धनी
या मातीच्या जोरावर
धनी साऱ्यांशी भांडतो
नाही भरवसा तरी
डाव मातीत मांडतो ……!!
उरी हिरवं सपान
धनी रोजं फुलवतो
रानं करुन जीवाचं
धनी लेकरं पोसतो ……!!
रोज जातोय शेतात
नवी घेऊन उभारी
बैलजोडीला विकून
पिक पेरतो शिवारी ……!!
बैलजोडीच्या बदली
जू खांद्यावर घेतली
दाणा पोटचा राखून
मुठं चाड्यात सोडली ……!!
जरी केली त्याची थट्टा
सरकार दरबारी
जरी देती त्यास दगा
पावसाच्या चिंबसरी ……!!
राती हताश होऊन
धनी आढ्याकडे पाही
दिस उगल सोन्याचा
धनी आशेवर राही ……!!
धनी बोलला मजला
जीव देऊ कसा सांग
मह्या मरणानं राणी
नाही फिटणार पांग ……!!
या दुनियेशी साजने
मी हिंमतीनं लढीनं
काळ्या आईस हिरवा
सखे शालू नेसविन ……!!
काळ्या मातीत आमचं
सारं सपान जळलं
तरी धन्यानं माझिया
नाही जगणं सोडलं ……!!
©शिवा चौधरी
जामनेर,जळगांव
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें