मर्यादित आहे. ती धनदौलत वापरा कि विकास कामाला , काढा शिक्षण संस्था त्यातून…… द्या गरिबाला मोफत शिक्षण. पण नाही सर्व जर एक सारखे झाले तर यांचा केर कुणी काढावा? गटार कुणी उपसावी? मेलेली गूरे कुणी उचलावी ? खूप हुशार आहे ही मंडळी राजे ! स्वार्थ बरोबर कळतो यांना. महाराज फतव्याच्या नावाखाली इथं मनमानीही केली जाते, स्रीयांना बुरखा जबरदस्ती घालायला भाग पाडलं जातं. तुमची मनस्थिती काय होत असेल हे सारं वाचून, याची जाणिव आहे महाराज मला.……………
पण तुम्हाला लिहत असलेल्या पत्राच्या माध्यमातून मी या जागेपणी झोपलेल्यांना जागवू पाहतोय. मला कल्पना आहे, माझं हे पत्र बिनबुद्धीचे लोक बावळटपणा म्हणुन सोडुन देतिल. पण जो सद्सद् विवेकबुद्धी वापरत असेल त्याचेही विचार असेच असतिल हे मात्र नक्की. लिहण्यासारखं भरपूर आहे पण वाचकाचा मनाचा ठाव घेत जरा कमीच लिहतोय , अन्यथा ही मंडळी वाचणारच नाही , कारण यांना स्क्रोल डाऊनचं ऑप्शन माहीत आहेच ते सरळ दर्लक्षित करतिल.
असो महाराज मी असं म्हणणार नाही तुम्ही पुन्हा जन्म घ्या कारण ते शक्य नाही. मी फक्त त्या आयांना आवाहन करतो कि, हे माऊल्यांनो तुम्ही एकजूट व्हा अन प्रत्येक घरात शिवबा घडवा.मग बघा "आपलं स्वराज्य" त्याचा झंडा 360° फिरकेल. महाराज पत्राचा शेवट एका पोवाड्यानं करतो. माझ्यामनातल्या भावना इथं मोकळ्या करतोय.
।। शिवबांचा जागर ।।
असत्याची मळून माती
घडवू सत्याची घागरं
जिजाऊंची करु वंदना
घालु शिवबांचा जागर -5 || धृ ||
जगदेव तयांनी असा नमविला
सोन्याचा नांगर फिरवीला
ध्यास स्वराज्याचा हो धरला -2
राजे बसले तोरण्यावर ||1||
जाति अठरा पगड केल्या गोळा
भान हरपूनी लढला मावळा
सोडून अर्धा लगीन सोहळा -2
अशी पिरती राजांवर ||2||
परिवर्तनाची पेटवू नांदी
प्रतिगाम्यांची करुन कोंडी
पुरेगाम्यांच्या काढून झुंडी -2
मात करु अन्यायावर ||3||
शाहू फुलेंचे विचार मांडतोय
ज्ञानाचं चांदणं सांडतोय
सत्यासाठी जगाशी भांडतोय -2
गाऊ अभंग तुकोबांवर ||4||
अंबेडकरांची शिकवण स्मरुया
विकासाची कास धरुया
हक्का साठी सारे लढूया-2
जरी बेतलं जिवावर ||5||
आम्ही शिवबांचे मावळे
गिरवू इतिहासाचे धडे
खरा इतिहास मांडू जगापुढे -2
सारं सांगतो पुराव्यावर ||6||
कळावे लोभ असावा. आपणास पुन्हा एकदा मानाचा मुजरा…………
जय जिजाऊ
जय शिवराय
जय ज्योति
जय भीम
जय अहिल्या
जय तुकोबाय………
इतश्री_____
आपला एक सामान्य मावळा
शिवा चौधरी
जामनेर, जळगांव
Whats app no 8275493221
अतिशय सुंदर
जवाब देंहटाएं