शुक्रवार, 5 अगस्त 2016

बापाचं सपान

सपान

माय मह्यी रखूमाई
बाप विठू गं सावळा
भरल्या डोयात दिसतो
हिरव्या पिकाचा सोहळा

सारी हयात खपली
तरी वल्याच जखमा
बापापाठी फिरे माय
अनवाणी गं रखमा

दानं देईन ही माती
थोडा धिर जरा धरु
म्हणे बाप कारभारने
चल मेहनत करु

गेला अनवाणी विठू
पुंडलिकाच्या भेटीस
केला विटेवर उभा
धरला त्याला बी येठीस

देव असो वा मानव
वाट पहावी लागते
दाणं भरता कणीसातं
चाहूल पाखरां लागते

दाणा दाणा कोरून खायी
पाखरू गं रानामंदी
नाश होऊन बी पिकाचा
खुशी त्येच्या मनामंदी

बाप सादा भोळा मह्या
समजे साऱ्यांचा रूजिकं
त्येचा दिल्लदार पणा
शिवारी डोलवितो पिकं

पिक डोले वाऱ्यावरी
बाप खुशित नाचतो
भरल्या डोयामंदी कसा
हिरवं सपान येचतो

नको ढिग जोंधळ्याचा
बस मिळावी भाकरी
मह्या बापाचं सपान
फुलू दे रे यंदातरी

शिवा चौधरी
जामनेर,जळगांव

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें