बाप
सुखलेल्या रानामंधी
बाप अनवाणी चाले
त्यच्या जगण्याची व्यथा
कुरूप पायातलं बोले …!!!
त्यच्या जिव्हारी चटका
वर पाण्याचा फटका
कसा करलं रे बाप
मह्या संसार नेटका …!!!
भेगाळली भूमि सारि
आटल्यात पाटचाऱ्या
किती केल्या पांडूरंगा
तुया दारि त्यानं वाऱ्या …!!!
रोज राहतीस त्यास
मिठ भाकरीचे वांधे
नाही दायदाणा घरी
माय अंबाडीच रांधे …!!!
घरी लगनाची पोरं
सळसळते डोळ्यात
रोज डूबती बुब्बूळं
आसवांच्या रे तळ्यात …!!!
सडे घामाचे शिंपून
फुलवलं होतं रानं
एका झटक्यात सारं
ईस्काटलं का? सपान …!!!
आसवांच्या तळ्यामंधी
बाप रोजरोज न्हातो
त्यच्या मरणाचं गाणं
मुक्या आवाजात गातो …!!!
आम्ही बळीची रे प्रजा
नाही जहर पिणारं
सावकारी भयापायी
नाही फास ही घेणारं …!!!
पुन्हा उठलं रे बाप
नवा हुरूप घेऊन
माय निघलं साथिला
त्यची सावली होऊनं …!!!
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें