मित्रांनो आपल्या आजूबाजूला बघा किंवा सर्व देशात रोज नव्याने कुणी तरी आणि कोठे तरी आत्महत्या केल्याचे आपल्याला ऐकायला मिळते. काही जण एखाद्याच्या हतबल परिस्थितीचं वर्णन करत, त्याच्या त्या कृत्याला नकळत दुजोरा देतात. कुणी कोसतं तर कुणी दुसऱ्याच एखाद्या आत्महत्त्येवर राजकारण तापवतो. कुणी टिंगल टवाळी करतो. इत्यादी इत्यादी.......
पण मुळात आपल्या मनात हा विचार येतोच कसा? आता एखादा जण म्हणेलही तुझ्यावर पाळी आली की कळेल ! काय कळेल हे ही स्पष्टीकरण त्याने पूर्ण लेख वाचल्यावर द्यावं. त्याच्या समीक्षेचं स्वागतच असेल. परवा तेरावाच्या सिनेमा नटाच्या आत्महत्येला सुरवातीला हळहळ व्यक्त करणारे आता विपरीत बोलू लागलेत. प्रसार माध्यमातून ही आत्महत्या नसून एखादा महोत्सव असल्या सारखं वातावरण निर्माण केलं जातंय. अर्थात ते टि आर पी साठी हा खेळ वर्षानुवर्षे खेळत आले आहेत यात शंका नाही. आणि ते ही तो खेळ ठराविक ठिकाणीच करतात म्हणा. अन्यथा किती तरी शेतकरी बांधावर लटकतात, किती तरी कामगार आढयाला तर कुणी पंख्याला तर कुणी विषाचे डबेच्या डबे रिते केले. माझ्या निरीक्षणानुसार तरी कणखर व्यक्ती कधी आत्महत्या करीत असल्याचे मला दिसलं नाही. केली ही असेल तर ते ही हतबल होऊन. पण ही हतबलता याच एका गोष्टीतून का जगासमोर आणायची का? कुणी दिला आपल्याला तो अधिकार? मुळात या देहावर आपला अधिकार नाहीच. आपल्या जन्मासाठी आपल्या आई बाबांनी खाल्लेल्या खस्ता, केलेले नवस, आपलं पोटाचं खडगं भरण्यासाठी स्वतःच रिकामं ठेवलेलं पोट काही काही का नाही आठवत हो?
मी म्हणतो का? आणि कशासाठी?
हतबल झालात का? कंटाळा आला का? आला ही असेल असं आपण मानू. पण कुणा एकाचा किंवा एखादया परिवाराचा किंवा समुदायाचा, अन्यथा सरकारी यंत्रणेचा वगैरे वगैरे... म्हणून संपूर्ण जगाचा तर नाही ना आला. मग असा विचार करण्या आधी त्या उरलेल्या जगात शिरून तर बघा एकदा ! माझ्या ओळखीत साधारण वीस बावीस वर्षाआधी एकाने अनेक वेळा वेगवेगळ्या जागेवर जात, आत्महत्येचा प्रयत्न केला. पण प्रत्येक वेळी आपल्या जाण्यानंतर इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली. पण शेवटी स्वतःच्या घरात त्यानं जीवन संपवलं. त्यानं ते संपवलं यातही चूक आहेच यात शंका नाही. काहींनी उगाच नाटकं ही केलीत. काही याच नाटकात जीव गमावून बसले तर काही तारले गेले.
असो आपला मुद्दा असा आहे की खरंच हा शेवटचा मार्ग आहे का? तर नाही ! जर हे आयुष्य किंवा हा देह आपला नाहीच तर त्याला संपवण्याचा अधिकार ही आपला नाही. पटतंय ना? की जातंय डोक्यावरून……
तुमच्या आयुष्यात काही घडलं आणि झालात का नाराज? आलाय का राग? परिस्थिती हाताबाहेर गेली का? मग ते हात झटकून टाका. नव्या उमेदीनेनवं काही सुरू करा. घर सोडा, गाव सोडा, देश सोडा. पण जग सोडू नका. आयुष्य संपवून टाकू नका. ज्याच्या मुळे त्रासला आहात त्यांनाच सोडा. अहो त्यांची लायकी नाही तुमच्या सोबत राहण्याची. करा वाटा वेगवेगळ्या आपल्या, स्वतःला सिद्ध करण्यासाठी सज्ज व्हा. आपली जीवनशैली बदलवा. बदल घडला तर परिस्थिती बदलेल. आयुष्य पुन्हा रुळावर येईल. आपल्या नंतर आपल्या आवडत्या व्यक्तींचं काय होईल यावर मंथन करा. आत्महत्येचा विचार कापुराप्रमाणे हवेत विरून गेला नाही तर सांगा. अहो एकदा मनात हिमतीची ज्वाला पेटवा तर खरं.
पण कठीण पर्याय कुणालाच नको सगळ्यांना कसं सोप्प पाहिजे. संपवा जीवन म्हणजे झालं. लाज वाटायला हवी आपल्याला असा विचार करताना सुद्धा. थोडं खरखरीत बोलतोय खरा पण त्यातून मला काहीच मिळणार नाहीये. तुम्ही जगलात तर माझ्या घरात राशी रिकाम्या थोड्याच करणार आहात. मला मिळेल ते आत्मिक समाधान तुम्हाला या सुंदर जगाचा निरोप न घेऊ देण्याचं. या आधी मी असे प्रयत्न प्रॅक्टिकली करून पाहिले आणि आणि ते सफल ही झालेत. मस्त जगताय हो ते... त्यांचं आनंदी जग बघून त्यांच्या पेक्षा जास्त आनंद मला होतो. असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून आज हा लेखन प्रपंच..... तसं लिहायला खूप आहे पण लेख जास्त मोठा झाला तर वाचक ही बोर होतात. म्हणून थांबतोय पण यावर जमलं तर चर्चा सुरू ठेवू. मी दोघा तिघांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही दोघा तिघांचं मनोबल वाढवा.
"आयुष्य खूप सुंदर आहे त्याला अजून सुंदर बनवू या....!"
लेखन :- वास्तव 8275493221
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें