*सशक्तीकरण*
अजून किती दिवस बनवणार आम्हाला ताटाखालचं मांजर ?
किती दिवस घोळावा गोंडा,
चूल आणि मुला भोवती……
कशा सहन कराव्यात बलात्कारी नजरा,
आणि गर्दितून जातांनाचा मुद्दाम केलेला घाणेरडा स्पर्श....
कशी वळते निर्लज्ज जीभ "मस्त माल" म्हणायला,
कशी लवते पापणी निसर्गानं दिलेल्या देणगीकडे पाहून…
कुठं गहाण असते बुद्धि, मैत्रिणींवर अभद्र शेरे मारतांना,
आणि कसा बदलतो पवित्रा तिच्या भडकण्यावर……
कसं स्विकारु शकता तेव्हा पळपुटे पणाचं धोरण.
का जाळतात त्या मेणाच्या कांड्या माझं शील भंगल्यावर,
का सुचतात नंतर उपाय योजना निर्भयाला संरक्षण देण्याच्या……
त्या आधि कुठं असतं तुमचं प्रकांड पांडित्य……
की नुसताच असतो ? प्रसिद्धीच्या झोतात येण्याचा प्रयत्न.
काही काही कळत नाही !
कंटाळा आलाय का ? या जीवनाचा……
असं वाटतं कधी भयाण शांततेच्या वेळी,
पण नाही !
ठेवा तुमच्या मेणबत्त्या पाकीट बंद करून,
लपवून ठेवा तुमच्या पदव्या, अधिकार आणि ते अदु पांडित्य………
जाळून टाका ते कायदे, किंवा विकून टाका रद्दिच्या भावात ते सारं साहित्य, जे सशक्तीकरणा साठी सतत लिहलं जातयं ……
मी स्वतःच मशाल बनून उजळवणार आहे माझी काळरात्र,
मीच रक्षणार माझं शील माझ्याच मनगटाच्या जोरावर………
दाखवून देईन साऱ्यांना ………
ही मनगटं बांगड्या प्रमाणे शत्र ही लिलया पेलू शकतात.
माझ्या डोक्यात शिरलीय आता सावित्री,
अंगात संचारलीय जिजाऊ,अहिल्या……
आता लपकवून बघ पापणी……
दुसऱ्या क्षणी पापणी खाली डोळा नसेल, किंवा शिरच नसेल धडावर…
करुन बघ मुद्दाम स्पर्श गर्दित यौनांगांना,
कदाचित तेव्हाच पुरुषत्व लोप पावण्याची जाणिव होईल तुला.…
कारण तो प्रहारच तसा असेल.
बंद करा तुमचे प्रसिद्धीचे भंडारे,
जे मिठ मिरच्या लावून वाढवतात चव प्रसार माध्यमांच्या बातम्यांची ,
ज्यांनी उघडलेत असंख्य दुकानं शब्दांच्या हेराफेरीचे……
बदनाम करुन ठेवलीय मोजक्याच नालायकांनी,
संबंध पुरुष जात कारण नसतांना……
अरे एकदा तरी भोगून पहा,
किती त्रास होतो वाळूला, नाहक लाहीसंग भाजतांना.
*शिवा चौधरी*
*जामनेर,जळगांव*
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें