गुरुवार, 3 दिसंबर 2015

स्वप्न कविता

सुंदर स्वप्न

लाज लाजरी दिसे साजरी
जशी स्वर्गाची भासे परी,
क्षणात रुसते क्षणात हसते
राग तुझा गं नाकावरी……

नयना मधूनी अलगद चमके
चमके प्रणयी मादकता,
चेहऱ्या वरती तुझ्याच शोभते
प्राजक्तफुलांची साजुकता…

कुरळे कुरळे केस साजरे
रेशमास ही लाजवती,
हळुच उडती स्वप्नी माझ्या
निद्रेतून मज जागवती…

डाळिंबासम अधरावरती
नागिणी गत जीभ फिरे,
दंश तयाचा मजला व्हावा
जरी रक्ताचे वाहतील झरे…

रवी किरणांच्या तेजाहुन ही
कर्ण कुंडले चमचमती
इर्षेने त्या चंद्र चांदण्या
अंगारासम धगधगती…

चाफेकळी नासिका भरते
श्वास अंतरी मदनाचा,
बाहूपाशी तुझ्याच मिळतो
हर्ष मनाशी जगण्याचा…

सुवर्ण कांती अटकर बांधा
मनास माझ्या भुलवितो,
ताजी ताजी परडी मधली
कलिका हृदयी फुलवितो…

विणेच्या सुरात तुझे
स्वर
असे काही गं  विरघळती,
निघताची अंतरा मुखातूनी
रोम रोम ही गीत गाती…

नृत्यामध्ये मोर नाचरा
कंठी कोकिळ बसलासे,
रुपाची तू खाण सखे ग
स्वर्ग भूवरी वसलासे…

रुपवान तू सुंदर नारी
आलिंगन मज देशिल का?
अर्पिन तुजला जीवन सारे
वास्तवात तू येशिल का?

©शिवा चौधरी
    जामनेर,जळगांव

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें